tv11ठाणे: रॉक ब्रॅण्डवर घुमणारे गाणे..त्यावर थिरकणारी तरुणाईची पावले आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती.. अशा भारलेल्या वातावरणात कोपरीतील केसी महाविद्यालयाच्या रिफ्लेशन महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. ‘टेकफेस्ट’च्या चित्तथरारक सादरीकरणाने सुरू झालेल्या या महोत्सवात अभियांत्रिकी अनुभव आणि रोबोच्या कौशल्याच्या प्रात्यक्षिकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल होती. दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या निमित्ताने रॉक बॅण्ड, संगीत, फॅशन शो आणि नृत्याची अदाकारी सादर केली.
 आठवडाभर चाललेल्या या फेस्टिव्हलच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या कलागुणांचे दर्शन या निमित्ताने घडून आले. या महोत्सवातील रॉक ब्रॅण्डचे सादरीकरण खास आकर्षण ठरले. प्रीझम आणि कोशिश या रॉक ब्रॅण्ड क्षेत्रातील तरुणांनी रॉकिंग आणि मेटल साँगच्या सुरावटींनी तरुणाईला थिरकरण्यास भाग पाडले. तर महाविद्यालयातील तरुण-तरुणींच्या फॅशन शो, नृत्यालासुद्धा तितकीच दाद मिळाली. अखेरच्या सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी बॉलीवूडमधील मंडळींनी महाविद्यालयात हजेरी लावली होती. त्यामध्ये दिग्दर्शक आदी इराणी, करण शर्मा, लिलीपुत फ्रुक्वी आणि भूषण मेनन उपस्थित होते. महाविद्यालयाचे डॉ. एच. एस. चिमा, साईकिरण खन्ना, हंसराज गोहीलोत आणि रिता शक्तीवरन हेदेखील विद्यार्थ्यांसोबत उत्साहाने या महोत्सवात सहभागी झाले होते.  ऑनलाइन गेमिंगमधील आघाडीचा ‘खेळाडू’ बेल वर्गीस याच्या हस्ते विजेत्यांना किबोर्ड, माऊससारख्या भेटवस्तूंनी सन्मानित करण्यात आले. अभ्यास आणि करिअर सांभाळून विद्यार्थ्यांनी ‘गेमिंग’कडे वळावे, असा सल्ला बेल याने दिला. गेमिंगमधील यशासाठी चिकाटी आणि समर्पकता अंगी बाणवण्याची गरज असल्याचेही त्याने म्हटले.

कल्याणच्या भाग्यश्री भोईरला एनसीसीचा राष्ट्रीय किताबठाणे : कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाच्या भाग्यश्री भोईर हिला राष्ट्रीय छात्र सेनेचा २०१४ चा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. एनसीसीमध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थाना हा सन्मान दिला जातो. अभ्यास सांभाळून भाग्यश्रीने हा किताब जिंकला आहे. तर मानाचा समजला जाणारा विद्यापीठाचा कुलगुरू बॅनरही बिर्ला महाविद्यालयास जाहीर झाला आहे. बिर्ला महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटमधील भाग्यश्रीची निवड महागल्स बटालीयनमध्ये झाली होती. या बटालियनच्या वतीने तिचे नाव राष्ट्रीय पुरस्कारासाठी छात्र सेनेच्या दिल्ली मुख्यालयास कळवण्यात आले होते. संपूर्ण देशभरातील विविध बटालियनमधून आलेल्या उत्कृष्ट विद्यार्थामधून भाग्यश्रीची निवड करण्यात आली. ती डी. जी. प्रमाणपत्राची मानकरी ठरली. कर्तव्यनिष्ठ, कार्यकुशल अशा विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी व सध्याच्या प्राचार्या डॉ. स्वप्ना समेळ यांना मिळाला होता. परंतु पहिल्यांदा हा पुरस्कार महाविद्यालयाच्या विद्याíथनीला घोषित झाला आहे. तर मुंबई विद्यापीठाचा मानाचा असलेला कुलगुरू बॅनर हा पुरस्कारही बिर्ला महाविद्यालयाला मिळाला. गेल्या १४ वर्षांपैकी ९ वर्षे हा पुरस्कार महाविद्यालयाकडे आहे, अशी माहिती प्रा. नितीन बर्वे यांनी दिली.

आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धाठाणे : ठाण्यातील जोशी-बेडकर महाविद्यालयाच्या वतीने डॉ. वा. ना. बेडेकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा होणार आहे. बेडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी  सकाळी ९ वाजता वाणिज्य विभागाच्या इमारतीमधील कात्यायन सभागृहात ही स्पर्धा होईल. ठाणे जिल्ह्य़ातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून त्यांच्या वक्तृत्वाची झलक पाहायला मिळणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली. ‘स्वच्छ भारत अभियान : स्वप्न  की वास्तव? ‘स्त्री समानता : फक्त कागदावरच’, ‘सोशल मीडिया : संवाद की विसंवाद? असे तीन विषयांवर ही स्पर्धा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असले तरी एका महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांला स्पर्धेत प्रतिनिधित्व करता येणार आहे. विद्यार्थ्यांना सहा मिनिटांचा वेळ असेल. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार आणि तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख आहे.
संपर्क : प्रा. नारायण बारसे – ९९६९०५१२८७.  

किन्हवली महाविद्यालयात पदवीदान समारंभ  
ठाणे : विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या किन्हवली महाविद्यालयामध्ये नुकताच पदवीदान समारंभ पार पडला. या समारंभाला प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. हरिकांत शामराव भानुशाली व मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव डॉ. फरडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. भानुशाली यांच्या हस्ते महाविद्यालयातील १६० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची गरज आहे. यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवून पुढे वाटचाल केली पाहिजे. समाजासाठी असणाऱ्या कर्तव्यांची जाण प्रत्येकांने ठेवणे आवश्यक आहे, असे मनोगत डॉ. भानुशाली यांनी व्यक्त केले. डॉ फरडे यांनी पदवीचे महत्त्व व पदवी मिळाल्यानंतर येणारी जबाबदारी याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना त्यांच्या भावी वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभाचे अध्यक्ष तसेच विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली आणि महाविद्यालयाचे  प्रा. डॉ. पाटील यांनी महाविद्यालयाच्या एकूण कामगिरीचा आढावा घेतला.

आंतरमहाविद्यालयीन लंगडी स्पर्धा
बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने महिलांसाठी मुंबई विद्यापीठाची आंतरमहाविद्यालयीन लंगडी स्पर्धा झाली. मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. उत्तम केंद्रे व महाविद्यालयाच्या प्राचार्या शकुंतला सिंग यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अंतिम फेरीमध्ये ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालय, एन.के.टी विद्यालय, पनवेल येथील सी.के.टी महाविद्यालय आणि अंबरनाथ येथील भारत महाविद्यालय पात्र ठरले.

संकलन : श्रीकांत सावंत