14 December 2019

News Flash

कॉलेजच्या कट्टय़ावर : ठाणा महाविद्यालयात कोरडय़ा रंगांची धुळवड

ठाणा महाविद्यालयात (बेडेकर व बांदोडकर महाविद्यालय) कोरडी होळी उत्साहात साजरी करण्यात आली

ठाणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुष्काळाचे भान जपत धुळवडीचा आनंद लुटला. त्याचवेळी पाणीबचतीसाठी जनजागृतीही करण्यात हे विद्यार्थी मागे नव्हते.

ज्योती तांबडे, युवा वार्ताहर
दर वर्षी डीजेच्या तालावर रंगांसोबत पाण्याची उधळण करत बेधुंद होणाऱ्या तरुणाईने यंदा धुळवडीत राज्यावर ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलविरहित होळी साजरी केली.
ठाणा महाविद्यालयात (बेडेकर व बांदोडकर महाविद्यालय) कोरडी होळी उत्साहात साजरी करण्यात आली. होळी, रंगपचमी येथील सर्वच महाविद्यालयांमध्ये दिसून आला. विद्यार्थ्यांनी होळीच्या रंगात मनसोक्त रंगत होळी साजरी केली. होळीच्या दिवशी महाविद्यालय बंद असल्याने त्या आधीच होळी खेळण्याचा आनंद तरुणांनी घेतला. त्यातही नैसर्गिक रंगांचा वापर करून सर्वासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याकडे पहिले पाऊल टाकले. अनेक विद्यार्थी आपल्यासोबत विविध प्रकारचे रंग घेऊन आले होते. त्यामुळे महाविद्यलयाच्या प्रांगणात होळीचा जल्लोश होता. लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण
होऊन होळीचा जल्लोश परिसरात घुमला. तसेच
काही विद्यार्थ्यांनी फलक झळकावून धुळवडीला पाण्याचा कमीत कमी वापर करण्यासंदर्भात जनजागृती केली.

 

आदर्श महाविद्यालय ‘प्रिन्सपल डे’ साजरा
ठाणे : महाविद्यालयाचे प्राचार्य म्हटले नाकाच्या टोकावर आलेला चष्मा आणि कणखर आवाज असे चित्र विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैदेही दफ्तरदार यांची तऱ्हा काही वेगळीच आहे. प्राचार्य असलो तरी आपण विद्यार्थ्यांचे शिक्षकच आहोत, शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांशी वागण्याचा त्यांचा स्वाभाव त्यांना इतर प्राचार्यापेक्षा वेगळेपण देतो. त्यांच्या याच स्वाभावामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधतात. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सन्मानार्थ नुकतेच महाविद्यालयामध्ये ‘प्रिन्सपल डे’चे आयोजन केले होते. शैक्षणिक वर्षांमध्ये प्रचार्य आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी काम करत असतात. त्यांच्या याच कामाचे कौतुक करण्यासाठी आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी ‘प्राचार्य दिवस’ साजरा करतात. यंदा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून नृत्य व संगीताचे सादरीकरण करून प्राचार्याना शुभेच्छा दिल्या.

पर्जन्य जलसंवर्धन हा एकमेव उपाय
जलअभ्यासक डॉ. उल्हास परांजपे यांचे मत
ठाणे : पर्जन्य जलसंवर्धनचा अवलंब केला पाहिजे. त्यासाठी थोडे पैसे खर्च करावे लागतील; परंतु पाण्याचा पुनर्वापर करता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ जल अभ्यासक उल्हास परांजपे यांनी बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात केले. आपल्या देशात पावसाच्या चार महिन्यांतच सरासरी एक हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्या काळात पाणी साठवणे, त्याचा योग्य वापर करणे, पाणी शुद्धीकरण, पुनर्वापर, पाण्यावरील प्रक्रिया आदी गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. पाण्याचा पुनर्वापर केला तर पाण्याचा अपव्यय टाळता येईल, असेही ते म्हणाले.
सध्या सर्वत्रच पाणीटंचाई या विषयावर विविध चर्चा होत आहेत. पाणी हे जीवन असून त्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे याची जाणीव महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी बा. ना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय आणि हरियाली संघटनेनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उल्हास परांजपे यांनी बोअरवेल तसेच पर्जन्य जलसंधारणाच्या यामाध्यमातून प्रत्येक सोसायटी ५० टक्के स्वयंपूर्ण झाली पाहिजे.
बोअरवेलच्या बाजूला एक खड्डा करून जमिनीच्या भूगर्भात पाणी वाढविले तर पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. ज्या परिसरात विहीर आहे त्यांनी पाण्याचे मूल्यमापन केले पाहिजे. तसेच पाणी साठविणे ही आताच्या काळाजी गरज आहे, असेही उल्हास परांजपे यांनी सांगितले.
‘आशिया व आफ्रिकेमधील बरेच देश पाण्याचे दुर्भिक्ष या एकाच समस्येने ग्रासलेले आहेत. पाण्याची बचत व पर्जन्यजल संवर्धन या गोष्टीच मानवाच्या हातात आहेत. जर भारताने पाण्याची काळजी घेतली नाही तर आपला देशही याच देशांच्या पंगतीत जाऊन बसेल, असा इशारा परांजपे यांनी दिला.
वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, व वाढणारी पाण्याची गरज यावर पर्जन्य जलसंवर्धन हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. म्हणून पाण्याचे मर्म सर्वानीच जाणून घ्यावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर यांनी या वेळी बोलताना केले.

विज्ञान दिन प्रकल्पात सौर बल्ब प्रथम
ठाणे : जीएमआरएम तसेच टीआयएफआर या संस्थेतर्फे आयोजित विज्ञान दिन राष्ट्रीय प्रदर्शनात बांडोदकर विज्ञान महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या राजस सोळांकुरकर व सुशांत शिंदे यांनी तयार केलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘सोलार बल्ब’ या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. तर राहुल खरे आणि यश मोरे यांच्या यंत्रमानव (फॅसिनेटिंग रॉबट) या प्रकल्पाला तृतीय पारितोषिक देण्यात आले.
‘फॅसिनेटिंग रॉबट’ म्हणजे यंत्रमानव. अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलला नियंत्रित करू शकणारा हा यंत्रमानव असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ही स्पर्धा खोदड मधील नारकायण गाव येथील जीएमआरटीच्या प्रांगणात नुकतीच पार पडली. या प्रदर्शनात इयत्ता आठवीपासून पीएच.डी.पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले होते. त्यामुळे या स्पर्धेतील प्रदर्शनात अनेक नामांकित संस्थांनी सहभाग दर्शवला होता. मेकिंग इंडिया या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या स्पर्धेत एकाच माहाविद्यायाला अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांक मिळाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जीएमआरएम तसेच टीआयएफआर या संस्थेतर्फे सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून बीएआरसीचे माजी वैज्ञानिक डॉ. सुधाकर आगरकर यांचे मार्गदर्शन या वेळी विद्यार्थ्यांना लाभले.

बांदोडकर महाविद्यालयाला ‘स्टार’चे अर्थसाहाय्य
जतीन तावडे, युवा वार्ताहर
विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विभागांच्या विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनात्मक स्पष्टता, वैज्ञानिक संशोधनाचा विकास आणि सर्जनशीलता वाढीस लागावी म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे ‘स्टार’ मानांकानांतर्गत विशेष अर्थसाहाय्य घोषित करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत महाविद्यालयाला २८ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांकरिता नियमित अभ्यासक्रमाबरोबरच इतर विविध प्रकारचे प्रयोग, मार्गदर्शनपर व्याख्याने, कार्यशाळा, इ. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या बहुमानाच्या निमित्ताने नासाचे वरिष्ठ संशोधक डॉ. जयदीप मुखर्जी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध शैक्षणिक सहली, आकाश निरीक्षण, सामाजिक जाणिवेच्या दृष्टीने निर्माल्यामुळे तलावाच्या पाण्यामधील प्राणवायूवर होणारा परिणाम, पक्षिनिरीक्षण त्याचप्रमाणे पदवी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी प्रात्याक्षिके आयोजित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने निसर्गपूरक रसायनांची निर्मिती, क्लिनिकल रिसर्चमधील करिअर संधी, नेट/सेट/गेट स्पर्धा परीक्षा आदी विषयांवर कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
महाविद्यालयातील विज्ञान विभागाने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक जैवतंत्रज्ञान शिखर परिषद २०१६ येथे सहभाग घेतला. यानिमित्ताने त्यांना नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. याशिवार टाकाऊतून टिकाऊची निर्मिती, तरुण उद्योजाकांशी चर्चा, निसर्ग छायाचित्राकरिता, आदी विषयांवर व्याख्याने या वेळी आयोजित करण्यात आली होती. अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवरील व्याख्यानांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील संधींची माहिती विद्यार्थ्यांना यानिमित्ताने मिळाली.

सामाजिक जाणिवांचा ‘दृक्श्राव्य’ जागर
ठाणे : स्पर्धाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडणे आणि त्यांना जाणिवांचा जागर करून देण्यासाठी बा. ना. बांडोदकर महाविद्यालयात दृक्श्राव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक परिस्थितीचे भान राखून आपल्या दृक्श्राव्यांच्या माध्यामातून युवा पिढीलाही समाजाचे भान असते हे दाखवून दिले. जागर जाणिवांचा अभियान, महिला विकास कक्ष आणि स्वामी विवेकानंद केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, नोबेल पारितोषिक विजेते सत्यार्थी प्रकाश आणि मलाला तसेच पर्जन्यजल संवर्धन विषय दृक्श्राव्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या स्पर्धेत पदवी महाविद्यालयाचे आठ गट व कनिष्ठ महाविद्यालयाचे चार गट सहभागी झाले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहितीपर दृक्श्राव्याचे सादरीकरण केले. तर दोन गटांनी मलाला आणि सत्यार्थी प्रकाश यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे आणि त्यातून समाजालाही सामाजकार्याची जाणीव करून देणारे दृक्श्राव्य सादर करून शांततेचा पुरस्कारकर्त्यांना या सादरीकरणातून मानवंदना दिली. जाणिवांचा जागर करून देण्यासाठी एक व्यासपीठ देणे खूप गरजेचे आहे. अशा स्पर्धामुळे समाजात जागरूकता निर्माण होते. समाजासाठी काही तरी करण्याची जाणीव विद्यार्थ्यांना होते. तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडते. शिवाय अभ्यासाव्यतीरिक्त विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळतो असे, प्रतिपादन या स्पर्धेच्या परीक्षक सीमा नित्सुरे यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा ठेवल्यामुळे बुद्धीला चालना मिळते. तसेच दिलेल्या विषयांमुळे त्या व्यक्तीची किंवा विषयाची माहिती मिळविणे त्यासाठी वाचन करणे विषयाचा अभ्यास करणे आणि गांभीर्य ओळखणे आदी गोष्टींना प्रोत्साहन मिळते
असे सांगितले. या वेळी महिला विकास कक्षाच्या आकांक्षा शिंदे यांनी आाभार प्रदर्शन केले.

First Published on March 31, 2016 4:20 am

Web Title: event and cultural programme in thane colleges 3
टॅग Event
Just Now!
X