नेट मिटरींगद्वारे जास्तीची वीज महावितरणला
प्रतिनिधी, अंबरनाथ

वाढत्या लोकसंख्येमुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकदा भारनियमनाचा फटका बसतो. अंबरनाथ शहरामधील शिक्षण संस्थांना अशा भारनियमनाचा अधूनमधून फटका बसत असतो. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांना होणारा त्रास मोठा असतो. केंद्र आणि राज्य सरकारने आखलेल्या नेट मीटरिंग योजनेत सहभागी होत, अंबरनाथच्या एसआयसीईएस महाविद्यालयाने या समस्येवर अनोखा उपाय शोधला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून महाविद्यालयाने आठ महिन्यांपूर्वीच दैनंदिन उपक्रमासाठी लागणारी वीजनिर्मिती सुरू केली आहे. अलीकडेच त्यावर नेट मीटरिंग यंत्रणा बसविण्यात आली. महाविद्यालयाच्या छतावर बसविण्यात आलेल्या सौर पॅनलद्वारे सध्या दररोज सरासरी ५३ किलोव्ॉट वीजनिर्मिती होते. महाविद्यालय त्यांना आवश्यक तेवढी वीज वापरून उर्वरित वीज महावितरणला देते. नेट मीटरिंगमुळे वीजनिर्मिती आणि वापराचा हिशेब ठेवणे आता शक्य झाले आहे.
राज्यातील विजेचा तुटवडा सर्वज्ञात आहे. यावर अनेकदा पर्याय सुचवले जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अंबरनाथच्या साऊ थ इंडियन चिल्ड्रन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाने सौर ऊर्जेच्या साहाय्याने वीजनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या माध्यमातून महाविद्यालयास दररोज लागणारी वीज निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. निर्माण केलेल्या २५० युनिटपैकी उर्वरित वीज आता महावितरणला दिली जाऊ लागली आहे. त्यामुळे महाविद्यालयाला भविष्यात वीज बिलातून पूर्णपणे सुटका मिळू शकेल, असा दावा व्यवस्थापनामार्फत करण्यात आला. असा प्रयोग करणारे हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरणार आहे.
दीपसन्स एनर्जीच्या दीपक रेवणकर यांनी हा प्रकल्प साकारला आहे. वीजनिर्मितीसाठी त्यांनी महाविद्यालयाच्या छतावर १८० पॅनल बसविले आहेत. त्यासाठी महाविद्यालयास ४८ लाख रुपये खर्च आला. एरवी महाविद्यालयास दरमहा एक ते सव्वालाख रुपये बिल येते. त्या खर्चात आता बचत होईल, असे व्यवस्थापनाद्वारे सांगण्यात आले.

अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी महावितरणने इमारतींच्या छतावर सौर ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. घरगुती स्वरूपात आठ किलोव्ॉट निर्मिती करता येते. त्यासाठी अनुदानित स्वरूपात कर्ज दिले जाते. साऊथ इंडियन महाविद्यालयाचा हा सौर ऊर्जा प्रकल्प कल्याण विभागातील सर्वात मोठा आणि पहिला प्रकल्प आहे.
– संजय राठोड, अधीक्षक अभियंता, महावितरण, कल्याण विभाग

आंबेडकर जयंतीनिमित्त नेत्रदानाचा संकल्प
‘भारतीय संविधानाच्या उद्देशिकांचे वाटप’
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत कल्याण येथील जीवनदीप शिक्षण संस्थेच्या गोवेली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी जयंती साजरी केली. आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांतर्फे नेत्रदान करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक असे मिळून सुमारे पन्नास नेत्रदानाचे अर्ज भरण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. कोरे यांच्याकडे हे अर्ज सादर केले गेले. तसेच डॉ. बाबासाहेबांची विचारधारा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी परिसरातील १२५ शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थ्यांतर्फे ‘भारतीय संविधानाची उद्देशिका’ भेट देण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापकांनी आंबेडकरांच्या जीवनातील विविध पैलूंवर आपले विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समाजरचना आणि राष्ट्रउभारणीमध्ये त्यांचे योगदान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

ज्ञानसाधना कला शाखेत नवीन अभ्यासक्रमाची भर
प्रतिनिधी, ठाणे</strong>
ज्ञानसाधना महाविद्यालयातील नियोजित अभ्यासक्रमासोबत काही नवीन अभ्यासक्रमांची वाढ करण्याचा निर्णय महाविद्यालय व्यवस्थापनाने घेतला आहे. सध्या असलेल्या अभ्यासक्रमात १५ नवे अभ्यासक्रम सुरू करणारअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर मराठे यांनी दिली. यासंबंधीचा प्रस्ताव महाविद्यालयातर्फे विद्यापीठाकडे पाठविण्यात आला आहे. या नव्या प्रस्तावात कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात फिल्म अ‍ॅण्ड टीव्ही, न्यूज मीडिया, योग, समाजशास्त्र, इतिहास तसेच इतर काही अभ्यासक्रमांमध्ये पर्यायी विषयांचा समावेश करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेमध्ये माहिती तंत्रज्ञान, प्राणिशास्त्र अशा एकूण १५ नव्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण केली आहे. विद्यापीठाकडून परवानगीचे पत्र मिळताच हे अभ्यासक्रम सुरूकरण्यात येणार आहेत.

आदर्श महाविद्यालयात सप्तरंग महोत्सव
प्रतिनिधी, ठाणे
शिक्षणावाचून कुणीही वंचित राहू नये. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी परिसरातील नागरिकांना मिळावी यासाठी प्रसंगी अभ्यासू व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना संस्था आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यास सदैव तयार आहे, असे प्रतिपादन आदर्श महाविद्यालयात प्रमुख पाहुणे तुषार आपटे यांनी केले. आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय कुळगाव बदलापूर यांच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे ‘सप्तरंग’ या सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवानिमित्त ते बोलत होते.
सप्तरंगसारख्या स्त्युत्य उपक्रमाबद्दल गौरवास्पद उद्गार काढून पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक ही त्यांनी या वेळी केले. नुकताच सप्तरंग महोत्सव महाविद्यालयात पार पडला. या वेळी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. अंकिता गायकवाड हिने मिस यशवंतराव चव्हाण मुक्त ओपन युनिव्हर्सिटी हा किताब पटकविला तर किरण रणबोर या विद्यार्थ्यांची मिस्टर यशवंतराव चव्हाण मुक्त ओपन युनिव्हर्सिटी म्हणून निवड करण्यात आली. सप्तरंग कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धामध्ये मेहंदी, रांगोळी, गीतगायन, नृत्य, निबंध, वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धामध्ये धावणे, भालाफेक, थालीफेक, गोळाफेक, लांब उडी अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सांस्कृतिक स्पर्धामध्ये सुमारे ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये २०० विद्यार्थी सहभागी झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संयोजक डॉ. संदीप भेले, दिलीप घोरपडे, प्रा. किरण मेंगळ आदीनी सहकार्य केले.

संज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांची संदेशमय लघुपट निर्मिती
प्रतिनिधी, ठाणे
परीक्षा संपल्यावर महाविद्यालयाचे कट्टे ओस पडत असले तरी विद्यार्थी नेहमीच काही ना काही नवीन उपक्रम करण्यासाठी उत्साही असतात. जी. आर. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करत लघुपट निर्मिती केली आहे. पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाची आवश्यकता असते. याचाच एक भाग म्हणून जी. आर. पाटील महाविद्यालयाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी तरुणांची देशाप्रती असणारी देशभावना या लघुपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाचा विद्यार्थी असलेल्या अवधूत पावसकर याची संकल्पना असून सागर पवार या विद्यार्थ्यांने या लघुपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. वर्तमानपत्रात वाचलेल्या दहशतवादासंबंधीच्या घटना वाचून आतंकवादाविरोधात उभा राहण्यासाठी एक लहान मुलगा प्रेरित होतो. प्रथम नावाचे लहान मुलाचे पात्र या घटनांच्या विरोधात उभा राहतो. चेहऱ्यावर मिशी काढून हातात खेळण्यातील पिस्तूल घेऊन आपल्या पात्राची ओळख करून देतो. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांकडून प्रेरित झालेली तरुण पिढी दहशतवादाविरोधात मातृभूमीसाठी लढण्यासाठी सज्ज आहेत, असा संदेश या लघुपटाच्या माध्यमातून दिला आहे. संज्ञापन विभागाचे विद्यार्थी असल्याने कॅमेरा हाताळणे, संकलन या तांत्रिक गोष्टींचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी या लघुपटाची निर्मिती पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.