weekend-thगेल्या १५ वर्षांहून अधिक काळ रेडिओ जॉकी अर्थात रेडिओ संवादक म्हणून कार्यरत असणारे रश्मी वारंग, गणेश आचवल आणि मयूरेश शिर्के यांच्यासोबत ‘मन:स्पर्शी’ हा गप्पांचा सुरेल कार्यक्रम रविवार, ८ मार्च रोजी काटदरे हॉल, गांधी चौक, कुळगाव, बदलापूर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. रेडिओ संवादकांचे अनुभवविश्व या कार्यक्रमाद्वारे उलगडून दाखविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक महाविद्यालयांत, संस्था, विविध मंडळांत ‘मन:स्पर्शी’ कार्यक्रमाचे यापूर्वी प्रयोग झाले आहेत. सुवर्णमहोत्सवी प्रयोगाकडे ‘मन:स्पर्शी’ कार्यक्रम वाटचाल करीत आहे.

पं.शौनक अभिषेकी यांच्या गाण्यांची मैफल
होलीकात्सोवानिमित्त आणि कल्याण गायन समाजाचे कै.अनिल ताम्हनकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं.शौनक अभिषेकी यांच्या सुरेल गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  स्वप्नील भाटे हे त्यांना तबल्यावर साथ देतील तर अनंत जोशी यांची त्यांना संवादिनीवर साथ असेल.  रविवार, ८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता कल्याण गायन समाजाच्या पांडुरंग-प्रभा सभगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.

फळे रसाळ गोमटी..
कुणीही न खाल्ल्यामुळे घरात फळे शिल्लक राहत असल्याबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल तर अशा फळांच्या वेगवेगळय़ा रेसिपीज तुम्हाला उपयुक्त ठरतील. कोरम मॉलच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘वुमन्स ऑन वेन्सडे’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्यात फळांचे मूस, फळे व लापसीचे पदार्थ, मसालेदार भाज्या, पाश्चिमात्य पद्धतीचा कडधान्याचा चवदार रस्सा आदी पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. बुधवार, ११ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत ही कार्यशाळा होईल.   

आमटे दाम्पत्याची मुलाखत
गेल्या चार दशकांहून अधिक काळ हेमलकसा येथील आदिवासींसाठी लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविणारे डॉ. प्रकाश  आणि डॉ. मंदाकिनी या आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत कल्याण येथील आचार्य अत्रे नाटय़गृहात शुक्रवार, ६ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध संवादिका मंगला खाडिलकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे सत्कार समितीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी कल्याणकरांच्या वतीने या सेवाभावी दाम्पत्याचा सत्कारही केला जाणार आहे.

‘ती’ महोत्सव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समर्थ भारत व्यासपीठ व नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी शुक्रवार, ६ मार्च ते सोमवार, ९ मार्चदरम्यान एका विशेष ‘ती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चारदिवसीय महोत्सवात कोकण प्रांतातील ऐंशी बचत गटांचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. शुक्रवार, ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता ठाणे शहरातील पाच आमदार व एका खासदाराच्या सौभाग्यवतींच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता वैयक्तिक नृत्य स्पर्धा, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ११ वाजता चित्रकला स्पर्धा तर सायंकाळी पाच वाजता सामूहिक नृत्य स्पर्धा होईल. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवार, ८ मार्च रोजी सफाई कामगारांच्या मुलांचे ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर आधारित नाटिकेचे सादरीकरण होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता आर्टिस्टिक व ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके व खेळ पैठणीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील प्रसिद्ध योगतज्ज्ञ साधना लेले यांचे सोमवार, दुपारी १२ वाजता महिलांसाठी योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जुन्या वस्तू व खेळण्यांचे प्रदर्शन
एरवी ग्रामोफोन, टोल देणारे घडय़ाळ, जहाजावरील दिवे अशा जुन्या काळातील वस्तू आपण आजवर फक्त पुस्तकातील छायाचित्रांतून किंवा चित्रपटांत पाहिल्या असतील. मात्र आता या सर्व वस्तू आपल्या शहरातच पाहता येणार आहेत. परदेशी खेळणी, वैशिष्टय़पूर्ण जुन्या वस्तूंचे आगळेवेगळे प्रदर्शन शनिवार, ७ आणि रविवार, ८ मार्च या दोन दिवशी सकाळी १० ते ८ या वेळेत एफ-७, निहारिका शॉपिंग सेंटर, पहिला मजाला, लोकपूरमच्या समोर, हिरानंदानी मेडोज, पवारनगर, ठाणे येथे भरवण्यात आले आहे.

कुटुंब रंगलंय काव्यात
अनेकदा लोकप्रिय कवींची ठरावीक काव्येच रसिकांपर्यंत पोहोचतात. तसेच सुंदर काव्ये असूनही काव्य रचलेला कवी फारसा नावाजलेला नसल्याने अशी काव्ये आपल्याला वाचायला, पाहायला मिळत नाहीत. या गोष्टींना एकत्र आणून अधिक प्रभावी पद्धतीने रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रा. विसुभाऊ बापट ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा त्यांचा कार्यक्रम सादर करतात. होळीच्या या मोसमात कल्याणकरांसाठी प्रा. विसुभाऊ बापट ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ही काव्यमैफल सादर करणार आहेत. कल्याण व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे शनिवार, ७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ही मैफल रंगेल. प्रवेश विनामूल्य आहे.

त्वचेसाठी काही तरी नवीन

आपला चेहरा नेहमीच सुंदर दिसावा असे सर्व महिलांना वाटते. मात्र बाजारात मिळणाऱ्या प्रसाधनांची त्यांना भीती वाटत असते. आता ठाणे हेल्थ केअर रुग्णालय आणि डॉ. रुपमती येवलेकर यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने निर्मिती आणि वापरण्याच्या पद्धती या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी, ७ मार्च रोजी सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत आयोजित या कार्यशाळेत निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ.रूपमती येवलेकर आरोग्य आणि सौंदर्यासाठी नैसर्गिक घटक कसे उपयुक्त ठरत आहेत, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. नाव नोंदणीसाठी संपर्क – ९८६९२२४५२४ किंवा ०२२-२५३७४७४०.

ख्याल रजनी- अविरत १२ तास गायन
कल्याण गायन समाज आणि शास्त्रीय संगिताचे मुक्त व्यासपीठ यांच्या सयुक्त विद्यमाने ‘ख्याल रजनी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये केतकी घारपुरे, शर्वरी धामापुरकर, भरत तेलंग, विदुला फडणीस, गुरुदास कामत, अमृता लोखंडे, मंगेश लटके, ॠग्वेद देशपांडे, चिंतामणी जोशी, मनिषा घारपुरे, मधुरा सोहनी, प्रतिक फणसे, आसावरी पटवर्धन, पं.चंद्रशेकर वझे आदी कलाकार सलग १२ तास आपली अदाकारी सादर करणार आहेत.  या कार्यक्रमाला शनिवार, ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता सुरुवात होणार असुन रविवार ८ मार्च रोजी सकाळी ७ वाजतेपर्यंत हा कार्यक्रम काल्याण गायन समाजचे पांडुरंग-प्रभा सभागृह येथे सुरु राहणार आहे.

दुर्मीळ शस्त्रांचा ठेवा..
आजच्या या जागतिकीकरणाच्या जगात दुर्मीळ गोष्टींचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जुन्या गाडय़ा, वस्तू यांबरोबरच ऐतिहासिक शस्त्र-अस्त्रांविषयीचे कुतूहल तरुणांमध्ये वाढल्याचे दिसून येते. याच धर्तीवर विजयनगर उत्सव समिती, डोंबिवलीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, ७ व रविवार, ८ मार्च रोजी क.डों.म.पा. शाळा क्रमांक २१, लालबहादूर शास्त्री शाळा, विजयनगर आयरे गाव, डोंबिवली (पूर्व) येथे शस्त्रास्त्र तसेच विविध गडकोटांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. युद्धकाळात वापरण्यात आलेल्या मराठा, मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्वकंत, गजकुंज आदी प्रकारांतील भाले, तर मराठा कट्टय़ार, मुघल कट्टय़ार, हैद्राबादी कट्टय़ार, चामडय़ाच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, वेगवेगळ्या प्रकारची वाघनखे, अस्वल पंजा आदी शस्त्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.  
शलाका सरफरे