स्वानंद कला प्रसारक केंद्रातर्फे झील नगरी म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराची ही ओळख अशीच कायम रहावी, नवीन पिढीला माहिती व्हावी आणि संपूर्ण जगभर पसरावी या हेतूने या फेस्टिव्हलचे नाव ‘झील नगरी’ असे ठेवण्यात आले आहे. या वर्षी या फेटिव्हलमध्ये पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज व शाश्वती सेन यांचे कथ्थक नृत्य व पंडित शौनक अभिषेकी यांचे गायन सादर होणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध तबलावादक पंडित मुकुंदराज देव तबल्याची साथ करणार आहेत. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून दिग्गज व प्रतिभावंत कलाकारांचे आविष्कार पाहण्याची पर्वणी रसिकांना लाभणार आहे.
’कधी- रविवार, १८ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता
’कुठे- डॉ.काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.).

सुबोध भावे यांच्याशी गप्पा
आपापल्या क्षेत्रात मोठी कामगिरी करून यशाचे शिखर गाठणाऱ्या अशा दिग्गजांना प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी ठाणेकरांसमोर चालून आली आहे. ब्राह्मण सेवा संघ, नौपाडा, ठाणे यांच्या वतीने शारदोत्सव २०१५ कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज, शुक्रवारी गायिका मंजूषा भावे आणि आसावरी जहागीरदार अभंग, भक्तिगीत आणि नाटय़गीतांची मैफल सादर करणार आहेत. शनिवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा मुलाखतपर कार्यक्रम होणार आहे. अस्मिता पांडे ही मुलाखत घेणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या मुलाखतीचे आयोजन रविवार, १८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. मंगळवार २० ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
’कधी : शुक्रवार १६ ते मंगळवार २० ऑक्टोबर, वेळ : सायंकाळी ७ वाजता
’कुठे : ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे (प.).

मिलिंद इंगळे यांच्या गायनाचा ‘गारवा’
‘कधी सांजवेळी मला’, ‘वाऱ्यावर भिर भिर गारवा’, ‘दिस नकळत जाई’, ‘परतीच्या या वाटेवरती’ यांसारख्या गाजलेल्या प्रेमगीतांची पर्वणी ज्यांनी रसिकांना दिली ते सुप्रसिद्ध गायक संगीतकार मिलिंद इंगळे हे खास ठाणेकरांच्या भेटीला येणार आहेत. तन्वी हर्बल आणि नातू परांजपे यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद इंगळे आणि प्रसिद्ध गिटारवादक चिंटू या जोडीचा ‘मुखातिब’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वॉयोलिनवर मनस कुमार, कीबोर्डवर अभिषेक मेस्त्री आणि तबला समीर शिवसागर आदी कलाकार साथ देणार आहेत.
’कधी-शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी, रात्री ८.४५ वाजता
’कुठे- गडकरी रंगायतन ठाणे(प.)

वन्यजीवांच्या छायाचित्रणाचे धडे
एखाद्या जंगलसफारीवर जाऊन तेथील वन्यजीवांचे फोटो काढायचे काम म्हणजे संयम आणि चिकाटीची परीक्षाच जणू. एखाद्या पाण्याच्या डोहाच्या काठावर येणारा वाघ किंवा बिबटा टिपायचा म्हटलं की, तासन्तास त्याची वाट बघत थांबावं लागतं. या संयमाला जोड लागते ती अचूक निरीक्षणशक्ती आणि कलात्मक नजरेची. आपल्यासारख्या हौशी छायाचित्रकारांना हे ज्ञान लगेच अवगत होत नाही. मात्र, येत्या सुट्टीच्या हंगामात तुम्ही अशाच एखाद्या जंगलसफारीवर जाऊन वन्यजीवांचे छायाचित्रण करण्याचे बेत आखत असाल तर विख्यात वन्यजीव छायाचित्रकार अनंत झांजले यांच्याकडून मार्गदर्शनपर धडे घेण्याची संधी येत्या रविवारी चालून आली आहे. अनंत झांजले १९८४ पासून वन्यजीव छायाचित्रण करीत आहेत. मध्य प्रदेश व्याघ्र प्रकल्पात ते प्रमुख होते. नॅशनल जिओग्राफिक मासिकातही त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध होत असतात. ‘अपॅक’ या संस्थेच्या वतीने रविवारी ठाण्यात झांजले यांच्या छायाचित्रांच्या स्लाइड शोचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी झांजले हे आपले अनुभव सांगतील तसेच छायाचित्रकारांना मार्गदर्शनही करतील. स्वत:चा एसएलआर कॅमेरा असणाऱ्यांना या चर्चासत्रात प्राधान्य दिले जाईल. संपर्क- ९३२३९५०९७७.
’कधी-रविवार, १८ ऑक्टोबर
’कुठे-कलाभवन, कापूरबावडी, ठाणे (प.)

महाभोंडला
नवरात्रीत होणारा गरबा सर्वपरिचित आहे, परंतु भोंडला हे नवरात्रीचे खास मराठी वैशिष्टय़ असते. कित्येकांना हा भोंडला म्हणजे काय हे माहीत नसेल. भोंडला म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी विश्वास या सामाजिक संस्थेतर्फे ‘महाभोंडल्या’चे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ६ वर्षे, ७ ते १५ वर्षे, १६ ते २५ वर्षे आणि २५ च्या पुढे अशा गटामध्ये हा भोंडला सादर होणार आहे. स्पर्धकांचा पोशाख पारंपरिक, मराठी पद्धतीचा असावा असे अवाहन आयोजकांनी केले आहे. संपर्क- ९३२३३३८०१४ किंवा २५३०१८३१
’कधी- शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता
’कुठे-उमा निळकंठ व्यायाम शाळेचे मैदान, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे(प.).

मला भावलेले व.पु.
बदलापुरातील अक्षरसंध्या वाचक कट्टय़ावर ‘मला भावलेले व.पु.’ या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व.पु. काळे यांच्या साहित्यावर मनमोकळा संवाद साधण्यात येणार आहे. काका गोळे फाऊंडेशन व ग्रंथसखा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष करून वाचकांसाठी स्थापन झालेल्या या कट्टय़ावर व.पु. काळे यांच्या साहित्यात रुची ठेवणारे वाचक एकत्र येत त्यांच्या साहित्यावर चर्चा करणार आहेत. तसेच या वेळी, व. पु. काळे यांच्या कन्या स्वाती चांदोरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी व अन्य वाचक चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे, या विनामूल्य कार्यक्रमाला शहरातील रसिक वाचकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
’कधी- रविवारी, १८ ऑक्टोबर २०१५ला, सायंकाळी ६.०० वाजता
’कुठे- काका गोळे फाऊंडेशन, तलाठी कार्यालयाजवळ, बदलापूर (पू.).

कैलास मान-सरोवरच्या आठवणीत.
बदलापुरातील प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे कैलास मानसरोवर यात्रेवर अभ्यासपूर्ण व्याख्यान व स्लाइड-शोचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी डोंबिवलीहून कैलास मानसरोवरची यात्रा पूर्ण केलेले खास वक्ते विकास पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या विनामूल्य कार्यक्रमाला शहरातील रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
’कुठे- काका गोळे फाऊंडेशन, अखिल सोसायटी, तलाठी कार्यालयाजवळ, बदलापूर (पू.)
’कधी- शनिवारी दि. १७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता.
‘ठण ठण गोपाळ’ चित्रपटाचा चमू अभिनय कट्टय़ावर
अभिनय कट्टातर्फे ‘ठण ठण गोपाळ’ चित्रपटाच्या चमूशी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी चित्रपटातील कलाकार प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी, जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट, बालकलाकार विवेक चाबुकस्वार आणि दिग्दर्शक कार्तिक शेट्टी आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत.
’कधी- रविवार, १८ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता.
दुर्गापूजेसाठी बंगाली गोडाचा बेत
नवरात्रोत्सवची धामधूम आणि दुर्गापूजेची तयारी ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून कोरम मॉल, ठाणेतर्फे बंगाली गोड पदार्थ बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये मिश्ती दोई, सोंदेश, मलाई चोम चोम, रसमलाई, कालो जाम (काळा गुलाबजाम) असे गोड पदार्थ बनविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
’कधी : बुधवार २१ ऑक्टोबर, वेळ : दुपारी ३ ते रात्री ८
’कुठे : कोरम मॉल, मंगल पांडे मार्ग, कॅडबरी कंपाऊंडजवळ, पूर्व द्रुतगती मार्ग, ठाणे (प.)

डॉ. विकास आमटे यांच्याशी संवाद
घंटाळी मित्र मंडळातर्फे ‘आनंदवन-काल, आज व उद्या’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच आनंदवनाची उत्पादने व प्रकाशने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सहयोग मंदिर, तिसरा मजला, घंटाळी, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.
’कधी- शनिवार, १७ ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० वाजता
’कुठे-सहयोग मंदिर, तिसरा मजला, घंटाळी, ठाणे(प.)

कुंचल्याची कला..
बिग आर्ट इन्स्टिटय़ूटतर्फे ‘फाइन आर्ट’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लॅण्डस्केप व पोट्र्रेटचे प्रात्यक्षिकासह दाखविले जाणार आहे. फाइन आर्टचा भविष्यात फॅशन, अ‍ॅनिमेशन, फिल्म, टीव्ही, डिझायनिंग, इव्हेंट्स आदी क्षेत्रात कसा उपयोग होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ही कार्यशाळा रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जोशी-बेडेकर महाविद्यालय, चेंदणी सिडको स्टॉपजवळ, ठाणे (प.) येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-९९३०८०४५२२.
’कधी- रविवार, १८ सकाळी १० ते दुपारी १
’कुठे- जोशी-बेडेकर महाविद्यालय, चेंदणी सिडको स्टॉपजवळ, ठाणे (प.)