weekend-thगीता दत्त, नूरजहाँ, सुरैया, शमशाद बेगम, मुबारक बैगम, उमादेवी, या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगातील कलाकारांच्या बाबूजी धिरे चलाना, लेके पहला पहला प्यार, कजरा मोहब्बत वाला, मेरे आसुंओ पे ना मुस्कुराना अशा अजरामर गाण्यांची पर्वणी खास ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आली आहे. येथील ब्रह्मांड कट्टय़ाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘हमारी याद आएगी’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायिका अश्विनी ताम्हणे गाणी सादर करणार आहेत.  कार्यक्रम सर्वासाठी खुला राहणार आहे.
 ’कुठे : सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकीमागे, आझाद नगर, ठाणे
’कधी : रविवार, २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता

झटपट पण पौष्टिक
हल्लीच्या धावत्या युगात निरोगी राहणे जरा कठीणच वाटते. वेळेच्याअभावी झटपट मिळणारे खाद्य शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, याचा विसर पडतो. त्यामुळेच कोरम मॉलच्या वतीने दर बुधवारी गृहिणींसाठी नवनवीन पदार्थ शिकवण्याची सोय केलेली आहे. येत्या बुधवारी, २५ मार्च रोजी असेच पौष्टिक खाद्यपदार्थ शिकवण्यात येणार आहेत. यामध्ये तांदळाच्या कागदासारख्या पोळीमध्ये कोशिंबिरीचे सारण भरून तयार केलेले ‘सॅलेड राईस पेपर’, जांभळ्या रंगाच्या कोबीपासून बनविण्यात आलेले ‘पर्पल कॅबेज सॅलेड’, सगळ्यांचा आवडता पदार्थ असणारे चीज वापरून तयार केलेले ‘कॉटेज चीज’, ‘बिट सॅलेड’,’सीजर सॅलेड’ रोममधील एक कोशिंबिरीचा प्रकार आणि लहानापासून मोठय़ांपर्यंत सगळ्याचा आवडता ‘पास्ता सॅलेड’ यावेळी वुमनस् ऑन वेनस्डे च्या कार्यशाळेत शिकवले जाणार आहे.
’कुठे : कोरम मॉल, कॅडबरी कंपाऊंडजवळ, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प), कधी:  दुपारी ३ ते रात्री ८ वाजता

स्वागतयात्रा ‘टिपण्याची’ स्पर्धा
नववर्ष स्वागत यात्रेत सहभाग घेणे हा एक असा क्षण ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, त्याची आठवण म्हणून आपण काही छायाचित्र टिपतो. ठाण्यातील श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि फोटो सर्कल सोसायटीच्यावतीने यंदाच्या स्वागत यात्रेचे सवरेतकृष्ट छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकाराला पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. २० व २१ मार्च दरम्यान ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेचे किंवा दीपोत्सवाचे ८ बाय १२ या आकाराचे छायाचित्र संजोग फोटो स्टुडियो, दुकान क्र.५, सोपान सोसायटी, गजानन महाराज चौक, राम मारुती रोड, ठाणे(प) येथे स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – वेदिका भार्गवे : ९८१९७७९०८

भीमाशंकरची भ्रमंती
रोजच्या रूटीनचा कंटाळा आला असेल तर काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात जाणे हा एकमेव उपाय आहे. पुणे जिल्ह्य़ातील भीमाशंकर अभयारण्य हे त्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पुणे जिल्ह्य़ात असलेल्या भीमाशंकर अभयारण्याचा विस्तार ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ापर्यंत पसरलेला आहे. येथे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक मानले गेलेले शंकराचे मंदिर आहे. घनदाट सदाहरित वने, पानगळीची वने, खुरटय़ा वनस्पतींनी येथे जंगल समृद्ध आहे. भीमा नदी, घोड या नद्यांबरोबरच विविध जलस्रोत या अभयारण्यात आहेत. मुंबईच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलातील दुर्मीळ असे प्राणी, पक्षी येथे पाहायला मिळतात. आता ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंचतर्फे निसर्गाचा हा खजिना पाहण्यासाठी खास भटकंती आयोजित करण्यात आली आहे. २८ व २९ मार्च रोजी भीमाशंकर येथे ‘निसर्ग भटकंती’ आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी संपर्क : २५३८०६४८, ९८९२०६१८९९
’कुठे : भीमाशंकर
’कधी : २८ व २९ मार्च

‘अपणो राजस्थान’
गांवदेवी येथील आर्य क्रीडा मंडळ येथे सध्या ‘अपणो राजस्थान’ हा खास राजस्थानी खाद्य महोत्सव सुरू आहे.  ‘चाट’मध्य़े दाल बाटी चुरमा, मुंगदाल कचोरी,
प्याज कचोरी, जोधपूरी मावा कचोरी, आलू पनीर टिक्की, पापडी चाट असे अनेक जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ येथे उपलब्ध आहेत. तसेच गोड पदार्थामध्ये राजस्थानी पद्धतीने बनवलेला गाजर हलवा, मूंगदाल हलवा, बिकानेरी केसरी जिलेबी, असे हलव्याचे विविध प्रकार येथे आपल्याला खायला मिळतील. जोधपुरी मिर्ची वडा, आलू पनीर टिक्की, मूंगदाल पकौडी, छोले भटूरे आदी पदार्थातही येथे आपल्याला मिळतात. तसेच जेवणानंतर केसर दुधाचा पर्यायही येथे उपलब्ध आहे. या पदार्थाची नावे ऐकली तरी तोंडाला पाणी सुटते. मग खाण्याची मज्जा काही औरच असेल. गावदेवी मैदानावर सध्या राजस्थानी हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन सुरू आहे. सोमवार २३ मार्चपर्यंत दुपारी २.३० ते रात्री १० पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.  
’कुठे : आर्य क्रीडा मंडळ, गावदेवी मैदानाशेजारी, ठाणे
’कधी : सोमवापर्यंत दुपारी २.३० ते रात्री १०

शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाटय़ संगीताची मैफल
कल्याणकरांची नववर्ष पहाट सुरेल सुरांच्या साथीने व्हावी यासाठी कल्याण गायन समाज यासंस्थेतर्फेसंचालित दिनकर संगीत विद्यालयाच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी ज्योती खरे-यादवार यांच्या शास्त्रीय,उपशास्त्रीय व नाटय़संगीताच्या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हार्मोनियमवर प्रकाश चिटणीस, तर तबल्यावर शेखर खांबटे हे त्यांना साथ देणार आहेत. रवींद्र लाखे हे रसिकांशी सुसंवाद साधतील.
’कुठे: कल्याण गायन समाज वास्तूतील पांडुरंग-प्रभा सभागृह, कल्याण (प)
’कधी : रविवार, २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता

‘दैविक अभिव्यक्ती’चे दर्शन
तळ्याकाठी असणाऱ्या सुंदर घराचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. अशा प्रकारच्या निसर्गावर आधारित चित्रांना ‘दैविक अभिव्यक्ती’ किंवा ‘परावर्तन’ दर्शवणारे चित्र असे म्हणतात. ठाण्यातील जे.जे.स्कूल आर्टस्चा विद्यार्थी दिनेश गणपत निवाळकर यांच्या ‘दैविक अभिव्यक्ती’ या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन ठाण्यात भरवण्यात आले आहे. दिनेश यांनी रेखाटलेली २१ चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. तैल रंग आणि एक्रिलिक रंग वापरून निसर्गाचे सुदंर चित्र त्यांनी या प्रदर्शनामध्ये मांडले आहे.
’कुठे : ठाणे कला भवन, बिग बझारजवळ, कापूरबावडी, ठाणे (प)
’कधी : रविवापर्यंत सकाळी ११ ते सायं. ७.

कला उत्सवांचे कल्याण
फाल्गुन महिना सरत आला असून सगळ्यांना नवीन वर्षांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. अशा या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध शहरात विविध उपक्रम, स्पर्धाचे वारे वाहू लागले आहेत. नववर्षांच्या या मोसमात कल्याण संस्कृती मंचाने कल्याणकरांसाठी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हा कला महोत्सव आयोजित केला आहे. कल्याण शहराने कला क्षेत्राला अनेक नामवंत कलाकार दिले आणि असेच अनेक नवोदित कलाकारही आपल्या कलेची जोपासना करतांना कल्याणमध्ये दिसतात. चित्रकला, हस्तकला, सुलेखन कला (कॅलीग्राफी), शिल्पकला, पाककला, नृत्य, नाटय़, संगीत, गायन, वादन, रांगोळी, मेहंदी, छायाचित्रण अशा विविध कला सादर करण्याची संधी या महोत्सवात कल्याणातील कलाकारांना या निमित्ताने मिळणार आहे.
’कुठे :  कल्याण पश्चिमेतील साई चौक
’कधी:  शुक्रवारी सायंकाळी ५ ते रात्री १०.
संकलन : शलाका सरफरे