News Flash

एकादशीनिमित्त पर्यावरण दिंडी

तरुणांनी आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे महत्त्व समजून ही संस्कृती आत्मसात, समरस केली, तर पुढील जीवन एका वेगळ्या दिशेने जगता येते याची जाणीव व्हावी,

| July 30, 2015 02:15 am

tvlog01तरुणांनी आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे महत्त्व समजून ही संस्कृती आत्मसात, समरस केली, तर पुढील जीवन एका वेगळ्या दिशेने जगता येते याची जाणीव व्हावी, या उद्देशाने पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, असे मत आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते यांनी व्यक्त केले. त्या ठाण्यातील रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातर्फे सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. दिंडी सोहळ्याद्वारे संस्कृतिरक्षण व पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला.
टाळ-मृदुंगाच्या गजरात आनंद विश्व गुरुकुल येथून निघालेली ही पालखी दिंडी रघुनाथनगर, मुलुंड चेकनाका, दत्तमंदिर ते पुन्हा आनंद विश्व गुरुकुल येथे विसर्जित झाली. अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. आपल्या संस्कृतीचे जतन करणारे आणि पर्यावरणाचा संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. लेझीम पथक, अश्वरूढ झालेला बालशिवाजी आणि टाळ-मृदंग पथक दिंडीचे खास आकर्षण ठरले. संस्थेचे उपाध्यक्ष विलास ठुसे, सचिव प्रा. प्रदीप ढवळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते व प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, उपप्राचार्या दीपिका तलाठी, प्राध्यापक सचिन आंबेगावकर, लक्ष्मी रामचंद्रन, सांस्कृतिक विभाग प्रमुख मंदार टिल्लू, प्रा. विनायक जोशी, प्रा. संजय चौधरी, प्रा. सुयश प्रधान आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. आषाढी एकादशी दिनी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणे सर्वानाच शक्य नसते; परंतु अशा पालखी दिंडीतून विठ्ठलाचे दर्शन शक्य होते, असे विचार संस्थेचे सचिव प्रा. प्रदीप ढवळ यांनी बोलतांना व्यक्त केले.

कुलगुरूंच्या हस्ते महाविद्यालयांचा सत्कार
ठाणे : रक्तदान कार्यात अलीकडे महाविद्यालयेसुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रक्तदान शिबिराविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम करत असतात.
मुंबई विद्यापीठ संलग्न राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे  २०१४ ते २०१५ या वर्षभरात जास्तीत जास्त रक्त जमा करणाऱ्या महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा सत्कार नुकताच मुंबईमध्ये कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला.
ठाणे जिल्ह्य़ातील एस.एस.टी. महाविद्यालय, उल्हासनगर, मॉडेल महाविद्यालय, डोंबिवली, वा. ना. बांदोडकर महाविद्यालय, ठाणे या तीन महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा आयोगाचा सत्कार या वेळी करण्यात आला. यात एस.एस.टी. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने एकदिवसीय रक्तदान शिबिरात ३२५ रक्त बाटल्या जमा करून इतर महाविद्यालयांपेक्षा जास्त रक्त जमा करून प्रथम क्रमांक पटकावला. २७ जुलै रोजी विद्यापीठ विद्यार्थी भवन चर्चगेट येथे या महाविद्यालयाचा सत्कार कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख नीलेश कारभारी, प्राचार्य जे. सी. पुरुसवानी आणि प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. यात महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वप्निल जाधव याला उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरवण्यात आले.

नवयुवकांनी लष्करात यावे!
अ‍ॅड. राजीव पांडे यांचे आवाहन
ठाणे : आजचा युवक वास्तव्यापेक्षा स्वप्नरंजनात जास्त रमतो. त्यामुळे त्याची प्रगती थांबते. त्यापेक्षा कारगिल युद्धासारख्या घटनांतून प्रेरणा घेऊन नवयुवकांनी लष्करात जाण्याचा चंग बांधावा हेच कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार अ‍ॅड. राजीव पांडे यांनी काढले.
जोशी-बेडेकर महाविद्यालयातील एन.सी.सी. नेव्हल आणि आर्मी गल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘कारगिल विजय दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह उपस्थित होत्या. या वेळी डॉ. प्रा. दीपक साबळे, प्रा. माधवी उपस्थित होते. या वेळी बोलताना अ‍ॅड. राजीव पांडे म्हणाले की, काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा राहिलेला नसून तो भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेतून सोडविण्याची गरज आहे. जम्मू काश्मीरमधील जनता दहशतवादाला कंटाळली असून त्यांना प्रगती हवी आहे.
हा दिवस त्यागाचा दिवस म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांने लक्षात ठेवावा, असे उद्गार प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी या वेळी बोलताना काढले. सबलेफ्ट. डॉ. दीपक साबळे म्हणाले, आजच्या युवकाला योग्य दिशा दिली, तर राष्ट्रप्रेम अधिक प्रखर होण्यास मदत होईल. एन.सी.सी.च्या माध्यमातून असे युवक घडविण्याचे काम महाविद्यालय करीत आहे. कारगिलसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक तरुणाने जागल्याची भूमिका बजावली पाहिजे, असे विचार या वेळी मांडण्यात आले. प्रा. माधवी जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कॅडेट कॅप्टन प्रशांत सिंह याने उपस्थितांचे आभार मानले.

डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली
ठाणे : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे सोमवारी दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाचे अभिवाचन सलग सात दिवस करण्याचे आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाने ठरवले आहे. सात दिवस सात मान्यवर या पुस्तकाचे वाचन करणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार, २८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता रघुनाथनगर येथील आनंद विश्व गुरुकुलच्या सभागृहात करण्यात आला. पहिल्या दिवशी वृत्तनिवेदिका वासंती वर्तक यांनी अभिवाचनास सुरुवात केली असून पुढील दिवशी अशोक चिटणीस, डॉ. महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, मिलिंद बल्लाळ, अशोक बागवे आणि उदय निरगुडकर अभिवाचन करणार आहेत, अशी माहिती प्राचार्या हर्षला लिखिते यांनी दिली.
दरम्यान, आदर्श महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. यानिमित्ताने कलाम यांच्या पुस्तकांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. एका विद्यार्थ्यांने त्यांचे चित्र चितारून त्यांना आदरांजली वाहिली. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांनी कलाम यांनी भारतीयांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचे वाचन केले.

व्यक्तिमत्त्व विकास शिबिर
ठाणे : सध्याच्या स्पर्धेच्या युगात  विद्यार्थिदशेत असतानाच आत्मविश्वास, चांगले वक्तृत्व याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालयात करियर मार्गदर्शन, प्लेसमेंट सेल आणि माजी विद्यार्थी यांच्या सहभागाने व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत ‘स्पिरिच्युअल सोल’ संस्थेमार्फत व्यक्तिमत्त्व विकास विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात संस्थेचे संस्थापक विनोद सुवर्णा, हर्षां सुवर्णा आणि विजय धवन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मुक्त संवाद साधून मानसिक त्रासापासून दूर राहण्यासाठी हास्य, नृत्य यांसारखे उपचारात्मक उपाय सुचवले. महाविद्यालयातील शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली जाधव हिने केले.

संगीतकार नीलेश मोहरीर याच्यासोबत गप्पा
 ठाणे :मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ३१ जुलै रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. गेली ३१ वर्षे वझे केळकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. महाविद्यालयास सुरुवात झाली की, मराठी वाङ्मय मंडळात नावनोंदणी करण्यासाठी अनेक विदय़ार्थी उत्सुक असतात. याही वर्षी वझे केळकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळात ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाच्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच मंडळाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रसिद्ध संगीतकार नीलेश मोहरीर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रसंगी विद्यार्थी संगीतकार नीलेश मोहरीर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडणार आहेत.

बिर्ला महाविद्यालयातर्फे वृक्षदिंडी
कल्याण : वृक्षमित्र संघटना आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी २ ऑगस्ट रोजी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, सेंचुरी रेयॉन कंपनी शहाड, सामाजिक संस्था यांच्यातर्फे ही वृक्षदिंडी होणार आहे. वृक्षदिंडीची सुरुवात बिर्ला महाविद्यालयापासून होणार असून कल्याण शहरातील अनेक संस्थांचे वृक्षरथ यात सहभागी होणार आहेत.

निसर्गाशी समरूप करणारा ‘नेचर ट्रेक’
ठाणे : निसर्गाची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने रुईया कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘नेचर क्लब’ या उपक्रमाअंतर्गत रविवारी बदलापूरजवळील कोंडेश्वर येथे निसर्ग भटकंती आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाविद्यालयाचे ५१ विद्यार्थी व पंधरा शिक्षक सहभागी झाले होते. कला आणि शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी कोंडेश्वर परिसरातील निसर्गश्रीमंतीचा आढावा घेतला. काही काळासाठी या विद्यार्थ्यांनी काँक्रीटच्या जंगलातून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 2:15 am

Web Title: event and festival in thane colleges 5
Next Stories
1 तंत्रकुशल ग्रंथसेवा..
2 कानसेन : हिंदी संगीताचा ‘सुवर्ण’काळ
3 ठाण्याच्या सहयोग मंदिर येथे पार्किंगची आवश्यकता
Just Now!
X