News Flash

‘सीएचएम’तर्फे वृद्ध, कुष्ठरोगी नागरिकांना दिवाळी भेट

सी. एच. एम. महाविद्यालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेता विनोद गायकर हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थीही दिवाळी भेट कार्यक्रमात सहभागी झाली होती.

ठाणे : उल्हासनगरच्या सी. एच. एम. महाविद्यालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सी. एच. एम. महाविद्यालयातर्फे दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने पनवेलजवळील नेरे गावातील शांतिवन आश्रमाला भेट दिली जाते. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शांतिवन या ठिकाणी रविवार ८ नोव्हेंबर रोजी कुष्ठरोगी, वृद्ध नागरिक आणि अति विकलांग मुले यांच्यासमवेत दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी विवेक गायकवाड आणि हेमंती कुलकर्णी यांनी या शांतिवन भेटीचे यंदा आयोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेता विनोद गायकर हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थीही दिवाळी भेट कार्यक्रमात सहभागी झाली होती. महाविद्यालयातर्फे कुष्ठरोगी, वृद्ध नागरिकांसाठी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग, प्रेमगीते अशा विविध धाटणीच्या गाण्यांचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे अभिनेता विनोद गायकर याने या ठिकाणी पथनाटय़ सादर केले.
सीएचएम महाविद्यालयातर्फे गेल्या १५ वर्षांपासून दिवाळीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी अभिनेत्री जुई गडकरी या कार्यक्रमात सहभागी होत आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती आगाशे हिने जुई गडकरी यांची मुलाखत घेतली. जुई गडकरीबरोबरच अभिनेता प्रसाद गोखले हे प्रथमच या उपक्रमात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या लहान मुलांनीही या उपक्रमात सहभागी होत सामाजिक उपक्रमांचा संदेश दिला. महाविद्यालयाच्या एकूण १५ माजी विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला.
महाविद्यालयीन शिक्षणासोबत समाजकार्य
जोशी-बेडेकर महाविद्यालय
tv122 ठाणे : परीक्षा संपवून महाविद्यालयीन विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेत असताना. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी मात्र राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत वार्षिक शिबिरांच्या तयारीत मग्न आहेत. सामाजिक कार्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्राम विकासाचाही प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासोबत विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्टय़ा प्रगती करण्यासोबतच त्यांची सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना विविध उपक्रम नियोजित करून देण्यात आले आहेत. या महाविद्यालयीन उपक्रमांपैकी सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. प्रत्येक महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना युनिट कार्यरत आहेत. सामाजिक जाणीव असलेले आणि सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणारे विद्यार्थी या उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य पूर्ण करतात. राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी वार्षिक दिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महाविद्यालयातर्फे या सहलीचे आयोजन होत असते. जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि वा. ना. बांदोडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक सहलीचे आयोजन विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे.

राष्ट्रीय सेवा योजना या युनिटअंतर्गत १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत वार्षिक शिबीर जाणार आहे. मामनोली येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ८० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी होणार आहेत. मुंबई विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेला पाच वर्षांसाठी एक गाव विकासासाठी ठरवून दिले आहे. मामनोली भागातील आदिवासी पाडय़ात हे विद्यार्थी जाऊन या परिसरात श्रमदान करतात. या शिबिरामध्ये श्रमदान हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. यंदाच्या वर्षी जोशी-बेडेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी श्रमदान या उपक्रमाच्या अंतर्गत आदिवासी पाडय़ामध्ये स्वच्छता अभियान, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डे तयार करणे, शौचालयासाठी खड्डे तयार करणे यांसारखी सामाजिक कामे करणार आहेत. केवळ सामाजिक उपक्रम या शिबिरामध्ये न घेता स्वयंसेवकांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्यावर भर दिला जातो. सहलीमध्ये स्वयंसेवकांसाठी प्रेझेंटेशन्स, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या शिबिराचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठाकडून परवानगी मिळवणे, कॅम्पची जागा निश्चित करणे, संशोधक व्यक्ती यांच्या तारखा मिळवणे यांसारख्या कामांची आखणी करावी लागते, अशी माहिती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल्ल भोसले यांनी दिली. मामनोली गावातील शाळांमध्ये लैंगिक शिक्षण, प्रदूषण नियंत्रण यांसारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांकडून या गावातील रस्ते स्वच्छ करणे, शिल्लक वह्य़ांच्या पानांपासून नवीन वह्य़ा तयार करून त्यांचे वाटप करणे यांसारखे उपक्रम हाती घेतले आहेत.

बा. ना. बांदोडकर महाविद्यालय
tv166राष्ट्रीय सेवा योजनेचे यंदाचे शिबीर २५ डिसेंबर ते १ जानेवारी या दरम्यान विक्रमगड येथे आयोजित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे एकूण १०० विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. विक्रमगड विभागातील शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाविद्यालयाचे विद्यार्थी आयोजित करणार आहेत. श्रमदान या उपक्रमाच्या अंतर्गत मोकळ्या सुपीक जागेत जंगली भाज्यांची लागवड करणे, कम्पोस्ट खत तयार करणे यांसारखी कामे केली जाणार आहेत. या विभागात असणाऱ्या बेहेर्जे नदीवर जाण्यासाठी तिथल्या शाळकरी मुलांना काही सोय नाही. विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन या नदीपर्यंत पोहोचण्यासाठी बांदोडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी पायऱ्या बांधणार आहेत. याशिवाय स्वच्छ भारत अभियान जागृती कार्यक्रम हाती घेणार आहेत.

ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये ई-कचरा व्यवस्थापन
ठाणे : तरुणांमध्ये सर्वार्थाने बदल घडवून आणण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. हल्लीच्या तरुण पिढीचा कल इलेक्ट्रॉनिक उपकरणांकडे सर्वाधिक आहे, परंतु त्यापासून होणाऱ्या दुष्परिणांमाची तेवढी गांभीर्यता त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे ई-कचरा व्यवस्थापन हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. ई-कचऱ्याची विल्हेवाट कशाप्रकारे करावी यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनही महाविद्यालयामध्ये दिले जाणार आहे. ईलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कमीत कमी वापर करणे हा नियोजनाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी महाविद्यालय व्यवस्थापन प्रयत्न करीत आहे. ई-कचरा व्यवस्थापनातील प्रमुख अडचण म्हणजे लोकांमध्ये असलेली अपुरी जनजागृती आहे. विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत, म्हणून या उपक्रमाची सुरुवात ही महाविद्यालयातून व्हावी, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मोबाइलचा वापर वाढला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहावे लागते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या वाढत्या वापराचे परिमार्जन ई-कचऱ्यात होते. दुसरी एक प्रमुख समस्या म्हणजे ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी असलेली अपुरी जागा. या दोन कारणांमुळे ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे भविष्यातील मोठे आव्हान ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 2:05 am

Web Title: event and festival in thane colleges 9
Next Stories
1 खेळ मैदान : अंबरनाथवर ‘फुटबॉल ज्वर’
2 ऐतिहासिक वारसा धोक्यात! नालासोपाऱ्यातील अडीच हजार वर्षे जुन्या बौद्धस्तुपाची दुरवस्था
3 ‘डी मार्ट’च्या लिफ्टमध्ये बालकासह नऊ जण अडकले
Just Now!
X