महाविद्यालयातील अखेरचे दिवस जवळ येऊ लागताच विद्यार्थ्यांच्या मनात कोलाहल सुरू होतो तो या जागेत घालविलेल्या आठवणींचा. मित्रमैत्रिणींसोबत बंक केलेल्या अभ्यासाच्या तासिका, सर्वानी मिळून केलेले महोत्सवाचे आयोजन, कँटीनचा एखादा खास पदार्थ, जिवाभावाने जोडलेले मित्र, वर्गातल्या बाकावर कधीही न पुसल्या जाणाऱ्या कोरलेल्या नावांच्या जोडय़ा, स्पर्धासाठी केलेल्या तालमी हे क्षण पुन्हा कधीही अनुभवता येणार नाहीत याची जाणीव विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांला होते. महाविद्यालयात निरोप समारंभ होतो आणि आठवणींची आळवणी या समारंभात होऊन प्रत्येक जण महाविद्यालयातून बाहेर पडतो. या सगळ्यात आवर्जून आठवणीत राहणारा महाविद्यालयाचा कट्टा प्रत्येकासाठी एक वेगळी आठवण ठेवणारा असतो. वर्षांनुवर्षे ज्या कट्टय़ावर वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींचा हास्यकल्लोळ होत असतो तो कट्टा मात्र प्रत्येक वर्षी नव्या विद्यार्थ्यांसाठी सारख्याच भावना देणारा असतो. काही महाविद्यालयांमध्ये निरोप समारंभ पार पडला आहे, तर काही ठिकाणी निरोपाची तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या आठवणींना दिलेला उजाळा..

कट्टय़ावरील आठवणी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
वर्गातील शेवटचा बाक हीच आठवण
महाविद्यालयातील प्रत्येक दिवस आठवणीत राहण्यासारखाच आहे. आदर्श महाविद्यालयातील वातावरणाला प्राध्यापकांच्या प्रेमाचा स्पर्श आहे. त्यामुळे महाविद्यालयातून बाहेर पडलो तरी पुन्हा महाविद्यालयात येण्याची ओढ कायम राहील. यात सर्वात जास्त आठवेल तो वर्गातील शेवटचा बाक. या बाकावर बसून लेक्चरला केलेली धमाल कधीच विसरता येऊ शकत नाही.
– सुजित देशमुख, आदर्श महाविद्यालय

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

कट्टय़ाने आत्मविश्वास दिला..
महाविद्यालयात प्रवेश केल्यावर नवीन वातावरणात स्वत:ला सिद्ध करण्याची मनात धाकधूक होती. मात्र आदर्श महाविद्यालयाच्या कट्टय़ाने आत्मविश्वास दिला. मित्रमैत्रिणींसमोर काहीही सादर करण्याचे बळ कट्टय़ाने दिले. आत्मविश्वास वाढल्याने सभाधीटपणा वाढला आणि स्वत:ला सिद्ध करण्याची ऊर्मी या कट्टय़ाने दिली. त्यामुळे हा आदर्श कट्टा कायम स्मरणात राहील.
– सूरज गभाळे, आदर्श महाविद्यालय

ज्ञानपथ कट्टा कायम आठवणीत
तासिका संपल्यावर आम्हा मित्रमंडळींचा ताफा ज्ञानपथाकडे वळायचा. ज्ञानपथ असे ठिकाण होते जिथे खेळ, चर्चा व्हायच्या. महाविद्यालयाच्या आठवणी मनात आहेतच, मात्र महाविद्यालयातील मित्रांना भेटण्याचा हा एकमेव कट्टा कायम आठवणीत राहील. महाविद्यालयात पुन्हा येऊ तेव्हा मित्रमंडळींच्या गप्पा ज्ञानपथावरच रंगतील.
– प्रणय भोईर, जोशी-बेडेकर महाविद्यालय

कॅरम बोर्डची धमाल
कॅरम खेळणे कधीही आवडते. त्यात महाविद्यालयात कॅरम खेळण्यासाठी जमल्यावर जी धमाल केली ती आठवणीत राहील. कॅरम खेळायला गेलो की तासन्तास गप्पा मारत जिंकण्याची आणि हरण्याची मजा काही औरच होती. महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर कॅरम खेळता येईल, मात्र महाविद्यालयातील कॅरम बोर्डवर मित्रांसोबत खेळण्याची मजा अनुभवता येणार नाही, याची खंत आहे.
– शिवानी दातार, वझे-केळकर महाविद्यालय

विचारमंथनाचा ‘आदर्श’ कट्टा
क्षितिजा घाणेकर, युवा वार्ताहर
महाविद्यालयात प्रवेश करतानाच तासिकेला जाण्याआधी ज्या ठिकाणी आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी रमतात, तो आदर्श कट्टा. इतर महाविद्यालयांप्रमाणे हा कट्टा स्वतंत्र नाही, मात्र आदर्श महाविद्यालयात शिकून बाहेर पडलेल्या अनेकांना हा कट्टा खुणावतो. तरुणांचा कोणताही कट्टा म्हटल्यावर त्या ठिकाणी धमाल, मस्ती आलीच. शिस्तीचे पालन वगैरे कट्टय़ावर होत नाही. आदर्श कट्टा मात्र महाविद्यालयाच्या आवारातच असल्याने विद्यार्थ्यांना कायम शिस्तीचे भान राखावे लागते. व्यासपीठासमोर उभे राहण्यासाठी घाबरणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या कट्टय़ाने आत्मविश्वास दिला.

कट्टय़ावरील चर्चा आणि कार्यक्रमांचे नियोजन
आदर्श कट्टय़ावर इतर धम्माल, मस्ती यापेक्षा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या चर्चा जास्त रंगल्या. वक्तृत्व, वादविवादाच्या तालमी या कट्टय़ावर होत असल्याने विचारांनी समृद्ध करणारा हा कट्टा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहतो. मनोरंजनासाठी जमलेल्या इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला या कट्टय़ाने आजूबाजूला असणाऱ्या प्राध्यापकांच्या अस्तित्वामुळे शिस्त शिकवली. महाविद्यालयात तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाची तयारी सुरू होईल. या समारंभातही कट्ट्य़ावरच्या आठवणींना स्थान असेलच.

जोशी-बेडेकरचा ज्ञानपथ आणि कारंजा कट्टा
ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची गर्दी दिसली तरी सकाळी महाविद्यालयात प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांना उल्हसित करणारा कारंजा कट्टा नेहमीच आकर्षित करतो. तासिकेसाठी वर्गात जाण्याआधी विद्यार्थी या कारंज्याच्या सहवासात कट्टय़ावर रमतात. सकाळच्या वेळी कारंजावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे तयार होणारे इंद्रधनुष्य पाहण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवरत नाही. या महाविद्यालयाला निरोप देताना कारंजा कट्टय़ाची आठवण मनात कायम असते. याशिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करता यावा, विविध विषयांवर चर्चा करता यावी यासाठी महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपथ तयार करण्यात आला आहे. ज्ञानपथ कट्टय़ाजवळ संध्याकाळच्या वेळी अनेक विद्यार्थी वेळ व्यतीत करतात. लघुपट बनवण्यासाठी ही जागा योग्य असल्याने प्रकल्पासाठी ज्ञानपथावर बनवलेले लघुपट आठवणींच्या स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असतात. आजबाजूची हिरवाई आणि मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण यामुळे ज्ञानपथ विद्यार्थ्यांना स्मरणात राहतो. या ज्ञानपथाच्या सहवासात मोठे झालेले अनेक विद्यार्थी आजही यंदा पत्रकारितेच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ काही विद्यार्थ्यांनी आयोजित केला आहे. महाविद्यालयाच्या आठवणींची चित्रफीत समारंभात दाखवण्यात येणार आहे.

कॅरम खेळण्याची धम्माल आणि कँटीन हेच विश्व
वझे-केळकर महाविद्यालयाच्या आजबाजूच्या परिसरात तरुणांना रेंगाळण्यासाठी योग्य असा कट्टा नसल्याने महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचा कॅरम खेळण्याकडे कल दिसतो. कॅरम खेळण्याच्या जागेला आणि कँटीनलाच मस्तीचा कट्टा मानून त्या ठिकाणी विद्यार्थी रेंगाळतात. तासिका संपल्यावर विद्यार्थ्यांचा चमू या कॅरम खेळण्यासाठी वळतो. सराव करत असलेले खेळाडू पाहणे, मित्रमैत्रिणींसोबत या कॅरम बोर्डपाशी रेंगाळणे हे विद्यार्थ्यांचे नित्याचे काम. वझे केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आवडीचा कट्टा म्हणजे महाविद्यालयाचे कँटीन. या कँटीनमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थाची चव घेत मित्रमैत्रिणींचे समूह अगदी संध्याकाळपर्यंत चहाचे प्याले रिचवताना दिसतात. गं्रथालयात चर्चेतून अभ्यास करता येत नाही म्हणून परीक्षेच्या काळात कँटीनमध्येसुद्धा पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांची गर्दी असते. नुकताच वझे केळकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विभागाचा निरोप समारंभ पार पडला.

निरोप समारंभाची धमाल स्लीपिंग डय़ुटी अ‍ॅवॉर्ड
निरोप समारंभात ‘स्लीपिंग डय़ुटी’ हा पुरस्कारही देण्यात आला. तासिकेदरम्यान सर्वात जास्त झोपणाऱ्या विद्यार्थ्यांला हा पुरस्कार दिला गेला.
बंकर्स अ‍ॅवॉर्ड
सर्वात जास्त तासिकेला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांला बंकर्स अ‍ॅवॉर्ड दिला गेला. सायलेन्सर अ‍ॅवॉर्ड, पॉप्युलर गर्ल्स अँड बॉय अशी काही मजेशीर बक्षिसे निरोप समारंभात देण्यात आली. कँटीनच्या आणि बॅडमिंटन कोर्टच्या आठवणी जाग्या ठेवत तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा निरोप घेतला.

जीवनदीपच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची ‘संसद भेट’
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयाच्या पत्रकारिता आणि संज्ञापन विभागातर्फे दिल्ली येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या अभ्यासदौऱ्यात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भेट दिली.
या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी संसदेला भेट देऊन नुकताच पार पडलेला केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या वेळी विद्यार्थ्यांना संसदेचे कामकाज कसे चालते, अधिवेशने कशी होतात या संदर्भात माहिती मिळाली. संसदेत अभ्यासदौरा आयोजित केल्याने केवळ पुस्तकात वाचलेले किंवा दूरचित्रवाणीवर पाहिलेले अधिवेशन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पाहता आले.
या वेळी विद्यार्थ्यांशी संसदेतील काही मंत्र्यांनी संवाद साधला. तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष चंद्रमौली कुमार प्रसाद यांच्याशी संवाद साधला. वृत्तपत्रातील जाहिरातींबद्दल विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वृत्तपत्र जगण्यासाठी जाहिराती महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे फक्त वृत्तपत्रांच्या जाहिरातींचा बाऊ केला जाऊ नये. वृत्तपत्रकारिता जगली पाहिजे हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. वृत्तवाहिनी कार्यालयालादेखील भेट देण्यात आली. या ८ दिवसांच्या अभ्यासदौऱ्यात महाविद्यालयाचे १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. लाल किल्ला, कुतुबमिनार, इंडिया गेट, आग्रा किल्ला आणि ताजमहाल अशा ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.

‘सिवोल्यूशन’ महोत्सवाच्या माध्यमातून बांधकामाचे धडे
मानसी जोशी, युवा वार्ताहर
शेलू येथील जी.वी. आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागाचा सिवोल्यूशन महोत्सव नुकताच पार पडला. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. अन्य महाविद्यालयांच्या सांस्कृतिक महोत्सव साजरे करण्याच्या परंपरेला छेद देत जी.वी. आचार्य महाविद्यालयाच्या महोत्सवात अभ्यासोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या ठरावीक विषयाबद्दलच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल अशा प्रकारच्या विविध स्पर्धाचे आयोजन महोत्सवात पाहायला मिळाले. श्रीराम पॉलिटेक्निक, जोंधळे महाविद्यालय यांसारख्या महाविद्यालयांसोबत अन्य महाविद्यालयांचे दोनशे विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. अभियांत्रिकी महाविद्यालय विशेष महोत्सव असला तरी इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग महोत्सवात पाहायला मिळाला.
टाकाऊपासून टिकाऊ
वहय़ांच्या पुठ्ठय़ापासून जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवलेली होती. कागद, स्ट्रो, आइस्क्रीमच्या काडय़ा यांपासून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला.
रक्तदानाला उत्तम प्रतिसाद
महाविद्यालयात दर वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. प्लाझ्मा ब्लड बँक येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दान केलेले रक्त जमा करण्यात येते. या वर्षीदेखील १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला होता.

पेपर ब्रिज स्पर्धेची धमाल
पेपर ब्रिज या उपक्रमात विद्यार्थ्यांना वर्तमानपत्राचे कागद पुरवण्यात आले होते. या कागदापासून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वजन पेलू शकणारा पूल तयार करायचा होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या संघांनी प्रयत्नपूर्वक कागदाचे पूल बनवले होते. कागदाच्या पेल्यापासून जास्तीत जास्त वजनासोबत पाण्यावर तरंगेल असे मॉडेल बनवणे, विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील गाव प्लॅनिंग मास्टर या स्पर्धेत तयार करणे अशा स्पर्धामधून विद्यार्थ्यांची कल्पकता पाहायला मिळाली. युनिव्हर्सल महाविद्यालयाच्या आसीम खान या विद्यार्थ्यांने भविष्यात प्रवासाची साधने कोणती असतील, आजच्या काळात वाहतूक कोंडीवर कोणते उपाय योजले जावेत या विषयावर आपली मते मांडली. यावेळी ‘क्विझ ओ सिव्हिल’ स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.