‘क्रिसिलिस’ महोत्सवात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन
ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर
‘तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा व आपल्या मनात होणारी कोणत्याही प्रकारची घुसमट ही आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त करून तिला एक वेगळे आकर्षित असे रूप द्या, असे प्रतिपादन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या क्रिसिलिस महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले. या वर्षीचा क्रिसिलिस महोत्सव हा ‘डिजिटलायझेशन’ या संकल्पनेवर आधारित असल्याने त्याला ‘क्रिसिलिस इम्बार्क’ असे नाव देण्यात आले होते. या महोत्सवात निरनिराळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या परिसरात ‘सोशल नेटवर्किंग’ची चित्रे व प्रतिकृती या लावण्यात आल्या होत्या. व्यवस्थापन विषयाशी संबंधित विविध स्पर्धाचेही या महोत्सवात आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा व्यवस्थापन विभागाचे समन्वयक प्रा. मुर्डेश्वर यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या प्रा. विमुक्ता राजे व प्रा. महेश पाटील यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत घेतली. राष्ट्रीय पारितोषिकप्राप्त झालेल्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटापासून ते समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांचा वास्तवदर्शी चित्रण करणाऱ्या ‘फॅण्ड्री’सारख्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हा या मुलाखतीत उलगडला गेला. माणूस आणि जातीभेद यांचा असलेला समाजजीवनावरील पगडा व त्याचा समाजातील सूक्ष्म गोष्टींवर होणारा सार्वत्रिक परिणाम याचे विश्लेषणदेखील नागराज मंजुळे यांनी विद्यार्थ्यांसमोर केले. ‘सैराट’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनदेखील या वेळी करण्यात आले.

 

एन. के. टी महाविद्यालयाचा वार्षिक समारंभ
प्रतिनिधी ठाणे</strong>
a    ठाण्याच्या शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालयाचा शैक्षणिक २०१५-१६ वर्षांचा पुरस्कार प्रदान समारंभ तसेच २६वा वार्षिक दिन महाविद्यालयाच्या एन.के.टी.टी. सभागृहात उत्साहात साजरा झाला. समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. मनाली लोंढे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
समारंभात महाविद्यालयाच्या ज्या शिक्षकांनी विविध विषयात डॉक्टरेट प्राप्त केली आहे त्यांचा प्रथम सत्कार करण्यात आला. प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षांत उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदके देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक कामगिरीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात उपयुक्त असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना, विविध खेळांच्या स्पर्धा, सांस्कृतिक आविष्कार या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना आंतरमहाविद्यालयीन, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे अशा विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे तसेच पदके प्रदान करण्यात आली. एकूण सहा प्रतिष्ठित स्मृतिचिन्ह सहा विभागांत देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या माध्यमातून भारतातील विविधतेत एकता याचे उपस्थितांना दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी ‘आजच्या महाविद्यालयांनी व त्यातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणांबरोबर विद्यार्थ्यांना देशाचा चांगला नागरिक बनण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे’ असे मत मांडले. तर डॉ. लोंढे यांनी ‘सेल्फी’बद्दलच्या आकर्षणाचा संदर्भ देतानाच ‘विद्यार्थी ‘सेल्फ’ म्हणजे स्वत:च्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणार नाहीत तोपर्यंत त्यांना भविष्यात कोणत्याही यशाची खात्री देता येणार नाही,’ असे परखड विचार मानले.
संपूर्ण समारंभाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयातील आर्ट सर्कलने प्राचार्य डॉ. पी. एम. कारखेले आणि प्रा. आरती सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचे ‘ऋत’ वृत्तपत्र प्रसिद्ध
क्रिसिलिस महोत्सवात विद्यार्थ्यांच्या वृत्तपत्राचे प्रकाशन
भक्ती शेटय़े, युवा वार्ताहर
डिजिटलायजेशनच्या युगात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत देशाचे भवितव्य घडत आहे. याच संकल्पनेला दुजोरा देत जोशी-बेडेकर महाविद्यालयाने जनसंज्ञापन व पत्रकारिता या विभागातर्फे यंदाच्या वर्षी ‘ऋत २०१६’ या वृत्तपत्राचे प्रकाशन केले. डिजिटल माध्यम आणि डिजिटल शिक्षण या संकल्पनेवर आधारित वृत्तपत्राचे प्रकाशन महेश विजापूरकर, रवींद्र मांजरेकर, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डी. एस. मुर्डेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी अणि इंग्रजी या दोन माध्यम विभागाच्या विद्यार्थ्यांनी हे वृत्तपत्र तयार केले आहे.
२०११ साली महाविद्यालयातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पहिले ‘ऋत’ वृत्तपत्र तयार केले. या वर्षी साकारलेल्या ‘ऋत’ वृत्तपत्रात डिजिटलायझेशन संकल्पना उत्तमरीत्या मांडली आहे. सोळा पानांच्या या वृत्तपत्रात विद्यार्थ्यांनी १२ पाने इंग्रजी आणि ४ पाने मराठी असे वृत्तपत्राचे द्विभाषीय विभागीकरण केले. सुरुवातीला कृष्णधवल स्वरूपातील ‘ऋत’ डिजिटलायजेशन युगामुळे आता रंगीत स्वरूपात तयार केला आहे. या वर्षी ‘ऋत’चे सहावे वर्ष आहे. या वृत्तपत्रात विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनवरील फ्री वाय-फाय सुविधा, इंटरनेट ऑनलाइन शिक्षण, पंतप्रधानांचे डिजिटल निवडणुकीकरण, मीडियाचा डिजिटल प्रभाव, मिनी इंडिकेटर या विषयांचा परामर्श विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रात केला. ‘ऋत’चा संपादक हा तृतीय वर्षीय जनसंज्ञापन व पत्रकारितेचा विद्यार्थी अनुराग तिवारी अणि मराठी माध्यमाची विद्यार्थिनी चिन्मयी मेस्त्री यांनी कुशलतेने संपादकीय जबाबदारी निभावली.

गालिबच्या गझलवर स्पर्धा
प्रतिनिधी, ठाणे
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला वाणिज्य महाविद्यलयातील हिंदी विभाग आणि मेन्साना मोनोग्राफ्स यांच्या संयुक्त विद्यमाने गझल वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उर्दू भाषेचे शायर मिर्जा गालिब यांच्या गझलवर आधारित आंतरमहाविद्यालयीन गझल वाचन स्पर्धा बुधवार, १० फेब्रुवारी २०१६ कात्यायन सभागृहात सकाळी ९ वाजता पार पडणार आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या प्राध्यापकांना प्रथम ५००० रुपये, द्वितीय क्रमांक ३००० रुपये आणि तृतीय २००० रुपये अशी रोख पारितोषिके तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रथम ३०००, द्वितीय २०००, तृतीय १००० रुपये पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल ढवळे ९९६९६१६१५५, प्रा. डॉ. जयश्री सिंह ९७५७२७७७३५ यांच्याशी संपर्क साधावा.

ज्ञानसाधना महाविद्यालयात भौतिकशास्त्र प्रकल्प प्रदर्शन
प्रतिनिधी, ठाणे
bठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात एका आगळ्यावेगळ्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. पी. सावळाराम या प्रशस्त सभागृहामध्ये महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध दालनांमधून आपल्या वैज्ञानिक प्रज्ञेचा व कौशल्याचा आणि गेल्या पाच वर्षांत केलेल्या शैक्षणिक सामाजिक जनजागृतीचा लेखाजोखा पाहुण्यांसमोर सादर केला. यामध्ये विविध विज्ञान शाखेतून वेगवेगळ्या विषयांवरील प्रकल्प सादर करण्यात आले. भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी चाळीसहून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन या वेळी मांडले होते. वीज चमकताना व पडताना नेमके काय होते याचा टेबलवरील घडणारा छोटेखानी प्रयोग, तसेच प्रकाशाच्या प्रभेतून एखादी खरी वाटण्याइतपत आभासी प्रतिभा उभी केली. तसेच सर्वच सावल्या कृष्ण असतात हे सत्य विविध रंगीबेरंगी सावल्यांतून सर्वासमोर आणले. या वेळी उत्कृष्ट प्रकल्पाला पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान, प्राचार्य चंद्रशेखर मराठे, विभागप्रमुख डॉ. मुळजकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मॉडेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘वॉक फॉर इंडिया’
प्रतिनिधी, ठाणे
cदेशातील सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर आधारित मॉडेल महाविद्यालयाच्या सेल्फ फायनान्स विभागातर्फे ‘वॉक फॉर इंडिया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वॉक फॉर इंडिया’ या उपक्रमाच्या अंतर्गत देशातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणाऱ्या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्कृती, सामाजिक, पारंपरिक नीतीमूल्ये यांची ओळख करून देणारी ही विद्यार्थ्यांची रॅली डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक ते मॉडेल महाविद्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती.
मुलगी वाचवा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरोग्य, विविध राज्यांतील संस्कृती यांची जागरूकता करणारे चलचित्र, फलक आणि घोषणा याचे सादरीकरण रॅलीत करण्यात आले. स्टॅण्ड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, वेक अप इंडिया असा नारा या वेळी विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आला. गेली आठ वर्षे या रॅलीचे आयोजन मॉडेल महाविद्यालयातर्फे करण्यात येते.

खर्डी महाविद्यालयाचा जीवनदीप महोत्सव
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
fसांस्कृतिक आणि क्रीडा यांचा संगम असलेला ‘जीवनदीप महोत्सव’ नुकताच जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या खर्डी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उत्साहात पार पडला. कलागुणांना वाव देणाऱ्या या महाविद्यालयीन महोत्सवात विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. रांगोळी, भित्तिपत्रक बनवणे आणि चित्रकला या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘लेक वाचवा’, ‘प्रदूषण टाळा आणि पर्यावरण वाचवा’ असा सामाजिक संदेश देण्यात दिला.
‘बेस्ट ऑफ वेस्ट’ या उपक्रमाचे आयोजन महोत्सवात करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त अशा फुलदाणी, तोरण व शोभेच्या टिकाऊ वस्तू तयार केल्या. या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे विद्यार्थ्यांतर्फे त्या वस्तू अनाथ आश्रमांमध्ये भेट देणार आहेत. नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केले तसेच पथनाटय़ाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा, शेतकऱ्यांची आत्महत्या, विद्यार्थी जीवन यांसारखे सामाजिक विषयांचे सादरीकरण केले होते. मेहंदी आणि केशभूषा स्पर्धेकरता महाविद्यालयाच्या विद्यर्थिनींनी मोठय़ा प्रमाणात सहभाग दर्शवला. चित्रपटातील अभिनेत्रींसारखी केशभूषा विद्यार्थिनींनी केली होती, तर मुलांनी विविध प्रकारचे टॅटू काढले होते. भारतातील विविध संस्कृतीतील पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांचा फॅशन शो करण्यात आला होता. यात देशातील विविध धर्माच्या लोकांचा पोशाख विद्यार्थ्यांनी परिधान केला होता. मोबाइल फोटोग्राफी स्पर्धेसाठी निसर्गातील विविध देखावे विद्यार्थ्यांनी आपल्या भ्रमणध्वनी टिपले होते. तसेच अंताक्षरी, सामान्यज्ञान स्पर्धा, एकपात्री अभिनय, मिमिक्री या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले होते. या वर्षीचा ‘मिस अ‍ॅण्ड मिस्टर ऑफ जीवनदीप’ होण्याचा मान किरण घोडे आणि मृणाली पवार या विद्यार्थ्यांना मिळाला. क्रीड कार्यक्रमाच्या अंतर्गत थाळी आणि गोळा फेक, कबड्डी, धावणे व क्रिकेट अशा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या जीवनदीप महोत्सवात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण सादर केले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भेटदौरे
dपाव, बिस्कीट, वेफर्स आदी पदार्थ मुलांच्या अत्यंत आवडीचे असतात. परंतु उघडय़ावरचे पदार्थ खाण्यापेक्षा पॅकिंग पदार्थाना पालकवर्ग जास्त प्राधान्य देतो. उघडय़ावरील पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात, यामुळे पॅकिंग पदार्थ खरेदी केले जातात. परंतु हे पदार्थ बनविताना कारखाना योग्य पद्धतीची काळजी घेतो का? हे पदार्थ कसे बनविले जातात, हे प्रत्यक्ष पाहण्याचा योग पी. डी. कारखानीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नुकताच आला. शिस्तबद्ध पद्धतीने, उत्तम प्रक्रिया करून बनविलेले हे ताजे पदार्थ पाहून विद्यार्थी नक्कीच अचंबित झाले.
जानेवारी महिन्यात पी. डी. कारखानीस महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळाने अंबरनाथ परिसरातील कारखान्यांना भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यादरम्यान शीतल बेकर्स, बंटी फूड्स या दोन कारखान्यांना भेट दिली. येथील पाव, नानकट, टोस्ट, खारी, बिस्किटे कशी तयार केली जातात, ती कशा पद्धतीने पॅकिंग केली जातात हे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. पाव बनविताना त्याचे पीठ पायाने तुडविले जाते असा सर्वसाधारण समज नागरिकांमध्ये आहे, लहान मुलांनी तो जास्त प्रमाणात खाऊ नये म्हणून अशा पद्धतीने भीती त्यांना दाखविली जाते आणि मग मुलांनाही ते खरेच वाटायला लागते. परंतु पाव किती चांगल्या पद्धतीने तयार होतो हे आज पाहून नक्कीच मनातील त्या विषयीचा गैरसमज दूर झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी नॅब या अंधांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला भेट दिली. दृष्टी नसूनही सर्व कामे अगदी चोख करणाऱ्या येथील कारागीरांना पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. केवळ यांना दिसत नाही परंतु हे आपल्यासारखेच काम करत आहेत, त्यांना दिसत नाही म्हणून त्यांच्याविषयी काळजीची भावना दाखविण्यापेक्षा प्रत्येकाने त्यांना आपल्यातीलच एक समजले तर ह्य़ा सर्व व्यक्ती समाजात सर्वसामान्यांप्रमाणेच मिसळतील आणि हे व्हायला हवे अशी भावना मुलांनी या अंध व्यक्तींना भेटल्यानंतर व्यक्त केली.
शेवटची भेट होती ती कमलधाम या वृद्धाश्रमाला. एकाकी वृद्धांच्या जीवनात काही क्षण तरी आनंदाचे, प्रेमाचे यावेत व मुलांच्याही मनात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून ही भेट घडविण्यात आल्याचे प्रा. शुभांगी केदारे यांनी सांगितले. येथील आजी-आजोबांना मुलांनी फळे, बिस्किटे, नॅपकिन्स भेट स्वरूपात दिले. या भेटवस्तूंपेक्षा त्यांना प्रेमाने कोणी तरी भेटायला आले म्हणून आजी-आजोबांनीही मुलांसाठी भजन, गाणी सादर केली.

महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची औद्योगिक क्षेत्रभेट
अंबरनाथ : येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील १६० विद्यार्थ्यांनी शहरातील आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील बंटी फुड्स प्रा. लि. आणि मेडिमेक इंडस्ट्रिज प्रा. लि. या दोन कंपन्यांना भेट दिली. बंटी फुड्समध्ये पार्ले कंपनीची बिस्किटे तयार केली जातात. व्यवस्थापक पाठक यांनी विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रियेविषयी माहिती देणारी एक ध्वनिचित्रफीत दाखवली. मेडिमेक रुग्णालयासाठी लागणारे फर्निचर बनविणारी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांतील तज्ज्ञांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. महाविद्यालयातील आठ शिक्षकही या क्षेत्रभेटीत सहभागी झाले होते.