tvlogरमजानच्या महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असतो. या महिन्यात केला जाणारा रोजा अर्थात उपवास सोडण्यासाठी वेगवेगळय़ा लज्जतदार पदार्थाची पंगत मांडली जाते. हे खाद्यपदार्थ सर्वानाच आवडतात. हीच गोष्ट हेरून ठाण्यातील ‘कोरम मॉल’तर्फे रमजान महिन्याच्या निमित्ताने अरेबियन खाद्यशाळा भरवण्यात आली आहे. यामध्ये टर्किश डिलाईट (गोड रसामध्ये मिसळलेला सुका मेवा), दाते ट्रफलस् (चॉकलेट आणि सुका मेवा असलेले लहान लाडू, हलावत-अल-जिबन (चीजचे सारण असलेला पदार्थ), अश-अल सराया (पुडिंगचा प्रकार) असे चमचमीत खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.
* कधी- बुधवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ ते रात्री ८
* कुठे- कोरम मॉल, कॅडबरी कंपनीजवळ, ठाणे (प.)

मिलिंद रायकर यांचे व्हायोलिन वादन
कल्याण गायन समाज संस्थेच्या ८९ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता संस्थेचे पांडुरंग प्रभा सभागृह, टिळक चौक, कल्याण (प) येथे सुप्रसिद्ध संगीतज्ज्ञ मिलिंद रायकर यांचे व्हायोलिन वादन आयोजित करण्यात आले आहे. संगीतप्रेमी रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
* कधी-रविवार, १२ जुलै, सकाळी १० वाजता
* कुठे- कल्याण गायन समाज, कल्याण (प).

बैठकीचे संगीत नाटक
डोंबिवलीतील ओंकार कला मंडळाने आर्या दुर्गा क्रिएशन्स निर्मित विद्याधर गोखले लिखित ‘बैठकीचे संगीत नाटक’ ही नाटय़संगीतावर आधारित विशेष मैफल शनिवार ११ जुलै रोजी संध्याकाळी ६.०० वाजता सुयोग सभागृह, टिळक रोड, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित केली आहे. या मैफलीत ‘जय जय गौरीशंकर’ तसेच अन्य नाटकातील पदे संदीप राऊत, रश्मी सुळे, अनघा देशपांडे, सुनील दातार, सुनील जोशी, अभय कंरदीकर सादर करणार आहेत.
* कधी-शनिवार, ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता
* कुठे-सुयोग हॉल, टिळक रोड, डोंबिवली (पू.)

मोहम्मद रफींच्या गाण्यांची मैफल
ज्येष्ठ पाश्र्वगायक महम्मद रफी यांचा ३१ जुलै या स्मृतिदिन. यानिमित्ताने जुलै महिन्यात ठिकठिकाणी या महान गायकाने गायलेल्या गाण्यांवर आधारित मैफली सादर होत असतात. अशीच एक मैफल येत्या रविवारी १२ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. मंदा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘बिछडे सभी बारी बारी’ या मैफलीत सुप्रसिद्ध अनिल वाजपेई, झी सारेगामाफेम अनिरुद्ध जोशी, वर्षां जलानी, मनीषा माथूर आदी कलावंत महम्मद रफी यांच्या सदाबहार रचना सादर करणार आहेत.
* कधी-रविवार, १२ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता
* कुठे-गडकरी रंगायतन, ठाणे(प.)

‘नॉनस्टॉप’ मदनमोहन!
मदनमोहन यांच्या संगीताने सजलेली गाणी आजही रसिकमनावर अधिराज्य गाजवतात. अवीट गोडीची ही गीते सलग ऐकण्याची अभूतपूर्व संधी ठाणेकरांना चालून आली आहे. मदनमोहन फॅन क्लब आणि राजअय्यर यांच्यातर्फे ‘मॅरेथॉन सिगिंग’ या उपक्रमाअंतर्गत संगीतकार मदनमोहन यांच्या गाण्यांच्या मैफलीचे सलग तीन प्रयोग ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात रविवारी आयोजित केले आहेत. या कार्यक्रमामध्ये अनुपमा रॉय, सर्वेश मिश्रा, आलोक काटदरे, श्रीकांत नारायण आदीं कलावंत मदनमोहन यांची गाणी सादर करतील. सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत तीन प्रयोग होणार आहेत.
* कधी-रविवार, १२ जुलै रोजी सकाळी ११, दुपारी ३.३० आणि रात्री ८.००
* कुठे- काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.)

विंदांची त्रिपदी
विंदा करंदीकरांच्या कविता वाचण्याचा, ऐकण्याचा अनुभव काहीसा आगळाच! एकाच वेळी हळुवारपणा आणि तीक्ष्णपणा, स्वैरपणा आणि संयम अशा परस्परविरोधी भावनांचा अनुभव देणाऱ्या विंदांच्या कविता वरकरणी सरळसोप्या वाटत असल्या तरी त्यांच्या रचनेमागे मोठा अर्थ सामावलेला असतो. अशा या ख्यातनाम कवीच्या कवितांची अनुभूती ठाणेकरांना येत्या शनिवारी येणार आहे. ‘वुई नीड यू सोसायटी’ या संस्थेच्या वतीने ‘विंदांची त्रिपदी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात विंदांच्या कवितांचे रसग्रहण, त्यातील तत्त्वचिंतन, जीवनदृष्टी याविषयी चर्चा होईल. तसेच काही निवडक कवितांचे सादरीकरण केले जाईल. आनंद करंदीकर, सरिता आवाड यात सहभागी होणार आहेत. रसिकांना कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश असला तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संपर्क स्नेहा नाईक- ८८७९६६४९६५.
* कधी- शनिवार, ११ जुलै, सायंकाळी ६.०० वाजता
* कुठे- कौशल्य हॉस्पिटल सभागृह, पाचपाखाडी, ठाणे (प).

रानभाजी पाककला स्पर्धा
घोळ, शेवळू, लोत, टाकळा, पेंढ, पायवाळ, कुर्डू आदी रानभाज्या चविष्ट तर आहेतच, शिवाय त्या पौष्टिक व आरोग्यदायीसुद्धा आहेत. मात्र शहरात या भाज्या क्वचितच मिळतात.  या भाज्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पर्यावरण दक्षता मंचची ग्रामीण पर्यावरण शाळा आणि रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी १० ते १ या वेळेत जिल्हा परिषद केंद्र, मामणोली गाव, तालुका कल्याण (प.) येथे ही रानभाजी पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमित्त रानभाज्यांच्या विविध पाककृती बनवण्याच्या पद्धती पाहता आणि शिकता येणार आहेत. या ठिकाणी पाककला स्पर्धेसोबत कच्च्या भाज्याही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. तसेच आहारतज्ज्ञ त्यांची माहिती व उपयुक्तता सांगणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९७०२७७५०६०.
* कधी- शनिवार, ११ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १
* कुठे- जिल्हा परिषद केंद्र, मामणोली गाव, मुरबाड रोड, तालुका कल्याण (प.)

चिमुकल्यांशी चिन्मयच्या गप्पा
मराठी सिने-नाटय़ तसेच दूरचित्रवाणी अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनय आणि लेखन प्रतिभेने वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर येत्या रविवारी डोंबिवलीत मुलांशी मनमोकळा संवाद साधणार आहे. डोंबिवलीतील वेध अ‍ॅकॅडमीने आनंद बालभवन, रामनगर, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित ‘वेध भेट’ या कार्यक्रमात चिन्मय छोटय़ा दोस्तांशी गप्पा करणार आहे.
* कधी-रविवार, १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता
* कुठे-आनंद
बालभवन, रामनगर, डोंबिवली (पू.)