23 November 2017

News Flash

वसाहतीचे ठाणे : नावीन्यपूर्ण उपक्रमांचे ‘एव्हरेस्ट’

जुन्या आणि नव्या ठाण्याच्या वेशीवर साधारण दहा वर्षांपूर्वी एव्हरेस्ट सोसायटी उभारण्यात आली.

सायली रावराणे | Updated: September 12, 2017 1:51 AM

एव्हरेस्ट सोसायटी, कोलशेत, ठाणे (प.)

एव्हरेस्ट सोसायटी, कोलशेत, ठाणे (प.)

जुन्या आणि नव्या ठाण्याच्या वेशीवर साधारण दहा वर्षांपूर्वी एव्हरेस्ट सोसायटी उभारण्यात आली. या संकुलात प्रत्येकी २० मजल्याच्या १४ इमारती आहेत. थाईम, वुडपाईन, टय़ुलिप आदी इमारतींची नावे आहेत. आठशेहून अधिक सदनिका असून लोकसंख्या तीन ते चार हजार इतकी आहे.

मुंबईलगत असणारी ठाणे नगरी राज्याची सांस्कृतिक उपराजधानी आहे. ठाण्यात विविध सण आणि उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होतात. मात्र केवळ पारंपरिकतेला चिकटून न राहता काळानुसार बदलण्याची तयारी ठाणेकर नेहमीच दाखवितात. त्यामुळेच गणेशोत्सव काळात कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची पद्धत ठाण्यात अनुसरली गेली. पुढे तीच प्रथा आता राज्यात सर्वदूर पोहोचली आहे. जुन्या आणि नव्या ठाण्याच्या वेशीवर असणाऱ्या कोलशेत येथील एव्हरेस्ट सोसायटीने यंदाच्या गणेशोत्सवात असाच एक चांगला पायंडा पाडला. त्यांनी त्यांच्या सार्वजनिक उत्सवात यंदा फक्त दीड फुटांची गणेशमूर्ती बसवली. एव्हरेस्टवासीयांचा पर्यावरणस्नेह केवळ मूर्तीपुरता मर्यादित नव्हता. सर्व उत्सवात पर्यावरणस्नेही उपक्रम राबवून त्यांनी याविषयी जनजागृती केली. सोसायटीतील मुलांनी काढलेल्या चित्रांद्वारे सजावट करण्यात आली. गरजू मुलांना मदत व्हावी या हेतूने निधी तसेच शैक्षणिक साहित्य संकलित केले गेले. संकुलाच्या आवारात रहिवाशांनी कृत्रिम तलाव तयार केला होता. त्यात सार्वजनिक उत्सवातील मूर्तीबरोबरच ८० ते ९० घरगुती मूर्तीचेही विसर्जन झाले.

केवळ गणेशोत्सवच नाही, तर या बहुभाषिकांची वस्ती असलेल्या संकुलात सर्वच सण अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. प्रत्येक रहिवाशाला त्यात सहभागी करून घेतले जाते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी राष्ट्रीय जनजागृतीपर कार्यक्रम होतात. नवरात्र, दसरा, दिवाळी, नवीन वर्ष, होळी, गुढी पाडवा अशा प्रत्येक सणाला विशेष उपक्रम राबविले जातात. दिवाळीनिमित्त रांगोळी प्रदर्शन, दिवाळी पहाट मैफलींचे आयोजन केले जाते. सामूहिकरीत्या फराळ केला जातो. किल्ले स्पर्धा घेतली जाते.

हिरवाईचा वसा

सांस्कृतिक उपक्रमांप्रमाणेच सामाजिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांमध्येही ‘एव्हरेस्ट’वासी आघाडीवर असतात. संकुल परिसरात रहिवाशांनी हिरवाई जपली आहे. संकुलाची स्वत:ची नर्सरी आहे. तिथे निरनिराळी रोपे तयार केली जातात. सोसायटीतील झाडांची निगा राखण्याची जबाबदारी मुलांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक झाड विशिष्ट मुलास दत्तक देण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे संस्कार मुलांवर होतातच, शिवाय परिसरातही हिरवाईची जपणूक होते.

सोसायटीत ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. आवारात कचरा निर्मूलन प्रकल्पही आहे. निवडणुकीच्या काळात मतदान जागृती मोहीम राबवली जाते. नागरिकांच्या मदतीसाठी खास केंद्रे उभारली जातात. संकुलातील जास्तीत जास्त रहिवाशांनी मतदानात सहभागी व्हावे, म्हणून खास प्रयत्न केले जातात.

रस्त्याची दुर्दशा, अपुरी परिवहन सेवा

एव्हरेस्ट सोसायटी ठाण्यातील आदर्श सोसायटी असली तरी येथे दळणवळणांच्या साधनांचा अभाव आहे. परिवहन सेवा अपुरी असल्याने अनेकदा रहिवाशांचा खोळंबा होतो. इथे फक्त टीएमटीची ‘कोलशेत’ बस येते. या बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. तसेच कोलशेत रस्त्याची सध्या खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पुन्हा या रस्त्याची वाताहत झाली आहे. रस्त्याची उत्तम डागडुजी करावी, असे येथील रहिवासी सांगतात.

क्रीडाविषयक उपक्रम

संकुलात खूप छान उद्याने आहेत. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी चांगली सोय आहे. संकुलातील रहिवाशांसाठी खास क्रीडामास साजरा केला जातो. या महिनाभरात विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. सर्व वयोगटातील रहिवासी त्यात उत्साहाने सहभागी होतात. रस्सी खेच, व्हॉलीबॉल, धावण्याची शर्यत, पोहणे अशा अनेक स्पर्धा होतात.

First Published on September 12, 2017 1:51 am

Web Title: everest cooperative society in kolshet road in thane