केंद्र तसेच राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने शहरातील झोपडपट्टय़ांमधील प्रत्येक घरांमध्ये वैयक्तिक शौचालये उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. झोपडपट्टी भागातील दाटीवाटीच्या वस्त्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या घरांमध्ये जैव-स्वच्छतागृहे उभारणीचा विचार सुरू केला आहे. अशा स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र मलवाहिन्या टाकण्याची गरज लागत नसल्यामुळे महापालिकेने त्याच्या उभारणीसाठी काही खासगी कंपन्यांसोबत चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत येत्या २०१६ अखेपर्यंत शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी शहरातील झोपडपट्टी भागातील घरांमधील स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण केले आहे. ज्या घरांमध्ये स्वच्छतागृहे आढळून आलेली नाहीत, त्या घरांमध्ये स्वच्छतागृहे उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे.
केंद्र, राज्य तसेच महापालिकेचे असे एकूण १२ हजार रुपयांचे हे अनुदान असणार आहे. स्वच्छ  भारत अभियानांतर्गत संपूर्ण शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिका आता सामूहिक १५००, वैयक्तिक १२०० आणि सार्वजनिक ५०० शौचालये उभारणार आहे. झोपडपट्टय़ांमधील घरांच्या रचनेचा तसेच मलवाहिन्यांचा विचार लक्षात घेऊन या घरांमध्ये बायो स्वच्छतागृहे उत्तम पर्याय असल्याच्या निष्कर्षांपर्यंत महापालिका प्रशासन आले आहे.
पहिल्या टप्प्यात दोन हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारत असताना त्यासाठी बायो स्वच्छतागृहांचा विचार करण्यात येत आहे. हे स्वच्छतागृह उभारणीसाठी संबंधितांना घरामध्ये केवळ साडेतीन फुटांचा खड्डा खणावा लागणार असून त्यात जैव स्वच्छतागृहाची टाकी बसविली जाणार आहे. या टाकीत जमा होणाऱ्या मैल्याची विल्हेवाट लावण्यासाठी जंतू (बॅक्टेरिया)
सोडले जाणार असून उर्वरित सांडपाणी नाल्यांमध्ये सोडणे शक्य होणार आहे.