टीव्हीवरील दैनंदिन मालिका चार दिवस नाही पाहिल्या तरी काही फरक पडत नाही. कारण एकाच घटनेवर चार भागांत तीच चर्चा चालते. एकाच घटनेवरचे कथानक चार-पाच सलग भागात दाखविले जात असल्यामुळे चार-पाच दिवसांनंतर प्रेक्षकांनी एखादी दैनंदिन मालिका पाहिली तरी त्या मालिकेत एकूण काय सुरू आहे, हे चटकन समजते. मालिकांपेक्षा पुस्तके उत्तम. स्वत:चे एक ग्रंथालय असले पाहिजे. प्रत्येक घरात हजार-बाराशे पुस्तके असली तर नवी पिढी ती चाळते, हेच आजच्या काळात हवे आहे. प्रत्येक घराप्रमाणेच प्रत्येक सोसायटीचेही एक स्वतंत्र ग्रंथालय असावे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी व्यक्त केले.
बाळकुम येथील अशोकनगर सोसायटीत झालेल्या आचार्य अत्रे कट्टा उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संजय मोने यांना आमंत्रित करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. ‘‘सोसायटीमध्ये ग्रंथालय असेल तर आबालवृद्धांना त्याचा उपयोग होतो. छापील माध्यमाचे सुख मोठे असते,’’ असे सांगून आजच्या मोबाइल-इंटरनेटच्या युगातही ‘वाचाल तर वाचाल’ हाच महत्त्वाचा संदेश संजय मोने यांनी दिला.
भरपूर वाचन केल्यानेच कलावंतालाही ऊर्जा मिळते, जगण्याला दिशा मिळते हे अधोरेखित करतानाच संजय मोने यांनी आपल्या पहिल्या नाटकापासूनचा प्रवास श्रोत्यांसमोर कथन केला. पुस्तकांबरोबरच थोर कलावंतांचा सहवास हाही अभिनयास पूरक ठरतो असे ते म्हणाले.