मानपाडा जवळच्या संदप गावाच्या खदानीत सुशांत मोहोळकर (२७) या माजी सैनिकाचा मृतदेह गुरुवारी सापडला. डोंबिवली पश्चिमेत राहणारा सुशांत हा नोकरीच्या शोधात बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नव्हता. तो १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

सुशांत हा भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. मात्र, दोन वर्षांतच त्याने ही नोकरी सोडून दिली. त्यानंतर तो परदेशातील एका खासगी कंपनीच्या बोटीवर सुरक्षारक्षकाचे काम करीत होता. परंतु ती कंपनी अचानक बंद पडल्याने सुशांत पुन्हा डोंबिवलीला आपल्या घरी परतला. तेव्हापासून नोकरीच्या शोधात होता. असे असतानाच तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, २४ सप्टेंबरला सायंकाळी संदप गावातील काही गावकऱ्यांनी गावच्या खदानीत मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यावेळी हा मृतदेह सुशांतचा असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी सांगितले.