नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमधील अग्निरोधक यंत्रणा तसेच वीज वितरण व्यवस्था आणि प्राणवायूपुरवठा यंत्रणेचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्याचे आदेश सोमवारी नगरविकासमंत्री एकनाथशिंदे यांनी दिले. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील वेदान्त रुग्णालयात दाखल असलेल्या चार रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राणवायूपुरवठा यंत्रणेत दोष निर्माण झाल्याने हे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी महानगर क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आग लागणे तसेच प्राणवायू यंत्रणेत बिघाड होऊन रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडले आहेत. या दुर्घटनांमध्ये रुग्णांना नाहक प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तसेच त्या त्या शहरांमधील महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या देखरेखीखाली त्रयस्थ संस्थेमार्फत या रुग्णालयांमधील अग्निरोधक यंत्रणा, वीज वितरण व्यवस्था तसेच प्राणवायूपुरवठा व्यवस्थेचे परीक्षण केले जाणार आहे. अशा संस्थांची तातडीने नियुक्ती करून हे काम वेगाने केले जावे, असे निर्देशहीशिंदे यांनी दिले आहेत. ठाण्यासह महानगर क्षेत्रातील जवळपास सर्वच शहरांमधील रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणेत दोष असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक रुग्णालयांकडे प्रमाणपत्रही नाहीत. या पार्श्वभूमीवर त्रयस्थ संस्थेमार्फत होणाऱ्या लेखापरीक्षणातून वास्तव पुढे येऊ शकेल, असा दावा महापालिकेतील वरिष्ठ  अधिकाऱ्याने केला.

प्राणवायू ही अत्यावश्यक बाब आहे, त्याचे नियोजन करणे गरजेचे होते. रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे चार जणांचे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी.

– संदीप पाचंगे, मनसे विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष

वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयामध्ये प्राणवायुअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, संबंधित रुग्णालयामध्ये प्राणवायू पुरविण्याची जबाबदारी कोणाकडे होती? प्राणवायू साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा प्राणवायूसाठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या दुर्दैवी घटनेला  कोण जबाबदार आहे? या विविध मुद्दय़ांबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर दोन दिवसांत कारवाई करावी.

 – निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहराध्यक्ष, आमदार