‘पेटीएम’ प्रणालीसाठी प्रवाशांना सेवाकराचा अतिरिक्त २२ रुपयांचा खर्च

मध्य रेल्वेच्या ‘अनारक्षित तिकीट अ‍ॅप’ प्रणालीतून तिकीट खरेदी करताना रेल्वे प्रवाशांना सध्या मोठय़ा दिव्याला सामोरे जावे लागत आहे. डिजिटल माध्यमातून अनारक्षित तिकीट काढल्यानंतर पैसे भरण्यासाठी फक्त ‘पेटीएम’ ही एकमेव खासगी अ‍ॅप प्रणाली रेल्वेच्या तिकीट प्रणालीवर उपलब्ध असून रेल्वे पासचे पैसे भरणा करताना प्रवाशांना सेवा कराचे अतिरिक्त २२ रुपये वाढीव भरावे लागणार आहेत. एकीकडे केंद्र सरकार डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना व्यवहारात पाच रुपये सूट देत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या मार्गावर अनारक्षित तिकीट काढताना प्रवाशांना वरखर्च करावा लागत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

डिजिटल क्रांतीचा सध्या जोरदार गवागवा सुरू आहे. या प्रणालीत प्रवाशांना आणण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘अनारक्षित तिकीट’ पद्धतीने (अनरिझव्‍‌र्हर्ड तिकीट सिस्टीम- यूटीएस) रेल्वे पास काढण्याची मुभा प्रवाशांना दिली आहे. या प्रणालीतून रेल्वे पास काढल्यानंतर या पासचे पैसे भरणा करताना ‘पेटीएम’व्यतिरिक्त अन्य राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांची एवढी अ‍ॅप उपलब्ध असताना त्यामधील एकही अ‍ॅप रेल्वेच्या ‘यूटीएस’ प्रणालीवर उपलब्ध नसल्याने रेल्वेने ग्राहकांना भरुदड पडेल अशा ‘पेटीएम’ प्रणालीची मुभा ठेवल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

मध्य रेल्वेच्या ‘यूटीएस’ प्रणालीतून रेल्वे पास काढला तर तेथे पैसे भरण्यासाठी ‘पेटीएम’ ही एकमेव प्रणाली आहे. अन्य कोणत्या बँकांचे अ‍ॅप तेथे नाही. डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना पाच रुपयांची सूट मिळते. पण  पेटीएमद्वारे रेल्वे पास काढल्यानंतर सेवा कराच्या अतिरिक्त २२ रुपयांचा भरुदड प्रवाशांना सहन करावा लागतो.

– श्रीकांत खुपेरकर, रेल्वे प्रवासी

डिजिटल पद्धतीने रेल्वे पास काढताना अशा प्रकारच्या समस्या आहेत, याच्या काही तक्रारी अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. पण असे काही असेल तर ते पहिले तपासून मग काय तो विचार करण्यात येईल.

– डॉ. ए. के. सिंग, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे