28 January 2020

News Flash

मद्यवाहतुकीवर करडी नजर

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग सज्ज

(संग्रहित छायाचित्र)

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग सज्ज

वसई : ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या मद्यपाटर्य़ासाठी वसई-विरार शहरात बेकाय­दा मद्य येऊ नये यासाठी वसईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. परराज्यातून वसईत येणाऱ्या मद्यवाहतुकीवर आणि बेकायदा मद्यसाठय़ावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व्ही एस मासमार यांनी सांगितले आहे.

नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री विविध ठिकाणी पाटर्य़ाआयोजित केल्या जातात. यामध्ये मोठय़ा प्रमाणात मद्याचा वापर केला जातो. मद्याचे परवाने न घेताच विविध ठिकाणी बेकायदा मद्याची वाहतूक व विक्री केली जाते. सिल्वासा, दमण या भागात मद्य स्वस्तात मिळत असल्याने छुप्या मार्गाने मद्यसाठा शहरात आणण्याचा प्रयत्न केला जातो. याला रोखण्यासाठी टोलनाका, इतर विविध ठिकाणच्या भागात वाहनांवर लक्ष ठेवून तपासणी केली जाणार आहे. मध्यंतरी निवडणुकीच्या काळातही विविध ठिकाणी मद्यविक्री व मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये मद्याच्या बेकायदा वाहतूकीला पायबंद घालण्यासाठी पथक स्थापन करून वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,  असे राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक व्ही एस मासमार यांनी सांगितले.

पाटर्य़ासाठी एकदिवसीय मद्यपरवाना

मद्यपान पार्टी करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे एकदिवसीय परवाने दिले जातात. नाताळ व नववर्ष स्वागतासाठी रिसॉर्ट, हॉटेल यांसह विविध ठिकाणी पाटर्य़ा आयोजित केल्या जातात. या मद्यपाटर्य़ासाठी २० हजार रुपये आगाऊ रक्कम आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे उत्पादन शुल्क कार्यालयात भरून परवाना मिळणार आहे. ही सुविधा ऑनलाइनही उपलब्ध आहे. विनापरवाना मद्यपान पार्टी करताना आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आठ लाखांचे मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बेकायदा मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पालघर येथील चारोटी टोल नाका आणि तलासरी नाका येथे कारवाई करून आठ लाखांहून अधिक किमतीचे मद्य जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान भरारी पथकांने मद्यसाठा वाहून नेत असलेल्या वाहने ताब्यात घेतली असता त्यावेळी संबंधितांनी पथकावर हल्ला केला असून संबंधितांवर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  यामध्ये वाहनांसह मद्याचे ४८ खोकी जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई अधीक्षक डॉ. विजय भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथील भरारी पथकाने केली आहे. या गुन्ह्यामध्ये भेसळयुक्त दारू तयार करणारी टोळी सक्रिय आहे काय याचा तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

बेकायदा मद्यवाहतुकीवर कारवाई सुरूच असते. मात्र डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पाटर्य़ासाठी मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. ही वाहतूक रोखण्यासाठी आणि परवाने न घेताच मद्यपार्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहे.

– व्ही. एस. मासमार, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, वसई

First Published on December 10, 2019 4:14 am

Web Title: excise department ready to keep eyes on liquor smuggler ahead of new year zws 70
Next Stories
1 एसटीचे आर्थिक नियोजन फसले
2 ठाण्यात तीन दिवस मनउत्कर्षांचा ज्ञानयज्ञ
3 वैविध्यपूर्ण एकांकिकांनी ठाण्याच्या प्राथमिक फेरीत रंगत
Just Now!
X