उत्पादन शुल्क विभागाची अंधेरीत कारवाई

आयात शुल्क चुकवून दिल्लीहून मुंबईत विक्रीसाठी आणलेले तब्बल दोन कोटी रुपयांचे उंची मद्य उत्पादन शुल्क विभागाने अंधेरी येथे घातलेल्या छाप्यात जप्त केले आहे. दिल्ली ते मुंबईदरम्यान रेल्वेने या मद्याची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात उघड झाली असून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरांतील काही ‘ठरावीक’ ग्राहकांना बाजारापेक्षा तुलनेने स्वस्त दरात ते पुरविले जात असल्याचा संशय आहे. किरकोळ बाजारात तब्बल दीड लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीने विकल्या जाणाऱ्या ‘ओबाम’सारख्या उंची मद्याच्या बाटल्यांचीही रेल्वेने तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले असून ब्लॅक लेबल, जॅक डॅनिअल, सिग्नेचर अशा ब्रॅण्डचे मद्य सर्रासपणे आयात शुल्क चुकवून मुंबईत आणले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुंजालाल पटेल आणि बिपिन शहा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून हे दोघेही अंधेरी परिसरातील रहिवासी आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे खार जिमखाना परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. या दोघांकडून आयात शुल्क चुकवून विक्रीसाठी आणलेल्या दोन कोटी रुपयांच्या उंची विदेशी मद्याच्या बाटल्या पथकाने जप्त केल्या आहेत. अंधेरी येथील बिपिन शहाकडून हे मद्य खरेदी करून त्याची विक्री करणार होतो, अशी माहिती पुंजालाल याने दिली. त्यानंतर पुंजालालच्या माध्यमातून पथकाने सापळा रचून बिपिन शहा याला अटक केली.

या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरी भागातील एका दुकानातून पथकाने १७५ दारूच्या बाटल्याचे खोके जप्त केले असून त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे.  या खोक्यांत एकूण १८०० मद्याच्या विदेशी बाटल्या आढळून आल्या. अशोक नावाच्या व्यक्तीने दिल्ली येथून रेल्वेतून हा मद्यसाठा विक्रीसाठी पाठविल्याची कबुली शहा याने दिली आहे. त्यामध्ये ब्लॅक लेबल, ओबान, सिग्नेचर आदीसारख्या एकूण ७५ ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त तानाजी साळुंखे यांनी दिली. या मद्यविक्रीमध्ये मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच शुल्क बुडवून रेल्वेतून या मद्याची वाहतूक झाल्याचे समोर आल्याने यामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश आहे का, याची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच पटेल आणि शहा या दोघांकडून ज्यांना मद्याचा पुरवठा होत होता, त्यांची माहिती हाती आली असून या सर्वाची चौकशी करण्यात येणार आहे, असे उपायुक्त तानाजी साळुंखे यांनी सांगितले. या प्रकरणी बिपिन शहा आणि पुंजालाल पटेल या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.