किल्लय़ात मांडण्यात आलेल्या प्रदर्शनाची नासधूस; तिघांना अटक

वसईच्या किल्ल्यात मद्यपान, प्रेमीयुगुलांचे अश्लिल चाळे, स्थानिक तरुणांकडून केला जाणारा धिंगाणा यावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच बुधवारी स्थानिक तरुणांनी किल्ल्यात धुडगूस घातला. सध्या किल्ल्यात सुरू असलेल्या विश्वदायी सप्ताहात लावलेल्या प्रदर्शनाची या तरुणांनी नासधूस केली. अधिकाऱ्यांना न जुमानता येथे क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजनही करण्यात आले होते.

सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणअंतर्गत वसई किल्लय़ात विश्वदायी सप्ताह सुरू आहे. यात गोंसालो गार्सिया चर्चमध्ये पुरातत्त्वीय विभागाद्वारे ऐतिहासिक वास्तूंच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. बुधवारी सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून तीन स्थानिक तरुणांनी आतमध्ये प्रवेश केला आणि प्रदर्शनातील चित्रांची आणि काही वस्तूंची नासधूस केली. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी श्रीदत्त राऊत आणि पुरातत्त्व कर्मचाऱ्यांनी या तरुणांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिक तरुणांचा त्रास दररोजच होत असून येथे राजरोस मद्यपान केले जाते आणि त्यांना हटकल्यास अरेरावी केली जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पुरातत्त्वीय नियमानुसार कोणत्याही ऐतिहासिक वास्तूत खेळांचे सामने भरण्यास मनाई आहे. मात्र या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे चित्र आहे. सेंट गोंसालो गार्सिया चर्च, चर्चसमोरील आवार, बालेकिल्लाअंतर्गत भाग, सेंट जोसेफ चर्चचा अंतर्गत भाग या ठिकाणी क्रिकेट, फुटबॉलचे खेळ सामने भरवत स्थानिक तरुणांनी हैदोस घातला आहे. या तरुणांना आवरता आवरता पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी हतबल झाले आहेत.

किल्ल्यात आता प्रवेश शुल्क?

वसई किल्ल्यात होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी किल्ल्यात प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात यावा, असा प्रस्ताव पुरातत्त्व खात्यातील अधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर मांडला आहे. वसई किल्ल्यात मद्यपी, गर्दुल्ले, प्रेमी युगुले यांचा हैदोस वाढला आहे. सुरक्षा रक्षकांचा पहारा असतानाही हौशी पर्यटक जेट्टीवर जाण्याचे कारण सांगत त्याच्या बाजूला असलेल्या किल्लय़ाच्या भुईदरवाज्याने किल्लय़ात प्रवेश करतात. त्यामुळे किल्लय़ात जाण्यासाठी प्रवेश आकारण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनासमोर मांडण्यात आल्याचे पुरात्तव विभागाचे अधीक्षक बिपिनचंद्र नेगी यांनी सांगितले, तसेच प्रवेशासाठी वेळेचे बंधन ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत वसई किल्लय़ातील बऱ्याच वाईट बाबींचा पुरातत्त्व विभागाने पाऊल उचलल्याने विविध बदल घडत आहेत, परंतु पुरातत्त्व विभागाच्या प्रयत्नांना स्थानिकांनी साथ मिळाल्यास किल्लय़ात अजूनही चांगल्या बाबी नक्कीच घडतील.

कैलास शिंदे, पुरातत्त्व विभाग