ठाण्यातील रेमंड मिल कंपाऊंड येथे दुर्मीळ गाडय़ांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १८५९ पासून १९५५ पर्यंतची दुर्मीळ दुचाकी आणि चारचाकी वाहने ठेवण्यात आली आहेत. रेमंडतर्फे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या सहकार्याने होत आहे.

नेहमीच चित्रपटांमध्ये किंवा जुन्या छायाचित्रांमध्ये दिसणारी दुर्मीळ वाहने पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळत आहे. या प्रदर्शनात सुमारे शंभर दुर्मीळ दुचाकी आणि चारचाकी वाहने ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये नॅनोपेक्षाही आकाराने लहान असलेल्या फियाट ५०० या गाडीपासून ते आकाराने मोठय़ा आसणाऱ्या स्रिटेऑन या सारख्या विविध गाडय़ांचा समावेश आहे.

मर्सिडीज, मारुती, फियाट, बिटल आणि रोल्स रॉइस या कंपन्यांच्या जुन्या दुर्मीळ कार आणि त्यांचे विविध मॉडेल प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर रॉयल एनफिल्ड, जावा, बजाज, होण्डा आणि वेस्पा या दुचाकीही पाहायला मिळत आहेत.

‘विण्टेज अ‍ॅन्ड क्लासिकल कार क्लब ऑफ इंडिया’चे सदस्य या ठिकाणी असलेल्या दुर्मीळ वाहनांची माहिती उपस्थितांना देत आहेत. या प्रदर्शनात लाकडाची बांधणी असलेली रॉल्स रॉइस ही आकर्षक गाडी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच नॅनोपेक्षाही आकाराने लहान असलेल्या फियाट ५०० या चारचाकी गाडीसोबत फोटो घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. या प्रदर्शनात इंग्रजांच्या काळात वापरण्यात आलेल्या वाहनांचाही समावेश असून रविवार २३ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन ठाणेकरांना पाहता येणार आहे.

आज रॅली : या प्रदर्शनामधील काही गाडय़ांची रॅली आज, रविवारी होणार आहे. ही रॅली सकाळी ११ वाजता आनंदनगर चेक नाका येथून सुरू होऊन पुढे काशिनाथ घाणेकर नाटय़गृह- मानपाडा-वसंत विहार सर्कल – पोखरण रोड नंबर २-वर्तकनगर नाका मार्गे रेमंड गेट येथे समाप्त होईल. ही रॅली एकूण २१ किलोमीटर असून विण्टेज कारची ही ठाण्यातील पहिलीच रॅली असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.