फास्ट फूडमधील सर्वच प्रकार प्रत्येक वयोगटाच्या पसंतीला उतरले आहेत. त्यातही नवे प्रयोग करत, नवीन प्रकारचे सॉस व एक्झॉटिक भाज्यांचा वापर करत विरारमधील ‘कॅफे नाइन’ या कॅफेने काही नवे प्रकार खवय्यांसाठी आणले आहेत.

विरार पश्चिमेला विवा महाविद्यालयाच्या बाजूला एक्झॉटिक पिझ्झा खाणाऱ्या तरुणांची गर्दी तुम्हाला कॅफे नाइन येथे पाहायला मिळते. झुकीनी, क्रीम अँड ओनियन सॉस, टॉमेटो सॉस, चार प्रकारचे चीज या पिझ्झासाठी वापरले जातात. ग्राहकांना परिपूर्ण असा पिझ्झा देत असल्याचा दावा या कॅफेचे मालक अशोक गेंन्टयाला करतात. याशिवाय येथे मशरूम, कॅप्सिकम, पनीर, चॉकलेट, चीज असे पिझ्झाचे प्रकारही उपलब्ध आहेत. विविध भाज्यांचा पुरेपूर वापर पिझ्झामध्ये केला जातो. विशेष म्हणजे महाविद्यालयीन तरुण-तरुणींची आवड आणि खिशाचा विचार करता येथील किमतीही त्यांनी कमी ठेवल्याचे सांगितले.

या कॅफेमध्ये थिक मिल्कशेक हा प्रकारही उपलब्ध आहे. सहसा मिल्कशेक हे पातळ दुधात बनवले जातात परंतु येथे थिक मिल्क म्हणजेच जाड दुधात हे शेक्स तयार केले जातात. या ठिकाणी  क्रीम मस्तानी शेक्समध्ये मँगो, स्ट्रॉबेरी, अंजीर, मिक्स फ्रुट, बटरस्कॉच हे फ्लेवर्स असतात. तर मंच थिक कोल्ड कॉफीमध्ये मंच, मंच विथ क्रश, व्हाईट मंच, ओरियो मंच, आयरिश मंच, आयरिश मंच विथ क्रश, ब्लॅक फॉरेस्ट, कॅरेबिन मंच यांसह इतर पर्याय उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे हे शेक्स बनवताना बर्फाचा अजिबात उपयोग करत नसल्याचे अशोक म्हणतात.

फास्ट फूडमधील फ्रेंच फ्राइज, गार्लिक ब्रेड, बर्गर असे नेहमीचे प्रकारही येथे उपलब्ध आहेत. या फास्ट फूडसोबत विविध प्रकारचे सॅन्डविचदेखील उपलब्ध आहेत. एकूण ४५ प्रकारचे विविध सॅन्डविच येथे उपलब्ध आहेत. यामध्ये चॉकलेट, चीज, गार्लिक, शेझवान, मेयो, पनीर, आलू बटर, जैन चीज या प्रकारातील सॅन्डविच येथे मिळतात. येथील ग्रिल सँडविचला जास्त मागणी असल्याचे अशोक यांनी सांगितले. सर्व प्रकारचे सॉस, क्रीम आणि चटण्या या कॅफेमध्येच बनविल्या जात असल्याने येथील खास चव प्रत्येक पदार्थाला असते.

  • ‘कॅफे नाइन’
  • पत्ता : दुकान नंबर ५/६, विवा किंग्स्टन टॉवर, जुन्या विवा महाविद्यालयाच्या बाजूला, विरार (पश्चिम)
  • वेळ : सकाळी ९.३० ते रात्री ११.३० पर्यंत