पावसाळ्यापूर्वी स्वच्छता न झाल्यास पाणी साचण्याची शक्यता

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नाले आणि गटारांची सफाई करण्यासाठी पालिकेने सात कोटी पाच लाख रुपयांचा ठेका ठेकेदाराला दिला आहे. नालेसफाईसाठी तीन कोटी २५ लाख, गटारसफाईसाठी तीन कोटी ८० लाखांचा निधी प्रस्तावित केला आहे.

पावसाळा सुरू होण्याच्या १५ ते २० दिवस अगोदर मे महिन्याच्या मध्याला ठेकेदारांकडून नाले, गटारसफाईची कामे सुरू केली जातात. १० प्रभाग क्षेत्रांमधील अनेक गटारे आजही गाळाने तुडुंब भरल्याच्या तक्रारी आहेत. कल्याण पूर्वेत लोकग्राम नाल्यात बहुतांशी कचरा, गाळ आहे त्या स्थितीत आहे. काढलेला गाळ रस्त्यावर वाहून आला आहे. या भागातून ये-जा करताना दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या आहेत. लोकग्राम नाल्याची योग्य रीतीने सफाई झाली नाही तर पावसाळ्यात नाल्यातील कचरा, गाळाच्या ढिगांना अडलेले पाणी तिसगाव, विजयनगर, अमराई, संतोषनगर वस्तीमध्ये शिरते, असे रहिवाशांनी सांगितले.

पावसाळा तोंडावर असताना प्रभागांमधील गटारसफाईची कामे सुरू झालेली नाहीत. डोंबिवलीतील भरत भोईर नाला, जरीमरी नाला, कोपर नाला, आयरे गाव नाला, टिटवाळा, मांडा भागांतील नाल्यांची वेळीच सफाई होण्यासाठी मल-जलनिस्सारण अधिकाऱ्यांनी पाठ पुरावा करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

महापालिका हद्दीतील नालेसफाईसाठी सात कोटींचा निधी प्रस्तावित आहे. मोठे नालेसफाई मलनिस्सारण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि गटारांची कामे मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून सुरू आहेत. १० प्रभागांमध्ये स्वतंत्र ठेकेदार या कामांसाठी नेमले आहेत. शहरात ९९ किमी लांबीचे ९४ नाले आहेत. या कामांवर पर्यवेक्षक अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

अनंत मादगुंडी, कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण विभाग