12 August 2020

News Flash

प्रवासानुभव

पर्यटनासाठी आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

वर्षांअखेरीस प्रवासाला कुठे जायचे याचे नियोजन झाले नसेल तर आपण अनेकदा ऑनलाइन शोध घेऊन कुठे जायचे हा निर्णय घेतो. हा निर्णय घेताना अनेकदा आपल्याला एखाद्या पर्यटन कंपनीने दिलेल्या पॅकेजेसचा पर्याय निवडावा लागतो. यात अनेकदा आपल्याला न आवडणारे एखादे ठिकाण असते पण पर्याय नसल्यामुळे ते निवडावे लागते. अशा वेळी आपल्याला पाहिजे ते पाहिजे त्या कारणासाठी पर्यटन करता येणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला कर्नाटक सरकारने विशेष शिष्यवृत्तीही देऊ केली आहे.

पर्यटनासाठी आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. २०१५च्या माहितीनुसार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७ टक्के हिस्सा हा पर्यटनाचा आहे. यामुळे या क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. सरकारनेही या क्षेत्रात विशेष गुंतवणूक करीत या विषयाशी संबंधित नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विवेकानंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग राणेने ब्रिटनमध्ये बिझनेस आणि व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले. एका अभ्यास दौऱ्यादरम्यान युरोपमध्ये गेल्यावर तेथील पर्यटनाच्या संकल्पनांचा अभ्यास परागने केला. तेव्हा त्याने पर्यटन शहरांत घरांमध्ये राहण्याची सोय केली तर कसे होईल याबाबत विचार करण्यास सुरुवात केली आणि कामास सुरुवात केली. एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत असताना व्यवसाय करण्याचा डोक्यातील विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. मग त्याने इतर पर्यटन कंपन्यांपेक्षा वेगळे काही तरी देणारी पर्यटन कंपनी सुरू करावी, असा विचार करण्यास सुरुवात केला आणि यातूनच https://www.funstay.in/ चा जन्म झाला.

इतर पर्यटन कंपन्यांकडे त्यांनी तयार केलेले पॅकेजेस उपलब्ध असतात. तसेच अनेकदा आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायचे असेल तर तसा शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणचे व त्या आसपासचे विविध पर्याय आपल्यासमोर येतात. यात अनेकदा आपण जाऊन आलेले किंवा आपल्याला नको असलेले ठिकाण असते. पण पॅकेजमध्ये ते येत असल्याने आपल्याला घेतल्याशिवाय पर्याय नसतो. तसेच आपण नेमके कोणत्या कारणासाठी पर्यटनाला जात आहोत हेही महत्त्वाचे असते. म्हणजे जर आपल्याला केवळ जंगल सफारी करायची असेल तर कुणी तरी सांगितलेल्या पर्यायांमधून एखादा पर्याय आपण निवडतो. पण त्यापेक्षा वेगळा पर्याय जर आपल्याला मिळाला तर. इतकेच काय तर आपल्याला पाहिजे त्या कारणानुसार आपल्याला ठिकाणे सुचविली गेली तर ती आपल्याला हवीच असतात. अशाच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊन पर्यटनस्थळांचे पर्याय देणारी आगळी संकल्पना घेऊन परागने फनस्टे या कंपनीची सुरुवात केली. या संकेतस्थळावर आपण गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला कुठे जायचे आहे आणि कोणत्या कारणासाठी जायचे आहे अशा दोन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. आपण दिलेल्या उत्तरानुसार आपल्याला विविध ठिकाणांचे पर्याय दिले जातात, अशी माहिती पराग देतो. यात अगदी मन:शांतीसाठी पर्यटनाला जायचे इथपासून ते जंगल पर्यटन, ट्रेकिंग, राफ्टिंग अशा विविध पर्यायांचा समावेश आहे. आपल्या आवडीनुसार पर्यटनस्थळ आणि तेथील सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचेही पराग म्हणाला. यामुळेच अनेकांनी या आगळय़ा संकल्पनेचे स्वागत केल्याचेही तो म्हणाला.

गुंतवणूक व उत्पन्नस्रोत

ही कंपनी उभी करण्यासाठी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे स्वत:कडील काही रक्कम यात गुंतवली. सुरुवातीपासूनच कोणत्याही गुंतवणूकदारावर अवलंबून न राहता आपण आपला व्यवसाय स्वत:च्या पायावर उभा करावा, असे मनाशी ठरविले होते. यातच कर्नाटक सरकारला ही आगळी संकल्पना आवडली म्हणून त्यांनी याला शिष्यवृत्ती देऊ केली. यात आर्थिक पाठबळ तर मिळालेच, शिवाय गुगलचे क्लाऊड सव्हर्सही मिळाले आहेत. यामुळे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागले. नुकतेच विविध नवउद्यमींशी सहकार्य करार होऊ लागले आहेत यामुळे व्यवसायाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. कंपनीचे मुख्य उत्पन्न म्हणून हे पर्यटनस्थळांवर संकेतस्थळाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या बुकिंग रकमेतील काही हिस्सा कंपनी स्वत:कडे ठेवते. याचबरोबर प्रामुख्याने झळकणारी माहिती, सहकार्य करार अशा विविध मार्गानीही उत्पन्न होत असल्याचे परागने नमूद केले.

भविष्याची वाटचाल

अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे परागने सांगितले. यासाठी परागने स्वत: संकेतस्थळावर माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकानुभव अधिक चांगला करण्यास सुरुवात केली आहे. सध्या असलेल्या १०० पर्यटनस्थळांची संख्या वाढविणे व लोकांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना पर्यटन ठिकाणे उपलब्ध करून देणे हा आमचा प्रयत्न असल्याचे पराग सांगतो. ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ‘चॅट बोट’चा वापर करण्याचाही मानस आहे. यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांना तातडीने उत्तरे देता येऊ शकतील.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना त्यातून जास्तीत जास्त नफा कसा कमाविता येईल याबाबत विचार करणे आवश्यक आहे. कोणाच्याही गुंतवणुकीवर अवलंबून न राहता सुरुवातीपासूनच व्यवसायात उत्पन्न कसे मिळेल याकडे लक्ष द्या, असा महत्त्वपूर्ण सल्ला परागने नवउद्यमींना दिला आहे. तसेच हा प्रवास खूप मोठा आहे, यामुळे संयम ठेवणेही खूप गरजेचे आहे. आपल्या ग्राहकाला जाणवणाऱ्या अडचणी तातडीने दूर केल्या तर त्याचा फायदा तुमच्या व्यवसाय वृद्धीलाच होणार असल्याचेही पराग म्हणाला.

 

नीरज पंडित

niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2016 1:18 am

Web Title: experience your stay with fun on funstay in
Next Stories
1 नववर्ष पाटर्य़ा नियमांच्या चौकटीत!
2 वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर धोकादायक अवस्थेत
3 भाजप नगरसेविकेचे पद धोक्यात
Just Now!
X