तीसहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सिनेमे तंबूत बसून पाहण्याची संधी

सध्याच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात थंड वातावरणात, मऊशार खुच्र्यावर विराजमान होऊन पॉपकॉर्न चघळत चित्रपट पाहणे नित्याचेच झाले आहे. मात्र गावच्या भागात जत्रेच्या काळात येणाऱ्या ‘टूरिंग टॉकीज’च्या तंबूत जमिनीवर आरामात हातपाय पसरून चित्रपट पाहण्याच्या आनंदाची सर मल्टिप्लेक्सला येणार नाही. ही मजा अनुभवयाची असेल तर २२ ते २६ जानेवारीदरम्यान कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानाला नक्की भेट द्या! या काळात मैदानात प्रायोगिक चित्रपटांचा ‘कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ होत असून यामध्ये ३०हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमे पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, हे चित्रपट मैदानात उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित तंबूंमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.

अलीकडच्या काळात ‘टूरिंग टॉकीज’ किंवा ‘तंबू सिनेमा’ ही संकल्पना पुसट होऊ लागली आहे. तोच अनुभव ताजा करण्यासाठी कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘टूरिंग टॉकीज’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव यंदा २२ ते २६ जानेवारीदरम्यान कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानात पार पडणार आहे. त्यासाठी मैदानामध्ये वेगवेगळे तंबू उभारण्यात येणार आहेत. सकाळी ९ ते ५ या वेळात वेगवेगळ्या देशी आणि परदेशी भाषांमधील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. तर सायंकाळी  नृत्य, संगीत, नाटय़ कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या महोत्सवात ३०हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार असून सवरेत्कृष्टचित्रपट व कलाकारांचा गौरवही करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक संदीप गायकर यांनी दिली.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांची रेलचेल..  

पन्हाळा, पिलंट्र, गुरुकुल, साँकल, द श्ॉडो, द सायलेन्स, निळकंठ मास्तर, १२३४, भोभो यांच्यासारख्या मराठी चित्रपटांसह स्पॅनिश, इंग्लिशसारख्या परदेशी भाषांमधील चित्रपटांचा अस्वाद रसिकांना घेता येणार आहे. चित्रपट महोत्सवासाठी बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांची नावे पुरेशी प्रचलित नसली तरी हे सर्व आशयघन चित्रपट आहेत, असे या महोत्सवाचे दिग्दर्शक विनोद शिंदे यांनी व्यक्त केले.