‘अ‍ॅग्रीबाइंड’ रसायन मिसळून खड्डे बुजवण्याचा ठाण्यात प्रयोग; पाच वर्षांपर्यंत खड्डे न पडण्याचा दावा

रस्त्यांवर पडलेले खड्डे वेळोवेळी बुजवूनदेखील ते पुन्हा उघडे पडत असल्यामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या ठाणे महापालिकेने आता खड्डे बुजवण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अ‍ॅग्रीबाइंड’ नावाचे रसायन खडीत मिसळून बुजवलेले रस्ते पाच वर्षांपर्यंत उखडत नाहीत, असा दावा संबंधित कंपनीने केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर या तंत्राचा वापर करून ठाण्यातील काही भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जाणार असून भारतात प्रथमच या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोखले मार्ग, पाचपाखाडी, वागळे इस्टेट, घोडबंदर या भागातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली. या खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावून जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. या खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून सातत्याने टीकेचे धनी ठरलेल्या महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याची कामे हाती घेतली आहेत. मात्र, डांबर आणि सिमेंट काँक्रीटने भरलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उखडत आहेत. शहराबाहेरील महामार्गावरही खड्डे पडल्याने येथेही वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे हाती घ्या असे आदेश महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. असे असले तरी बुजविलेले रस्ते पुन्हा उखडत असताना अभियांत्रिकी विभागाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान, असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावरील खड्डे अमेरिकन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भरण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. या संदर्भात बुधवारी आयुक्त जयस्वाल यांची अमेरिकन कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारे खड्डे भरले जातील अशी माहिती देण्यात आली. ‘अ‍ॅग्रीबाइंड’ नावाचे द्रव्य स्वरूपातील पॉलिमरसदृश्य रसायन खडीमध्ये मिसळून रस्ते तसेच खड्डे भरण्यासाठी वापरले तर कमीत कमी पाच वर्षांपर्यंत रस्ते टिकू शकतात, असा संबंधीत कंपनीचा दावा आहे.

हे रसायन घातक, ज्वलनशील, स्फोटक नसून ते पर्यावरणाभिमुख आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. या रसायनाचा वापर करून मीनाताई ठाकरे चौक, नागरी संशोधन क्रेंदाजवळील रस्त्यावरील खड्डे प्रायोगिक तत्त्वावर भरले जाणार आहेत. त्यानंतर या रसायनांची पडताळणी करून भविष्यात रस्ते बांधण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल, याबाबत महापालिका निर्णय घेणार आहे.