‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ परिसंवादात तज्ज्ञांचा सल्ला

ठाणे : आहार हा मनाला तुष्टी आणि शरीराला पुष्टी देणारा असावा. आहाराच्या खालावत्या दर्जामुळे आणि जेवणाच्या अनियमित वेळांमुळे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. सर्वानीच पौष्टिक आहाराला शास्त्रोक्त योगाभ्यासाची जोड देणे आवश्यक आहे, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी शनिवारी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव परिसंवाद आणि प्रदर्शना’त दिला. ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे झालेल्या या दोनदिवसीय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

बदलत्या जीवनशैलीचे परिणाम कुटुंबातील लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वावरच होत आहेत. मात्र, या परिस्थितीतही थोडीशी काळजी घेतल्यास निरोगी राहणे शक्य आहे. त्यासाठी महत्त्वाचे तीन घटक म्हणजे आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्य. परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी – शनिवारी या तीन प्रमुख मुद्दय़ांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला.

‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर डॉ. अद्वैत पाध्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. आज अनेक महिला एकीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे कार्यालयीन कामकाज सांभाळताना दिसतात. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांशी किंवा कार्यालयातील सहकाऱ्यांशी तंटे होतात. या घटनांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशा तणावाच्या परिस्थितीत त्यांनी काय करायला हवे आणि इतरांनी स्त्रियांशी कसे वागायला हवे, याचे मार्गदर्शन पाध्ये यांनी केले.  योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि शास्त्रोक्त पद्धतीने विविध योगप्रकार केल्यास शारीरिक, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे शक्य होते, असे योगतज्ज्ञ आणि योगअभ्यासक डॉ. आशीष फडके यांनी सांगितले. योग आणि आयुर्वेद या विषयाची उकल डॉ. फडके यांनी केली. पौष्टिक आहार म्हणजे बाजारात चर्चा असणारे चढय़ा दराचे पदार्थ नव्हेत. पूर्वीपासून आहारात ज्या पारंपरिक पदार्थाचा समावेश आहे, तोच खरा पौष्टिक आहार, असे सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अरुणा टिळक यांनी सांगितले. घरच्या घरी पौष्टिक आहार या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रेक्षकांच्या विविध शंकांचे तज्ज्ञांनी निरसन केले.

प्रायोजक

‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाचे वास्तु रविराज, पितांबरी प्रोडक्टस् प्रा. लि. सहप्रायोजक असून पॉर्वड बाय पार्टनर तन्वी हर्बल आणि हिलिंग पार्टनर ब्रह्मविद्या आहेत. बँकिंग पार्टनर डीएनएस बँक आहेत. हेल्थ इव्हेंट सर्पोटेड बाय आशापुरा ग्लोबल प्रोजेक्ट आणि मँगो व्हिलेज, गुहागर आहेत. या परिसंवादाचे ट्रॅव्हल पार्टनर स्पंदन टूर्स प्रा. लि. असून हार्ट केअर पार्टनर माधवबाग हे आहेत.