22 January 2018

News Flash

‘मेहनतीबरोबर आत्मविश्वास गरजेचा’

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमात तज्ज्ञांचा सल्ला

प्रतिनिधी, ठाणे | Updated: May 20, 2017 2:06 AM

पोलीस आयुक्त सत्यनारायण

लोकसत्ता मार्ग यशाचाकार्यक्रमात तज्ज्ञांचा सल्ला; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शैक्षणिक प्रवासाच्या महत्त्वाच्या टप्प्यात करिअरच्या वेगवेगळ्या पर्यायांचे दालन विद्यार्थ्यांना शुक्रवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमात खुले झाले. करिअरच्या वाटा शोधताना निवडलेल्या पर्यायांसाठी लागणारी नियोजित मेहनत, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांकडे असल्यास यशाचा मार्ग सोपा होतो, असे सूत्र विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमात लाभले. अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त सत्यनारायण यांनी प्रशासकीय सेवेतील विविध संधी आणि आव्हानांविषयी विद्यार्थ्यांना या वेळी मार्गदर्शन केले.

प्रशासकीय सेवेत करिअर करायचे असल्यास पहिल्या टप्प्यात यशस्वी होणारे विद्यार्थी क्वचित असतात. दुसऱ्या टप्प्यात यशस्वी होईपर्यंत वाट पाहण्याचा संयम विद्यार्थी आणि पालकांमध्ये असावा लागतो. प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या पालकांची भूमिका महत्त्वाची असते. यश मिळेपर्यंत आपल्या पाल्याला सहकार्य करणे हे पालकांच्या भूमिकेत महत्त्वाचे ठरते. यूपीएससीमध्ये यश मिळाले नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मेहनत आणि जिद्दीने नक्की यश मिळते, असे मार्गदर्शन सत्यनारायण यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पालकांकडून नोकरीसाठी दबाव आणला जातो. मात्र विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पालकांकडून आणला जाणारा दबाव यशात अडथळा ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय सेवेत आल्यावर निर्णय घेणे महत्त्वाचे असते. आव्हानांना स्वीकारत मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करावा लागतो. या अधिकाराचा वापर सामान्य माणसांसाठी करून स्वत:च्या निर्णयाचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी प्रशासकीय सेवेतील आव्हानांबद्दल बोलताना सांगितले.

अभ्यास करताना येणारा ताणतणाव कसा दूर करावा याविषयी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रयत्नांचे नियोजन करत ध्येयांचे विभाजन करणे गरजेचे असते. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी भावनांचा कणखरपणा महत्त्वाचा ठरतो. आवडते करिअर निवडताना क्षमता महत्त्वाची ठरते.

आवड आणि क्षमतेच्या समतोलावर कृती साधली तर यश नक्की मिळते, असा सल्ला डॉ. आनंद नाडकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला. जाहिरात क्षेत्रातील अभिजीत करंदीकर, आवाजातील करिअरविषयी प्रसिद्ध आर.जे. रश्मी वारंग, डिजिटल मीडियातज्ज्ञ मिहिर करकरे, क्रीडातज्ज्ञ वर्षां उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जेईई आणि नीट परीक्षेविषयी प्रा. किशोर चव्हाण आणि प्रा. विनायक काटदरे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले.

प्रवेशिका कुठून मिळवाल?

  • ’ प्रवेशिका शुल्क ५० रुपये. खालील ठिकाणी प्रवेशिका मिळतील-
  • ’ हॉटेल टिपटॉप प्लाझा- एलबीएस मार्ग, ठाणे (प.)
  • ’ लोकसत्ता कार्यालय, ठाणे- दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या मागे, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे (प.)
  • ’ विद्यालंकार- ईशान आर्केड, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले मार्ग, ठाणे (प.)
  • ’ यासोबत ऑनलाइन प्रवेशिकाही उपलब्ध आहेत.

www.townscript.com

/e/loksatta-marga-yashacha-330402

प्रायोजक

  • अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत. तर, विद्यालंकार आणि एमआयटी-आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे हे असोसिएशन पार्टनर आहेत. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स हे सपोर्टेड बाय पार्टनर आहेत. युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, सासमिरा, विजय शेखर अ‍ॅकॅडमी आणि लक्ष्य अ‍ॅकॅडमी हे पॉवर्ड बाय पार्टनर्स असून ‘युअरफिटनेस्ट’ या कार्यशाळेचे हेल्थ पार्टनर आहेत.

 

First Published on May 20, 2017 2:05 am

Web Title: expert advice in loksatta marg yashacha
  1. No Comments.