सेवेतील डॉक्टरांचे राजीनामे देण्याचे सत्र सुरूच; वसई-विरार महापालिकेपुढे मोठा प्रश्न

वसई-विरार महापालिकेच्या आरोगय विभागाला तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भेडसावत आहे. पालिका रुग्णालयातील डॉक्टर एकामागून एक सोडून जात असून तज्ज्ञ सर्जन पालिकेकडे फिरकत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या, खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार आणि सर्वसामान्य रुग्णांचे होणारे हाल यामुळे पालिकेने आपली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे, परंतु पालिकेला आता तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्जन पालिकेला मिळत नसताना दुसरीकडे आहेत ती डॉक्टर पालिकेची सेवा सोडून जाऊ  लागले आहेत. पालिकेकडे सध्या नालासोपारा येथे ८० खाटांचे तुळींज रुग्णालय आणि वसईत सर डी. एम. पेटीट अशी दोन रुग्णालये आहेत. याशिवाय २१ आरोग्य केंद्रे, ९ दवाखाने, २ माता बालसंगोपन केंद्रे आहेत. सध्या पालिकेकडे १५० परिचारिका, ९० डॉक्टर, आरोग्यसेवक-सेविका  ४६ प्रयोगशाळा साहाय्यक आणि ४६ फार्मास्टि आहेत. आरोग्य विभागाची एवढी मोठी व्याप्ती असताना हे मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. महापालिकेने आणखी ३ माता बालसंगोपन केंद्रे, २ आरोग्य केंद्रे तसेच ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित केले असून त्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे.

एकीकडे आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ असताना दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टरांचा कमतरता जाणवत आहे. सध्या पालिकेकडे पूर्ण वेळ स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट आहे, परंतु अनेक तज्ज्ञ नाहीत. त्यात भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, कान- नाक-  घसा तज्ज्ञ, दंतचिकित्सक आदींचा समावेश आहे. पालिका रुग्णालयात शस्त्रक्रिया होत नसल्याने सर्जन नाही. पालिका तज्ज्ञ डॉक्टरांना केवळ मानद सेवेवर बोलावले जाते. त्यासाठी हे तज्ज्ञ डॉक्टर यायला तयार नसतात, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र चौहान यांनी सांगितले.

पालिकेचा नवा आकृतिबंध

आरोग्य विभागाची व्याप्ती वाढल्याने मनुष्यबळाची कमतरचा जाणवत असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. २०१४ च्या आकृतिबंधाप्रमाणे आरोग्य सेवेत मनुष्यबळ भरण्यात आले होते. मात्र वाढलेल्या आरोग्य केंद्रांची संख्या, प्रस्तावित माताबाल संगोपन केंद्र, ट्रॉमा केअर सेंटर यासाठी जास्त मनुष्यबळ लागणार आहे. यासाठी नवा आकृतिबंध तयार केला जाणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र चौहान यांनी दिली.

कामाचा ताण

महापालिकेच्या आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता असताना सेवेतील डॉक्टरांचे सोडून जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. मागील काही महिन्यांत ८ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यात ५ महिला डॉक्टर आणि ३ पुरुष डॉक्टरांचा समावेश आहे. कामाचे अतिरिक्त तास, अधिकचे काम, रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणारा त्रास यामुळे तरुण डॉक्टर काम करण्यास तयार नसतात. पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. रमेश प्रजापती यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनीही काही महिन्यातच राजीनामा दिला होता.