News Flash

निर्यातदारांकडून मच्छीमारांची लूट

मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे.

चीनमध्ये सर्वाधिक माल निर्यात होत असल्याने करोनाकाळात ही निर्यात केवळ २५ टक्कय़ांवर आल्याचे सांगत निर्यातदार मच्छीमारांचा माल वाजवीपेक्षा कमी दरात घेऊन त्यांची आर्थिक लूट करत आहेत.

वाजवीपेक्षा कमी भावात पापलेटची खरेदी

प्रसेनजी इंगळे, लोकसत्ता 

विरार : करोनाकाळाच्या सुरुवातीपासून मच्छीमारांची मोठी आर्थिक कोंडी सुरू आहे. चीनमध्ये सर्वाधिक माल निर्यात होत असल्याने करोनाकाळात ही निर्यात केवळ २५ टक्कय़ांवर आल्याचे सांगत निर्यातदार मच्छीमारांचा माल वाजवीपेक्षा कमी दरात घेऊन त्यांची आर्थिक लूट करत आहेत. यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे.

वसई, पालघर, उत्तन परिसरांत मोठय़ा प्रमाणात पापलेटचे उत्पन्न घेतले जाते. या परिसरातील पापलेटला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे गुजरात आणि इतर राज्यांतून निर्यातदार या परिसरातील मासळी खरेदी करण्यासाठी येत असतात. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी हंगाम चांगला नसल्याने जाळ्यात मासे कमी येत आहेत. कोविड १९ मुळे निर्यातीवर बंधने आले सांगून निर्यातदार कमी दराने मासे खरेदी करतात.  मागील वर्षीच्या तुलनेने यंदा २०० ते ३०० रुपये कमी दराने निर्यातदार मासळी खरेदी करत आहेत. मागील वर्षी मच्छीमारांना सुपर पापलेटसाठी १४०० ते १५०० चा किलोला भाव मिळत होता, पण या वर्षी केवळ १००० ते १२०० मिळत आहेत.

सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण यांच्याकडे  मच्छीमारांनी अनेक वेळा दर निश्चित करण्याची मागणी केली आहे, पण प्राधिकरणाने मागील दोन वर्षांपासून कोणतेही दर निश्चित केले नाहीत. यामुळे केवळ ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर दर निश्चित होत असून त्याचा फटका मात्र मच्छीमारांना सहन करावा लागतो.  यामुळे मागणी करूनही अजूनही दर निश्चित न केल्याने  या मासळीचे दर अनिश्चिततेच्या जाळ्यात सापडले आहेत. मच्छीमार सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार मच्छीमारांना मासळीचा चांगला भाव मिळत नसल्याने मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत. सध्या डिझेल आणि इतर साहित्यांचे दर वाढले आहेत. त्यात समुद्रात मासळीचे प्रमाणसुद्धा बेताचे आहे. एका फेरीला मच्छीमारांना एक ते दीड लाख रुपये खर्च येतो, त्यात त्यांना केवळ ४० ते ५० किलो मासळी मिळत आहे.

सुरुवातीला मासळीची खरेदी-विक्री ही लिलाव किंवा कोरीच्या हिशोबाने केली जात होती. त्यानंतर विविध मच्छीमार संस्थांचे जाणकार व फेडरेशनचे सदस्य हे सर्व निर्यातदारांना एकत्रित बोलावून दरनिश्चिती केली जात होती, परंतु जो दर फेडरेशन निश्चित करील तोच दर संपूर्ण जिल्ह्य़ात किंवा महाराष्ट्रात डिसेंबपर्यंत लागू करण्यात येत होता. आता काही मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी फक्त आपल्या संस्थेला दर मिळावा किंवा  आर्थिक फायद्यासाठी भावाची तोडमोड करून काम करीत असल्याचे अर्नाळा फिशारीश सूर्योदय सोसायटीचे अध्यक्ष विजय थाटू यांनी सांगितले आहे. जर भावाची तोडमोड करून मासळीची विक्री केली तर मोठा फटका येथील मच्छीमारांना बसण्याची शक्यता आहे. आधीच विविध प्रकारच्या संकटांना येथील मच्छीमार तोंड देत आहेत. त्यातच भावाच्या संदर्भातील अनिश्चितता यामुळे मच्छीमार बांधव आणखीन मेटाकुटीला आला आहे.

शीतगृह नसल्याने मिळेल त्या भावात मासे विक्री

वसई- विरार परिसरात हजारो मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करत आहेत, पण या ठिकाणी मासे साठवणुकीसाठी कोणतीही यंत्रणा नाही. अनेक वर्षांपासून मच्छीमार शीतगृहाची मागणी करत आहेत, पण अजूनही शासनाने कोणतीही मदत केली नाही. यामुळे मच्छीमारांना मासे खराब होत असल्याने मिळेल त्या भावात मासे विकावे लागत आहेत.

सध्या निर्यातीवर करोनाचे सावट घोंघावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मासे निर्यातीवर अनेक र्निबध आले आहेत. याचा फटका निर्यातदारांनासुद्धा बसत आहे, पण मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे हमीभाव देणे गरजेचे आहे. या संदर्भात अनेकवेळा शासनाच्या मत्स्यव्यवसाय तसेच  सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण यांना मागणी केली आहे, पण याकडे कोणच लक्ष देत नाही.

– संजय कोळी, अध्यक्ष, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 2:23 am

Web Title: exporters looting fishermen dd 70
Next Stories
1 वाढीव वीज देयकाच्या दोन लाख तक्रारी
2 बॅँक, टपाल कार्यालयांची ‘आधार’कडे पाठ
3 शिक्षण यंत्रणा डळमळीत
Just Now!
X