ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर महापालिकांपाठोपाठ नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात टाळेबंदीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भिवंडी महापालिका क्षेत्रातही अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी या संदर्भात महापालिका प्रशासनाने मात्र रात्री उशीरापर्यंत भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे भिवंडी वगळता ठाणे जिल्हा पुन्हा कुलूप बंद झाल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्य़ात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने २ जुलैपासून शहरांमध्ये टाळेबंदी लागू केली होती. १२ जुलै रोजी टाळेबंदीची मुदत संपुष्टात येण्याआधीच ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत वाढविली. त्यापाठोपाठ नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात टाळेबंदीची मुदत वाढविण्याचे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्यानुसार नवी मुंबई शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र वगळून टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे, तर उल्हासनगरमध्ये २२ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आली आहे. या संदर्भात दोन्ही महापालिका प्रशासनाने आदेश काढले आहेत. त्याचप्रमाणे अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, शहापूर, मुरबाड या भागात टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून यासंबंधीचे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत. टाळेबंदीची मुदत वाढविताना जुनेच नियम लागू राहणार असल्याचे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात दिवसभरात २ हजार २३२ रुग्ण, ५३ मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदीचा कालावधी वाढवत जात असल्या तरी त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे रोजच्या करोना रुग्णसंख्येवरून पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात शनिवारी तब्बल २ हजार २३२ नवे करोना रुग्ण आढळले असून यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता ५३ हजार १५२ इतकी झाली आहे.  शनिवारी दिवसभरात तब्बल ५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण मृतांची संख्या १ हजार ५६० इतकी झाली आहे.

शनिवारी कल्याण-डोंबिवली शहरात तब्बल ६१५, ठाणे शहरात तब्बल ४५६ नवे रुग्ण नोंदले गेले. या दोन शहरांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून आढळलेल्या  रुग्णांमधील शनिवारी आढळलेली रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. उल्हासनगरमध्ये २९५, नवी मुंबईत २५३, मीरा-भाईंदरमध्ये २४३, ठाणे ग्रामीणमध्ये १३४, अंबरनामध्ये ९९, बदलापूरमध्ये ७६, भिवंडीमध्ये ६१ रुग्ण आढळले. शनिवारच्या मृत्यूंमध्ये   ठाण्यातील सर्वाधिक १७, कल्याणमधील ९, नवी मुंबईतील ८ जणांचा समावेश आहे.