बनावट गुन्हे दाखल करून त्यामार्फत खंडणी उकळण्याच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच इतर ८ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. केतन मनसुखलाल तन्ना नामक ५४ वर्षीय व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी देखील परमबीर सिंह यांच्याविरोधात बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

केतन मनसुखलाल तन्ना या ५४ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. केतन तन्ना आणि त्यांच्या पत्नीला खंडणीसाठी धमकावलं जात होतं, असा आरोप तन्ना यांचे सह तक्रारदार सोनू जालान यांनी केला आहे. यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, रवी पुजारी, एन. टी. कदम, राजकुमार कोथमिरे आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचं जालान यांनी सांगितलं.

 

दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांसोबतच इतरही अनेकांची नावं आहेत. त्यामध्ये विमल अगरवाल, त्यांची पत्नी, त्यांचा भाऊ, जुबेर मुजावर, मनीष शाह, रितेश शाह, बच्ची सिंह, अनिल सिंह यांची नावं गुन्ह्यामध्ये आहेत. विमल अगरवाल केतन तन्ना यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणी मागत होता, तर त्यांची पत्नी केतन तन्ना यांच्या पत्नीला घाबरवत होती, असं देखील सोनी जालान यांनी सांगितलं आहे.

याआधीही गुन्हा दाखल, SIT ची स्थापना

परमबीर सिंह यांच्याविरोधात याआधीदेखील खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट गुन्हे दाखल करून खंडणी उकळल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली आहे.

याप्रकरणी संजय पुनामिया आणि सुनील जैन यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांकडे दाखल तक्रारीत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, सिद्धार्थ शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांची नावे समोर आली होती. त्यातील पठाण आणि कोरके यांनी पैसे घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांची नायगाव येथील सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या (प्रकटीकरण डी-१) पोलीस उपायुक्त पदाचा कार्यभार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.