पोलिसांच्या कृतीचा निषेध करण्याचा बार असोसिएशनचा ठराव

खंडणीखोरीचा विळखा

वसई : खंडणी प्रकरणात आता वसईतील नामांकित वकील अ‍ॅड्. नोएल डाबरे आणि त्यांच्या सहकारी वकिलावर वसई पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅड्. डाबरे यांना गुन्हय़ात आरोपी केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आणि वकिलाच्या संघटनेने पोलिसांचा निषेध व्यक्त केला. अ‍ॅड्. डाबरे यांनी तात्काळ वसई न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला असून या कारवाईविरोधात मुख्यंमत्र्यांकडे तक्रार केली आहे. वकिलांना आरोपी केल्याने वसई बार असोसिएशनने पोलिसांच्या विरोधात ठराव केला आहे.

माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. आतापर्यंत खंडणीखोरांविरोधात १८ गुन्हे दाखल केले आहेत. वसईतील माहिती अधिकार कार्यकर्ता संजय कदम याच्यावरही वसई पोलीस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३१ मार्च रोजी वसईतील बांधकाम व्यावसायिक खालिद शेख यांच्याकडून संजय कदम याने साडेपाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केल्यानंतर कदमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यत कदम फरार होता. मात्र अचानक वसई पोलिसांनी या गुन्ह्यत कदम याचे साथीदार म्हणून अ‍ॅड्. नोएल डाबरे आणि त्यांचे               सहकारी अ‍ॅड्. धनंजय चव्हाण यांचा सहभाग दाखवून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. अ‍ॅड्. नोएल डाबरे आणि अ‍ॅड्. चव्हाण यांनी वसई न्यायालयातून या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवला आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे वसईतील वकिलांमध्ये खळबळ उडाली आहे. वसई बार असोसिएनशने शुक्रवारी याविरोधात ठराव मंजूर केला आहे. अ‍ॅड्. डाबरे आणि त्यांच्या सहकारी वकिलांवर आकसबुद्धीने आणि सूडबुद्धीने ही तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य ती चौकशी करून न्याय देण्यायी मागणी या ठरावाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मला वसई पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. टिळेकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४१ (अ)(१) अन्वये नोटीस पाठवली आणि या गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले. ही बाब धक्कादायक आहे. संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला, तेव्हा ते एकटेच आरोपी होते. त्यांचा जबाबही झाला नाही. मग आमचा सहभाग कसा? या विरोधात शेवटपर्यंत लढा देणार असून सर्वसामान्यांना खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याचा डाव उधळून लावणार आहे.

– अ‍ॅड्. नोएल डाबरे