आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : मध्य रेल्वेच्या आटगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करत तिला लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर खडबडून जाग झालेल्या लोहमार्ग पोलिसांनी आता महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यात सुरक्षेसाठी तैनात असलेली कर्मचारी संख्या ३०० वरून ६५० म्हणजेच दुप्पट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सायंकाळी, रात्री आणि पहाटेच्या वेळेत असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन महिलांना छेडण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी या वेळेत हा अतिरिक्त बंदोबस्त महिला डब्यात तैनात केला जाणार आहे.

करोना प्रादुर्भावापूर्वी रेल्वेच्या लोकलगाडय़ांमधील महिला डब्ब्यांमध्ये राज्य शासनाच्या गृहरक्षकांमार्फत सुरक्षा पुरविण्यात येत होती. गृहरक्षक तैनात असल्यामुळे महिलांच्या डब्यांमध्ये होणाऱ्या अनुचित प्रकारांना मोठय़ा प्रमाणात आळा बसला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे राज्य शासनामार्फत रेल्वे प्रशासनाला पुरवली जाणारी ही सेवा करोनापूर्वीच बंद करण्यात आली, अशी माहिती लोहमार्ग पोलीस सूत्रांनी दिली. सध्या उपनगरी गाडय़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जातो. ऑक्टोबर महिन्यापासून सर्वच महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र बहुतेक नोकरदार घरातूनच काम करत असल्याने संध्याकाळी सात वाजेनंतर उपनगरी गाडय़ा रिकाम्याच धावत आहेत, तर काही रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येतो. त्यामुळे या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी कसाऱ्याजवळ एक महिलेचा विनयभंग करण्यात आला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या लोहमार्ग पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

लवकरच जनजागृती

रात्रीच्या वेळी धावत्या लोकलमध्ये महिलांच्या बाबतीत होणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसावा यासाठी लवकरच जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृतीसाठी लोहमार्ग पोलीस विविध रेल्वे प्रवासी संघटनांची मदत घेणार आहेत. असे प्रकार घडल्यास काय करावे, दक्ष राहून प्रवास कसा करावा, रात्रीच्या वेळी कर्मचारी तैनात असलेल्या डब्ब्यांमधून प्रवास करावा अशा विविध विषयांवर महिलांना माहिती देणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

घटना काय?

कसारा येथे राहणारी एक २१ वर्षीय तरुणी २५ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ठाण्याहून कसाऱ्याच्या दिशेने लोकलने प्रवास करत होती. या वेळी तिच्यासोबत लोकलमध्ये अनेक महिला प्रवास करत होत्या. मात्र आटगाव स्थानकात लोकल रिकामी झाली. या वेळी दोन तरुण धावत्या लोकलमध्ये चढले. दोघेही दारूच्या नशेत होते. त्या दोघांनी पीडित तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला लोकलमधून फेकून देण्याचाही प्रयत्न केला. मात्र या घटनेत सुदैवाने ती बचावली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

सुरक्षा उपाययोजना काय?

  • मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सायंकाळी, रात्री आणि पहाटे या अंधाराच्या वेळेत उपनगरीय लोकल गाडय़ांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोहमार्ग पोलिसांनी महिला डब्ब्यांची सुरक्षा वाढवली आहे.
  • यापूर्वी दोन्ही मार्गावर धावणाऱ्या लोकलगाडय़ांमध्ये केवळ ३०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, २५ नोव्हेंबरच्या प्रकारानंतर लोहमार्ग पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची संख्या ६५० पर्यंत वाढवली आहे.
  • त्यासाठी प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक महिला डब्ब्यांमध्ये तैनात केले आहे. या पथकांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
  • प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये तैनात असणारे लोहमार्ग पोलीस गाडी स्थानकात आल्यावर गाडीमध्ये तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद करतात. हा अहवाल दुसऱ्या दिवशी स्थानिक लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांकडे जमा केला जातो.