दिवा, मुंब्रा भागांतील वाढत्या वस्तीचा विचार करून या भागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दररोज सहा दशलक्ष लिटर वाढीव पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही पट्टय़ांत पाण्याची समस्या सुटण्याची शक्यता आहे.
दिवा हे तुरळक लोकवस्तीचे गाव होते. मात्र, गेल्या काही वर्षांत या परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांमुळे येथील लोकसंख्या वाढत चालली आहे. खारफुटी कापून तसेच सागरी नियमन क्षेत्रात भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणावर चाळी उभारल्या आहेत. या चाळी, इमारतींमध्ये राहणाऱ्या वाढत्या लोकवस्तीला चाळमालकांनी महापालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून चोरून जोडण्या घेतल्या आहेत. यामुळे अधिकृत घरांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर ताण पडू लागला आहे.
कळवा, मुंब्रा, दिवा परिसरांतील पाण्याचे वितरण महापालिकेतर्फे करण्यात येत असले तरी पाणीपुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होत असतो. त्यामुळे महामंडळाकडून सध्या होणाऱ्या सुमारे १०० दशलक्ष लिटर पाण्याच्या पुरवठय़ात वाढ व्हावी, अशी भूमिका पालिकेने मांडली होती. त्यानुसार, महामंडळाने मुंब्रा-दिवा परिसरासाठी सहा दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवा-निळजे जलजोडणीमधून दीड एमएलडी, दिवा संयोजन जोडणीतून दीड आणि मुंब्रा मुख्य जलजोडणीतून अडीच एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.