19 January 2020

News Flash

उल्हासनगरात अतिकुपोषित बालक

या परिसरातील अंगणवाडीत या बालकाची नोंद नसल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात अतिकुपोषित बालक आढळून आले

वजन सरासरीहून कमी असल्याचा डॉक्टरांचा दावा; मध्यवर्ती रुग्णालयात उपचार

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात अतिकुपोषित बालक आढळून आले असून स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शहरातील कॅम्प क्रमांक ५ येथील हिल लाइन पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या डॉ. आंबेडकर नगर भागात अभिमन्यू ब्राह्मणे राहतात. त्यांच्या दोन वर्षांच्या मुकुंदची तब्येत गेल्या काही दिवसांत खालावली. याची माहिती मिळताच मनसेच्या विद्यार्थी सेनेचे बंडू देशमुख, समाजसेवक भरत खरे आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट घेतली. त्यानंतर तात्काळ मुकुंदाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र रोकडे यांनी या बालकाचे वजन सरासरीपेक्षा कमी असल्याचे सांगितले.

बालकाची तपासणी केली असता येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदपूरकर यांनी हे बालक अतिकुपोषित असल्याचे जाहीर केले आहे. जन्माच्या वेळी मुकुंदचे वजन अडीच किलो होते, मात्र सहा महिन्यानंतर त्याचे वजन कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या १५ दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप आहे. तो अन्न सेवन करत नसल्याचेही तपासणीत समोर आले आहे.

मुकुंदाचे वडील अभिमन्यू ब्राम्हणे रोजंदारीवर काम करतात. अनेकदा काम मिळत नसल्याने बालकाचे पोषण झाले नसल्याचीही शक्यता आहे. त्यात त्यांना दोन मुली असून एकटय़ा व्यक्तीवर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे.

दरम्यान, या परिसरातील अंगणवाडीत या बालकाची नोंद नसल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी येथील अंगणवाडी चालते त्यांना विचारले असता आठ दिवसांपासून आंदोलनामुळे अंगणवाडी बंद असल्याने सेविका उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्राथमिक तपासणीनंतर मध्यवर्ती रुग्णालयात दोन दिवस बालकाला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर ठाणे येथील कुपोषित बालकाच्या पुनर्वसन केंद्रात नेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच बालकाची शारीरिक स्थिती सुस्थितीत येईपर्यंत त्याची कायम काळजी घेण्यात येईल, अशी माहिती डॉ अशोक नांदापूरकर यांनी दिली आहे.

या प्रकरणी माहिती घेऊनच बोलू . पण कुपोषणाला अनेकदा मातेचे आरोग्य, कमी वयात झालेली लग्ने, आहाराप्रति दुर्लक्ष आदी कारणे आहेत.

– पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याणमंत्री

First Published on September 20, 2017 2:38 am

Web Title: extreme malnourished child in ulhasnagar
Next Stories
1 गणेश घोणे यांना ‘वास्तुलाभ’
2 उल्हास नदीत दोन तरूण बुडाले
3 दाऊदचा भाऊ इकबालच्या अटकेने राजकारण्यांचे धाबे दणाणले
Just Now!
X