|| कल्पेश भोईर

संक्रमण शिबिरांअभावी वसईतील शेकडो कुटुंबे अतिधोकादायक इमारतींत

मुंबईच्या डोंगरी येथे धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर वसई-विरार शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न समोर आला आहे. शहरातील अतिधोकादायक इमारतींत अद्यापही रहिवासी राहत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने तसेच पालिकेचे संक्रमण शिबिरे नसल्याने हे रहिवासी जीव धोक्यात घालून याच इमारतीत राहत आहेत.

वसई-विरार पालिकेने शहरातील ७३५ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील २७२ इमारती या अतिधोकादायक आहेत. ज्या धोकादायक आहेत त्या इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी तर ज्या अतिधोकादायक आहेत त्या खाली करण्यात याव्या अशा सूचना देण्यात होत्या. मात्र रहिवाशांनी अद्यापही या इमारती खाली केलेल्या नाहीत. नालासोपारा पूर्वेतील रघुकुल नगर टाकी रोड या भागात असलेल्या अतिधोकादायक इमारती खाली करण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता रहिवाशांनी विरोध केला. त्यामुळे पालिकेच्या पथकाला परतावे लागले. आता ही इमारत खाली करण्याऐवजी त्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

संक्रमण शिबीर नाही

जे नागरिक धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. त्यांना पालिकेच्या वतीने इमारत खाली करण्यात  यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे जरी असले तरी या नागरिकांच्या राहण्याची सोय कशी केली जाईल व इमारती खाली करून कोणत्या ठिकाणी राहायचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालिकेकडे संक्रमण शिबीर नाही. पालिकेने संक्रमण शिबिरे उभारण्याची कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याचे पालिकेने सांगितले आहे. अशा धोकादायक इमारतींत राहणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी स्वत:हून काळजी घेऊन स्वत:च्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र नागरीक इमारती रिकामी  केल्या जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाढता वाढे..

वसई-विरार महापलिकेने केलेल्या सर्वेक्षणात धोकादायक इमारतीची संख्या वाढली आहे. शहरातील नऊ प्रभाग मिळून पालिकेने तब्बल ७३५ इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. त्यांपैकी २७२ इमारती या अतिधोकादायक आहेत, तर उरलेल्या ४६३ इमारती या धोकादायक आहेत. या सर्व इमारतींना पालिकेने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या इमारती व मोडकळीस आलेल्या इमारतींचेदेखील स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यावर कारवाई सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. धोकादायक असलेल्या इमारतींची चार प्रकारांत वर्गवारी केली जात असते. यामध्ये अतिधोकादायक असलेल्या इमारती तात्काळ खाली करून जमीनदोस्त करायच्या असतात, तर दुसऱ्या वर्गातील इमारती खाली करून त्या दुरुस्त केल्या जातात, तिसऱ्या वर्गात इमारती खाली न करता दुरुस्त केल्या जातात, तर चौथ्या वर्गात इमारतींची डागडुजी केली जाते.

महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या अतिधोकादायक इमारतींना नोटिसा देऊन खाली करण्यात याव्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र नागरिक इमारती खाली करण्यासाठी नकार दिला जात असल्याने अतिधोकादायक असलेल्या इमारती पोलीस यंत्रणेला घेऊन खाली करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.    – बी. जी. पवार, आयुक्त, पालिका