News Flash

सेकंड इनिंग : नेत्रदान चळवळीचा ‘सदिच्छादूत’

नेत्रदान प्रचाराचे काम करत असताना त्यांना बऱ्या-वाईट अनुभवांना नेहमीच सामोरे जावे लागते.

सेकंड इनिंग : नेत्रदान चळवळीचा ‘सदिच्छादूत’

गेली ३५ वर्षे तळमळीने आणि ध्येयाने मरणोत्तर नेत्रदान प्रसाराचे कार्य करणारे ठाण्याचे श्रीपाद आगाशे यांनी या वास्तवाकडेच दृष्टी ठेवून आपले कार्य सुरू केले. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आगाशे यांच्या नेत्रदान चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराला अधिक वेग आला. मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे ते ‘सदिच्छादूत’ झाले आहेत. या सगळ्या कामाची सुरुवात १९८१ मध्ये झाली.

तुला पाहते रे तुला पाहते

तुझी मूर्त माझ्या उरी राहते

तुला पाहते रे तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते..

गाण्यातील कविकल्पना ही भव्य आणि उदात्त असली तरी वास्तवात मात्र चित्र फार वेगळे आहे. भारतात आज सुमारे सव्वा कोटी लोक अंध आहेत. हे अंधत्व काहीना काही कारणाने आलेले असले तरी यातील सुमारे ३० लाख लोकांना पारपटल रोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. इतक्या लोकांना दृष्टी प्राप्त करून द्यायची असेल तर वर्षांला किमान एक ते दीड लाख लोकांचे मरणोत्तर नेत्रदान होणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने भारतात अवघ्या २५ ते ३० हजार व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान होत आहे.

गेली ३५ वर्षे तळमळीने आणि ध्येयाने मरणोत्तर नेत्रदान प्रसाराचे कार्य करणारे ठाण्याचे श्रीपाद आगाशे यांनी या वास्तवाकडेच दृष्टी ठेवून आपले कार्य सुरू केले. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आगाशे यांच्या नेत्रदान चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराला अधिक वेग आला. मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे ते ‘सदिच्छादूत’ झाले आहेत. या सगळ्या कामाची सुरुवात १९८१ मध्ये झाली. अणुशक्ती खात्यातील नोकरीच्या निमित्ताने आगाशे हे १९७१ ते १९९१ या कालावधीत चेन्नईजवळील कल्पाकम येथे वास्तव्यास होते. १९८० च्या सुमारास ‘रीडर्स डायजेस्ट’मधील एक लेख त्यांच्या वाचनात आला आणि त्यांची ‘दृष्टी’ बदलून गेली. श्रीलंकासारखा छोटा देश फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला डोळे पुरवतो, अशी माहिती त्या लेखात होती. ते वाचून आगाशे अस्वस्थ झाले. भारतापेक्षा कितीतरी पटीने लहान असणारा देश नेत्रदान चळवळीत इतके मोठे काम करू शकतो आणि आपण त्या तुलनेत कुठेच नाही, या लाजिरवाण्या वास्तवाने ते बैचैन झाले. नेत्रदानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी चेन्नईजवळील एगमोर येथील नेत्ररुग्णालय व नेत्रपेढीला भेट दिली. तेथील डॉक्टर्स व तज्ज्ञांशी बोलून हा विषय समजून घेतला. पुस्तके वाचून अभ्यास केला आणि याच विषयावर काम करण्याचे नक्की केले. नोकरीत असताना शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्यांनी हा विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अर्थात नोकरीमुळे या कामावर काही मर्यादा होती. १ जानेवारी २०११ मध्ये आगाशे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे या कामाला वाहून घेतले.

‘नेत्रदान एक राष्ट्रीय गरज’ या विषयावर त्यांनी मुंबई, ठाणे परिसर तसेच राज्यभरातही विविध ठिकाणी सुमारे अडीचशे व्याख्याने दिली आहेत. विविध ठिकाणी भरणारी प्रदर्शने, ग्राहक पेठा यातही आगाशे सहभागी होतात. येथे भेट देणाऱ्या लोकांपर्यंत पत्रके  वाटप करून आणि त्यांच्याशी संवाद साधून आगाशे हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवितात. त्यासाठी आगाशे यांनी मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी भाषेत नेत्रदान चळवळीविषयीची माहिती देणारी पत्रके छापून घेतली आहेत.

नेत्रदान प्रचाराचे काम करत असताना त्यांना बऱ्या-वाईट अनुभवांना नेहमीच सामोरे जावे लागते. काही मंडळी आगाशे यांच्या कामाचे तोंडदेखले कौतुक करतात आणि आपल्यावर प्रसंग आला की नातेवाईक काय म्हणतील, रूढी, परंपरा यांचा विचार करून नेत्रदानाचे पाऊल मागे घेतात. खरे तर मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची नेत्रदानात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे त्यांनी अशा प्रसंगी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आगाशे सांगतात. मरणोत्तर नेत्रदान चळवळीत सुशिक्षित मंडळींपेक्षा कमी शिकलेल्या आणि अशिक्षित लोकांचा अधिक सहभाग आहे. तसेच स्त्रियांची संख्याही खूप मोठी असल्याचे निरीक्षण ते नोंदवितात.

मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याकडेही ते लक्ष वेधतात. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ठरविले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात. मृत्यूनंतर एक किंवा दोन तासांतच नेत्रदान केले पाहिजे असे सांगितले जाते, पण त्यात तथ्य नाही. सहा तासांपर्यंत नेत्रदान होऊ शकते. काही दिवसांच्या बालकांपासून ते ८० ते ९० वर्षांपर्यंतच्या वृद्ध व्यक्तींचे नेत्रदान केले जाऊ शकते. डोळे काढून घेतल्यानंतर पूर्ण डोळ्याचे रोपण केले जात नाही तर डोळ्यातील पारपटलाचे रोपण केले जाते. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान करण्याची परवानगी स्थानिकपोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकारात देऊ शकतात.  पण पोलिसांनाही या विषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे पोलिसांचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे. सर्व खासगी किंवा शासकीय रुग्णालयांतून रुग्णाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडून एक अर्ज भरून घेतला जातो. त्यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, अशी एक अट असते. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचे नेत्रदान करण्याविषयीची एक अटही त्या अर्जात टाकली तर नेत्रदानासाठी आणि अंधांना दृष्टी मिळवून देण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकेल, याकडेही आगाशे लक्ष वेधतात.

अनेक सामाजिक संस्था, धार्मिक किंवा आध्यात्मिक गुरूंकडून लोकांचे मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जातात. पण केवळ अर्ज भरून घेणे उपयोगाचे नाही. संबंधित व्यक्तीला ‘डोनर कार्ड’ मिळेल व सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केलेली आहे ना, याचीही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आगाशे आवर्जून सांगतात. मरणोत्तर नेत्रदानाच्या प्रचाराबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आगाशे मरणोत्तर अवयवदान तसेच त्वचादान याचाही प्रचार करत आहेत. आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाचे ते आजीव सदस्य आहेत. आगाशे यांच्या पत्नी पुष्पा तसेच अनिल आणि आशीष ही दोन्ही मुलेही त्यांच्या परीने या कामात आगाशे यांना मोलाची मदत करत असतात.

श्रीपाद आगाशे- ९९६९१६६६०७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:22 am

Web Title: eye donation campaign
टॅग : Eye Donation
Next Stories
1 वीकेण्ड  विरंगुळा : रविवारी सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात
2 फेर‘फटका’ : होर्डिग्जचा विळखा सुटणार?
3 यंदा वसई-विरार तुंबणार?
Just Now!
X