|| मानसी जोशी-पूर्वा साडविलकर, ठाणे

दांडिया दुपट्टा, फॅ ब्रिक आणि ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा ट्रेंड:- अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सवासाठी मुंबई आणि ठाणे शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या असून या बाजारपेठांमध्ये दांडिया दुपट्टा तसेच आभूषणांचा एक प्रकार असलेल्या ऑक्सिडाइज्ड तसेच कपडय़ांपासून तयार केलेले दागिने आणि इंडो वेस्टर्न कपडय़ांचे नवे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. यासोबतच पारंपरिक चनियाचोळी आणि घागरा यांमध्येही नवनवीन प्रकार बाजारात उपलब्ध झाले असून खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्ताने मुंबई आणि ठाण्यात रंगणाऱ्या गरबा आणि रास दांडियासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक वेशभूषा आता नवनव्या ढंगांत बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचसोबत दांडियासाठी कपडे आणि दागिन्यांमध्ये यंदा पाश्चिमात्य प्रकारचे दागिनेही उपलब्ध आहेत. केडिया हा पारंपरिक गुजराती वेशभूषेचा प्रकार असून महिला आणि पुरुष दोघांनाही तो वापरता येतो. याच पारंपरिक केडिया जॅकेट आणि टॉपमध्ये पाश्चिमात्य कपडय़ांप्रमाणे बदल करण्यात आले असून त्यांच्यावर विविध प्रकारचे नक्षीकाम करण्यात आले आहे. हे केडिया जॅकेट आणि टॉप विविध रंगांमध्ये सध्या बाजारात उपलब्ध झाले असून ते ५०० रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आरसे, बांधणी, अबला आणि कशिदाचे नक्षीकाम केलेल्या दांडिया दुपट्टय़ाला बाजारात मोठी मागणी आहे. कोणत्याही कुर्त्यांवर दांडिया दुपट्टा वापरता येत असल्याने महिला आणि तरुणींमध्ये त्याला विशेष पसंती आहे. या दांडिया दुपट्टय़ांची किंमत २०० ते ५०० रुपये इतकी आहे. या वर्षी पारंपरिक चनियाचोळी तसेच घागरा या पोशाखाला इंडोवेस्टर्न कपडय़ांची साथ मिळालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर क्राँप टॉप आणि जीन्सवर जांभळ्या, हिरव्या, लाल अशा गडद रंगांची इरकल साडीची खरेदी करण्याकडेही महिलांचा कल असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅटूच्या किमतीत वाढ

नवरात्रीच्या निमित्ताने अनेक तरुण टॅटू काढत असून टॅटूसाठी आर्टिस्टकडे मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे यंदा टॅटूच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ६०० रुपयांत काढला जाणार टॅटू हा नवरात्रीनिमित्ताने ८०० रुपयांत काढला जात आहे. तर १ हजारांचा टॅटू हा १ हजार ५०० रुपयांमध्ये काढून देण्यात येत असल्याचे टॅटू आर्टिस्ट मुकेश पवार यांनी सांगितले. तसेच यंदा तरुणींमध्ये मंडाला टॅटू हा नवा ट्रेंड आला आहे.

फॅ ब्रिक, ऑक्सिडाइज्ड आणि हिप्पी प्रकारच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे. जुने आणि नवीन असे फ्युजन प्रकारचे कपडे, दागिने, वेण्या यांची विक्री होत आहे.  – फाल्गुनी पवार,दागिने विक्रेती