मुंबईच्या परिघात सध्या किफायतशीर घरांच्या उपलब्धतेमुळे अंबरनाथ शहर झपाटय़ाने वाढत आहे. औद्योगिक विभागामुळे राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागांतून लोक येथे स्थायिक होऊ लागले आहेत. सुंदर हवा, निसर्गाचे सान्निध्य, परवडणारी घरे आदींमुळे अंबरनाथ-बदलापूर भागात अनेक जण निवाऱ्याच्या शोधात येऊ लागले. परंतु, प्रत्येकाच्या नशिबी वरील वैशिष्टय़े येत नसून अनेकांना त्रासही सहन करावा लागत आहे. अशीच, काहीशी परिस्थिती अंबरनाथ पूर्वेकडील पनवेलकर ग्रीन सिटी येथे राहणाऱ्या नागरिकांची झाली आहे.
बरनाथ शहराच्या पूर्वेकडील काटई नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गालगतच पनवेलकर ग्रीन सिटी हा मोठा गृह प्रकल्प उभा राहिला आहे. २०१० पासून नागरिक येथे राहायला येऊ लागले. सध्या येथे १६ इमारती आहेत. या इमारतींमध्ये ६५० सदनिका असून एकूण येथे अंदाजे ३ हजार रहिवासी राहतात. अंबरनाथमधील मोठय़ा वसाहतींपैकी ही एक आहे. वसाहतीतील वातावरण मोकळे असून येथील रहिवासी हौशी आहेत. नेपाळमध्ये झालेल्या मोठय़ा भूकंपानंतर येथील मदतकार्यासाठी या रहिवाशांनी लायन्स क्लबमार्फत ५० हजार रुपयांची मदत केली होती. तर, अंबरनाथ येथील एका अनाथाश्रमाला स्वातंत्र्यदिनाला ६८ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ग्रीन सिटीने १२० डझनपेक्षा जास्त वह्य़ांचे वाटप केले होते. या सढळ हस्ते केलेल्या मदतीनंतरही हे रहिवासी गृहसंकुलातील नागरिकांसाठी सांस्कृतिक, क्रीडा तसेच आरोग्यपर कार्यक्रमांचेही आयोजन करतात. त्यात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर घेऊन येथे ८६ बाटल्या रक्त जमा करण्यात आले आहे. याचप्रमाणे २६ जानेवारी व १५ ऑगस्टला प्रभात फेरी काढणे, गणेशोत्सव, नवरात्री, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मुलांसाठी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येते. असे येथील रहिवासी तुषार जोशी यांनी सांगितले. त्यामुळे खेळीमेळीचे व उत्सवी वातवारण असलेल्या या सोसायटीला आता हळूहळू समस्यांनी ग्रासण्यास सुरुवात केली आहे. निकृष्ट रस्ते व पाण्याची समस्या यामुळे येथील नागरिक हतबल झाले असून सगळ्यात जास्त त्रास हा क्षेपणभूमीचा आहे, कारण या सोसायटीशेजारीच अंबरनाथ नगरपालिकेची क्षेपणभूमी असून तेथील दरुगधीने रहिवासी हैराण झाले आहेत. तसेच गृहसंकुलांतर्गत पुरविण्यात आलेल्या सुविधा अपुऱ्या व काही सुविधा जागेवरच नसल्याने आता येथील रहिवाशांची गैरसोय होत आहे.
क्षेपणभूमीचा धूर व निकृष्ट रस्ते
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक कराचा भरणा करणाऱ्या या सोसायटीच्या अनेक समस्यांना पालिकेने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या पनवेलकर ग्रीन सिटीशेजारीच असलेल्या क्षेपणभूमीवर पालिकेकडून शहरातून गोळा केलेला १०६ टन कचरा दररोज टाकण्यात येतो. तसेच या क्षेपणभूमीवरील कचऱ्याला दररोज आग लावण्यात आल्याने त्याचा सर्व धूर हा ग्रीन सिटीमध्ये येतो. यामुळे येथील नागरिकांना दम्याचे व श्वसनाचे विकार जडू लागले आहेत. या क्षेपणभूमीच्या मुद्दय़ांबाबत सोसायटीतील नागरिकांच्या एक हजार सह्य़ांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर घालण्यात आला. मात्र यावर उपाय झालेला नाही, असे रहिवासी प्रशांत चौधरी म्हणाले. तसेच, या सोसायटीकडे येण्याचे दोन मार्ग असून त्यातील एक रस्ता हा महामार्गाकडून येत असून दुसरा मार्ग हा बी-केबिन रस्त्याच्या दिशेने येतो. महामार्गाकडून येणारा रस्ता हा खराब असून याच खराब महामार्गावरील खड्डय़ांमुळे सोसायटीत राहणाऱ्या महिलेचा मृत्यूही झाला होता.
पाणी फक्त २० मिनिटे
ग्रीन सिटीमध्ये पाण्याची समस्याही बिकट असून गेल्या उन्हाळ्यात पाण्यामुळे येथील अनेकांचे हाल झाले. एका इमारतीत जवळपास ४२ सदनिका असून या एका इमारतीला अध्र्या इंचाच्या पाइपच्या दोनच जोडण्या असल्याने दिवसातून प्रत्येक घराला २० मिनिटेच पाणी येते. या २० मिनिटांत संपूर्ण कुटुंबासाठी पाणी भरता येत नसल्याचे व पाणी पुरतही नसल्याचे रहिवासी चौधरी म्हणाले.
तरण तलावाचे डबके
सोसायटीत बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या सुविधा या अपुऱ्या असल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत. एकूण पुरविण्यात आलेल्या ५१ सुविधांपैकी २४ सुविधा फक्त गृह प्रकल्पाच्या माहिती पुस्तिकेवरच आहेत, असे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे. यातील जॉगिंग ट्रॅक, स्केटिंग ट्रॅक या सुविधा दिल्याच नसून येथील तरण तलावाचा ताबाही देण्यात आलेला नाही. गेल्या अडीच वर्षांपासून तरण तलाव हा बंद असून त्यातील पाणी हिरवे झाले आहे. तसेच, त्यावर डासांची उत्पत्ती होत असल्याने सोसायटीत रोगराईही पसरली आहे. याचबरोबरीने अग्निशमन यंत्रणा संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसून आग लागल्यास धोका उत्पन्न होण्याची भीती आहे. माहिती पुस्तिकेत दाखविण्यात आलेले नाना-नानी पार्क हे नगरपालिका हद्दीत आहे. तर, सोसायटीच्या आतील पथदिवेसुद्धा बंद असून येथील क्लब हाउसचा ताबाही आम्हा सोसायटीधारकांना देण्यात आलेला नाही. तसेच सोसायटी करण्यात आली असली तरी तिचे मानीव अभिहस्तांतरण करण्यात आलेले नसून येथील इमारतींखालील पार्किंगच्या जागादेखील नियमबाह्य़ विकण्यात आल्या आहेत, अशी माहिती काशिनाथ मांढरे व नितीन कारंडे यांनी दिली. थोडक्यात, पाच वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या गृहसंकुलात ३ हजारांच्यावर नागरिक खेळीमेळीच्या वातावरणात राहत असले तरी, ते अंबरनाथमध्ये स्थायिक झाल्यापासून त्यांना शांतता व आनंद मिळण्याऐवजी येथील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सुखी जीवनाची संकल्पना मनात घर करून इथे किफायतशीर दरात घर मिळवलेल्या या लोकांना एकमेकांचे पश्चात्तापाचे तोंड बघावे लागत असल्याने तणावयुक्त जीवन जगावे लागत आहे. पालिकेने त्यांच्या काही मोजक्या अपेक्षा पूर्ण कराव्यात जेणेकरून त्रास संपेल हीच मागणी त्यांनी अखेरीस बोलून दाखविली आहे.

पनवेलकर ग्रीन सिटी हा गृह प्रकल्प नोंदणी होऊन त्याची सोसायटी होत ती रहिवाश्यांना बांधकाम व्यावसायिकाकडून हस्तांतरित झाली आहे. सोसायटी झाल्याने अंतर्गत दुरुस्तीचे काम हे सोसायटीतील रहिवाश्यांचे आहे. तसेच, आम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व सुविधा या आम्ही सोसायटीधारकांना पुरविल्या आहेत. यातील अग्निशमन खात्याची परवानगी आम्हाला नगरपालिकेकडून रीतसर प्राप्त झाली आहे. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा योग्य स्थितीत आहे. तसेच अन्य सुविधांचीदेखील आम्ही पूर्ती केली आहे. त्यामुळे, आमच्या बाजूने गृह खरेदीदारांना दिलेली हमी आम्ही पूर्ण केली आहे.
– राहुल पनवेलकर, बांधकाम व्यावसायिक, पनवेलकर ग्रीन सिटी