बोगस पारपत्रही ऑनलाइन बनवून देणारी अ‍ॅप्स उघडकीस

एकीकडे आधार कार्डच्या सुरक्षिततेबाबत, पॅनकार्डाबाबतच्या वैधतेबाबत न्यायपातळीवर खलबते सुरू असताना ऑनलाईन बाजारात मात्र त्यांची अस्सल शोभणारी प्रतिकृती मिळवणे सहजसाध्य गोष्ट बनली आहे. जगातील कुठल्याही व्यक्तीला भारतीय आधार कार्ड, पारपत्र, पॅनकार्ड बनविता येणे शक्य असल्याचे उघडकीस आले आहे.  ‘गुगल प्ले स्टोर’वर सध्या बनावट भारतीय दस्तावेज बनविणारी अ‍ॅप्सचा जोमात वापरली जात आहेत. अवघ्या पाच मिनिटात कुणालाही हवी ती कार्ड्स येथून बनवून मिळत आहेत. ती खऱ्या कार्डाइतकीच तंतोतंत दिसत असल्यामुळे कुणालाच त्याचा संशय येऊ शकत नाही.

नागरिकत्वाची ओळख म्हणून आधार कार्ड, पारपत्र, पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज मानले जातात. अनेक कागदपत्रांची पडताळणी आणि विविध कठोर निकष पूर्ण केल्यानंतर ते बनविले जातात. पॅन कार्ड ओळख पटविण्यासाठी महत्त्वाचा शासकीय पुरावा म्हणून मानला जातो. परंतु अवघ्या पाचच मिनिटात हे पॅन कार्ड, आधार कार्ड, पारपत्र आणि इतर दस्तावेज बनवता येऊ  शकतात. गुगल प्ले स्टोरवर अशी बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड कुणालाही जगातून मिळू शकतात.

अनेकांनी अशा प्रकारे महत्त्वाचे भारतीय शासकीय दस्तावेज बनवले असतील अशी भीती माहिती अधिकार कार्यकर्ते  प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी व्यक्त केली. पोलीस, सरकारी अधिकारी असल्याची ओळखपत्रे, मोटार वाहन परवानांच्या प्रतिकृतीदेखील या विविध अ‍ॅप्समधून बनवून मिळत आहेत. या प्रकारच्या अ‍ॅप्सबाबत अद्याप पोलीस तसेच सायबर सेलला माहिती नाही. वसईचे उपअधीक्षक अनिल आकडे यांनी असे अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. आम्ही या अ‍ॅप्सची खातरजमा करू आणि त्यावर बंदी घालण्यासाठी योग्य ती पावले उचलू असेही त्यांनी सांगितले.

प्रकार काय?

ही अ‍ॅप्स अत्यंत सोपी असून हवी ती जन्मतारीख, नाव आणि फोटो टाकून हे आधार कार्ड बनविले जाते. अ‍ॅपवर आधार कार्ड बनविल्यानंतर लगेच त्याचे प्रिंटआऊट काढता येते. माहिती अधिकार कार्यकर्ते  प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले. कुतूहल म्हणून तपासण्यासाठी त्यांनी हिटलर आणि ट्रम्प यांची माहिती टाकली असता त्यांच्या नावानेही आधार कार्ड तयार झाले.