बंदुकीचा परवाना असलेल्या एका नागरिकाने डोंबिवली एमआयडीसीतील मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या बंगल्याचा पत्ता देऊन पोलिसांना गुंगारा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

डोंबिवली शहरात काही दिवसांपासून हत्या, मारहाण तसेच धमकाविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर डोंबिवली हद्दीतील पोलीस ठाण्यांनी हद्दीत पिस्तूल, बंदूक, रिव्हॉल्व्हरचा परवाना घेतलेल्या व्यक्तींना शस्त्र कायद्याद्वारे नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. शस्त्रसाठा, तसेच जिवंत काडतुसांची माहिती पोलीस ठाण्यात दिली जावी, अशा सूचना या माध्यमातून दिल्या जात आहेत. अग्निशस्त्राची तपासणी केल्यानंतर परवानाधारक व्यक्तींकडून आधारकार्ड, पॅनकार्डची नक्कल प्रत ताब्यात घेण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी एमआयडीसीतील उस्मा पेट्रोल पंपासमोरील देव कुटुंबीयांच्या बंगल्यासमोर दुपारच्या वेळेत दोन बंदूकधारी पोलीस हजर झाले. बंगल्याच्या बाहेरील रस्त्यावर एक मनोरुग्ण सतत येरझऱ्या मारतो. परिसरातील बंगल्याच्या आवारात प्रवेश करतो. त्यामुळे देव कुटुंबीयांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. पोलीस बंगल्यासमोर उभे राहिल्यानंतर त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप पाहिले. बराच उशीर बंगल्याचे दार उघडले जात नाही म्हणून पोलिसांच्या मनात थोडा संशय बळावला. पोलीस पाहून कुटुंबीयांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप काढले. त्यांना घरात प्रवेश दिला. त्या वेळी पोलिसांनी या बंगल्यात पहिल्या माळ्यावर चेतन गडा नावाची व्यक्ती कोणी राहते का, असा सवाल देव कुटुंबीयांना केला. या पत्त्यावर बंदुकीचा परवाना घेण्यात आला आहे, असे पोलिसांनी त्यांना सांगताच कुटुंबीयांना धक्का बसला. गडा यांना या पत्त्यावरची नोटीस घेऊन पोलीस आले होते. याठिकाणी पंचवीस वर्षांहून अधिक काळ राहतो. येथे कोणीही भाडेकरू नाही. हा मालकी हक्काचा बंगला आहे, असे देव कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांची खात्री पटल्यावर ते परतले.

पोलीसही अंधारात

या घटनेमुळे शस्त्र परवान्यांमधील गौडबंगाल उघडकीस आले असून काही व्यक्तींनी बनावट पत्त्यांवर असे परवाने मिळविल्याचा संशय व्यक्त होत आहे. देव कुटुंबीयांच्या घर पत्त्यावर हा शस्त्र परवाना देताना पोलिसांनी कागदपत्रांची खातरजमा केली की नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून ठोस माहिती देण्यात आली नाही.