भाईंदर : बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपींना गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या घराच्या तपासणीत प्राणघातक हत्यारांचा साठा पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणातला नोटांची छपाई करणारा मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

गेल्या आठवडय़ात नवघर पोलिसांनी गोल्डन नेस्ट उड्डाणपुलाजवळ एका वाहनातून जाणाऱ्या पाच जणांना अटक केली होती. त्यांच्या झडतीत त्यांच्याकडे २००० आणि २०० रुपयांच्या तब्बल एक लाख वीस हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. फैजल हिदरीस शेख, इम्रान अस्लम चारोली, सैय्यद रिझवान अय्याद सैय्यद, सौद सय्यद सलीम आणि अमन मेखिया या पाच जणांना अटक केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग आणि साहाय्यक निरीक्षक टिकाराम थाटकर यांनी आरोपींच्या घरांची तपासणी केली असता घरात २००० आणि ५०० च्या आणखी २९ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा सापडल्या, तसेच चार धारदार तलवारी, एक कुकरी आणि एक एअर गन अशी प्राणघातक हत्यारे सापडली आहेत. या हत्यारांचा आरोपी नेमका कशासाठी वापर करत होते याचा तपास पोलीस करत आहेत. यासोबत पेपर कटर तसेट नोटा छपाईसाठी आणलेले कागद आदी साहित्यही घरात सापडले आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी बनावट नोटा बाजारात खपवण्याचे काम करत होते. आरोपींकडे सापडलेल्या बनावट नोटा घेऊन आरोपी भाडय़ाच्या गाडीने गोव्याला चालले होते. बनावट नोटा छापण्याचे काम यातील एक आरोपी फैजल याचे वडील मोहम्मद हिदरीस शेख करतात. मार्च महिन्यात हिदरीस याला मुंबईतील अंबोली पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे २२ हजाराच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्या प्रकरणात तुरुंगवास सोसल्यानंतर हिदरीस शेख जामिनावर बाहेर आला होता, परंतु फैजलला अटक झाल्याचे समजताच हिदरीस फरार झाला आहे. त्याचा शोध नवघर पोलीस घेत असून त्याच्या अटकेनंतर हिदरीस बनावट नोटा कोणासाठी छापत होता, त्याचे एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध आहेत का याचा खुलासा होणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.