24 January 2019

News Flash

बांगलादेशातून बनावट नोटा ठाण्यात!

दोन हजार व ५०० रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश

संग्रहित छायाचित्र

एकाला अटक; दोन हजार व ५०० रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश

निश्चलनीकरणाने बनावट नोटांना पायबंद बसेल, हा केंद्र सरकारचा दावा फोल ठरल्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील धर्मवीर परिसरात नव्या दोन हजार आणि ५०० रुपयांच्या तब्बल दोन लाख ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा खंडणीविरोधी पथकाने जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एकाला अटक झाली असून, या नोटा बांगलादेशातून झारखंडमार्गे ठाण्यात आणल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

प्रकाश प्रसाद ऊर्फ शंकर टोकल माहतो (४२, रा. झारखंड) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो महिनाभरापासून या परिसरात राहत होता. २४ लाख रुपयांच्या बनावट नोटा तो विकणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे दोन हजारच्या ११३, पाचशेच्या १०, शंभरच्या दोन बनावट नोटा सापडल्या. झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यतील हेमलाल पंडित या मित्राकडून त्या विकत घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. हेमलाल याचा शोध आता सुरू असून, त्याच्या अटकनेनंतर बनावट नोटा पुरविणारी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

First Published on February 15, 2018 1:26 am

Web Title: fake currency notes seized in thane