ठाण्यात एकास अटक; ४८ हजारांच्या नोटा जप्त

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन बनावट नोटा वटविण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीस ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून ४८ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. साहिल बरकत शेख (२०) असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे आणखी बनावट नोटांचा साठा आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. ठाणे पालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असून या पाश्र्वभूमीवर शहरात बनावट नोटा वटविणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशयही पोलिसांना आहे.

साहिल बरकत शेख (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो झारखंड राज्यातील गोहितोळा गावचा रहिवासी आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरात तो बनावट नोटांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या पथकाने साहिलला अटक केली. त्याच्याकडून एक हजार रुपये दराच्या ४८ बनावट नोटा जप्त केल्या, तसेच त्याच्याकडे कल्याण ते कांजुरमार्ग असे रेल्वेचे तिकीट मिळाले आहे. गर्दीचा फायदा घेऊन तो बाजारपेठेत बनावट नोटा वटविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे, तसेच त्याच्याकडे बनावट नोटांचा आणखी साठा आहे का, आणि त्याने या नोटा कुठून आणल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत. निवडणुकांमध्ये बनावट नोटांचे वाटप करण्यात आल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बनावट नोटा खपविणारी टोळी सक्रिय झाली आहे का, याचा तपासही पोलीस करीत आहेत. साहिलच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.