पाच रुग्णालयांना पालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस; डॉक्टरांना नोंदणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत
वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असताना आता बोगस रुग्णालयांची संख्याही वाढत असल्याचे दिसून आले आहे. एखाद्या रुग्णालयाची निर्मिती करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र शहरातील पाच रुग्णालये अशा प्रकारची कोणतीही नोंदणी न करता व्यवसाय करीत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने ही बोगस रुग्णालये शोधून काढली असून, त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. ही रुग्णालये सील करण्याची प्रकिया सुरू असून सर्व डॉक्टरांना प्रमाणपत्र दाखवून नोंदणी करण्यास सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा धंदा राजरोसपणे सुरू आहे. पालिकेच्या मर्यादेमुळे या बोगस डॉक्टरांना आळा घालता आलेला नाही. एकीकडे बोगस डॉक्टरांचे लोण वाढत असताना बोगस रुग्णालयेही वाढू लागली आहेत. पालिकेने अशी पाच बोगस रुग्णालये शोधून काढली आहेत. पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनुपमा राणे यांनी या रुग्णालयाची माहिती देताना सांगितले की, ‘‘या रुग्णालयांकडे कुठल्याच नोंदी, प्रशिक्षित स्टाफ, साधने, प्रमाणपत्रे नाहीत. त्यांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. ही रुग्णालये केवळ नावापुरती असून रुग्णांची फसगत होते, शिवाय त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.’’
वसई, विरार, नालासोपारा शहरात बोगस डॉक्टर व पॅथोलॉजी लॅबचाही सुळसुळाट झालेला आहे. परराज्यातीेल कुठल्यातरी पदवीेचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लटकवून त्यांचा धंदा सुरू आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर या बोगस डॉक्टरांविरोधात मोठी कारवाई झालेली नाही. यामुळे या डॉक्टरांचा धंदा जोरात सुरू आहे. नालासोपारा पूर्वेला बोगस
डॉक्टरांचा सुळसुळाच सर्वाधिक आहे. ज्याप्रमाणे बोगस डॉक्टर कार्यरत आहेत त्याच प्रमाणे पॅथोलॉजी लॅबसुद्धा नियम डावलून सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
कारवाई अटळ
२०१३ मध्ये पालिकेने बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली होती. त्या वेळी १२ बोगस डॉक्टर आढळून आले होते. डॉक्टरांनी नोंदणी करण्याचीे प्रक्रिया ९० टक्के झाली असून उर्वरित सर्व डॉक्टर्स, रुग्णालयांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी प्रमाणपत्रे सादर न केल्यास त्यांच्यावर बोगस डॉक्टर्स म्हणून कारवाई केली जाई, असे डॉ. राणे यांनी सांगितले. ६० डॉक्टरांनी प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी पालिकेने नोटिसा दिल्या आहेत. पालिका स्टिंग ऑपरेशन करून बोगस डॉक्टर पकडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारचा क्लिनिक रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट अद्याप लागू झालेला नाही. त्याआधीच पालिकेने सर्व एमबीबीएस, एमडी, बीएएमएस, बीडीएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयांची स्थिती
एकूण नोंदणीकृ त क्लिनिक- ५१२
नोंदणीकृत खासगी रुग्णालये- २१८
पॅथॉलॉजी लॅब- ४९
सोनोग्राफी सेंटर- ८०

बोगस रुग्णालये
अथर्व, अलकापुरी, आयुष, सीताराम, डिव्हाइन
(पालिकेने जाहीर केलेली ही रुग्णालये नालासोपारा परिसरातील आहेत.)

 

बेकायदा लॅबवर कारवाईची मागणी
पालिकेच्या दप्तरी केवळ ४९ अधिकृत पॅथॉलॉजी लॅबची नोंदणी आहे, परंतु शंभराहून अधिक लॅब बेकायदा कार्यरत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. नुकताच आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी दिवस पार पडला. त्यात बोगस ‘पॅथॉलॉजी लॅब’चा धोका विशद केला आहे. प्रत्येक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट असणे बंधनकारक आहे. पण तेथील तंत्रज्ञनच पॅथॉलॉजिस्टच्या नावाने सहय़ा करीत असतात. पालिकेचा कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचारी भरले जातात. त्यामुळे या बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्टना मोकळे रान मिळते, असाही आरोप शिवसेनेने केला आहे.