डोंबिवली : गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याचे सांगून डोंबिवलीतील घर नोंदणीकृत कागदपत्रांचे काम करणाऱ्या एका मध्यस्थाकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला मानपाडा पोलिसांनी कल्याणमधील दुर्गाडी पूल येथून अटक केली आहे.

तुषार शिलवंत (रा. कशेळी, भिवंडी) असे आरोपीचे नाव आहे. डोंबिवलीतील गांधीनगरमध्ये शंकर परब राहतात. त्यांचे जिमखाना रस्ता येथे सरकारी कागदपत्रे नोंदणीकरणाचे कार्यालय आहे. ते मध्यस्थ म्हणून काम करतात. कार्यालयात बसलेले असताना अचानक एक व्यक्ती थेट शंकर परब यांच्या कार्यालयात आली. आपण वाशी येथील गुन्हे शाखेत पोलीस अधिकारी आहोत. आपल्याविरुद्ध एका मुलीने तक्रार केली आहे.  या प्रकाराने घाबरून परब यांनी तात्काळ पाच लाख रुपये तोतया पोलीस अधिकारी तुषार शिलवंतला दिले. आणखी १० लाख रुपये द्यावे लागतील म्हणून परब यांच्याकडे तगादा लावला. परब यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांची भेट घेऊन त्यांना घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी तोतया अधिकाऱ्याला अटक करण्याची तयारी केली. परब यांनी तुषारला आपण १० लाख रुपये देण्यास तयार आहोत, प्रकरण पुढे वाढवू नका म्हणून सांगितले. तुषारने दुर्गाडी पूल येथे १० लाख रुपये घेऊन येण्यास परब यांना सांगितले.  तुषारने १० लाखांची रक्कम स्वीकारताच मानपाडा पोलिसांनी त्याला पकडले.