27 September 2020

News Flash

तपास चक्र : गोल्डन डॉक्टर

भैरोसिंगने दुकानात येऊन मालकाला हा प्रकार सांगताच त्याने तातडीने माणिकपूर पोलीस ठाणे गाठले.

(संग्रहित छायाचित्र)

सराफांना अनोख्या पद्धतीने लुटणाऱ्या एका तोतया डॉक्टरने सराफांमध्ये भीती निर्माण केली होती. गोल्डन डॉक्टरम्हणून हा ठकसेन सराफांत कुप्रसिद्ध झाला. तो कोण होता? कुठून आला? काहीच थांगपत्ता नव्हता. पोलिसांनी तर्क लावून तपास सुरू केला. पण तपासाचे धागे एकत्र करणे महाकठीण काम होते. अर्थात पोलिसांनी त्याही परिस्थितीत गोल्डन डॉक्टरला बेडय़ा घातल्याच..

फेब्रुवारी २०१८. ‘साहेब, डॉक्टरांनी मला लुटलं.’ नीलकमल ज्वेलर्सच्या मालकाने माणिकपूर पोलिसांना तक्रार देताना सांगितले. डॉक्टर रुग्णांना लुटतात असा काहीसा प्रकार असेल, असे पोलिसांना वाटले. पण हे प्रकरण विचित्र होते. एका डॉक्टरने या नीलकमल ज्वेलर्सच्या दुकानात येऊन अनोख्या पद्धतीने गंडा घालून लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले होते. हा डॉक्टर संध्याकाळी दुकानात आला. उंची पेहराव, हातात दोन आयफोन, गळ्यात सोनसाखळी असा त्याचा रुबाब होता. अस्खलीत मराठीत बोलणाऱ्या या डॉक्टरने आपले नाव अभिजित पाटील असल्याचे सांगितले. डॉक्टर असल्याचे सांगून नुकतेच या परिसरात राहायला आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने एक हार पसंत केला आणि तात्काळ त्याचे पन्नास हजार रोख दिले. त्याला आणखी काही दागिने हवे होते. सराफानेही तत्परतेने विविध प्रकारचे दागिने त्याला दाखवण्यास सुरुवात केली. त्या वेळी ‘माझ्या पत्नीला हे दागिने दाखवावे लागतील. तुम्ही तुमचा माणूस माझ्यासोबत घरी पाठवा. दागिने तेथेच घेऊन पैसे चुकते करेन,’ असे या डॉक्टरने सराफाला सांगितले. त्याचा एकूण रुबाब पाहून सराफानेही दुकानातील कर्मचारी भैरोसिंगला दागिने घेऊन डॉक्टरसोबत जाण्यास सांगितले. डॉक्टर आपल्या मोटारसायकलीवर बसला तर कर्मचारी भैरोसिंग आपल्या दुचाकीवर बसून डॉक्टरकडे जायला निघाला. पण बाजारातील गर्दीत डॉक्टरने त्याला गुंगारा दिला. विशेष म्हणजे, दागिन्यांची सगळी थैली डॉक्टरकडेच होती. भैरोसिंगने दुकानात येऊन मालकाला हा प्रकार सांगताच त्याने तातडीने माणिकपूर पोलीस ठाणे गाठले.

तोतया डॉक्टरने सफाईदारपणे सराफाला गंडवले होते. तब्बल अडीच लाखांचे दागिने घरी दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन त्या ठकसेनाने लंपास केले होते. श्रीमंत डॉक्टर असल्याचा अभिनय त्या ठकसेनाने उत्तमरीत्या वठवला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तो ठकसेन स्पष्ट दिसत होता. पण कोण होता तो? त्याला शोधायचे कसे? काही तरी सुगावा हवा होता. पोलिसांनी तपास सुरू केला. या ठकसेनाने गेल्या काही महिन्यात वसईतील वालीव, नालासोपारा, तुळींज या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफांना अशाच प्रकारे लुबाडलं होतं. सराफांचे सोन्याचे दागिने खुबीने पळवणारा तो गोल्डन डॉक्टर होता. आता त्याची धसकाच सराफ मालकांनी घेतला होता.

माणिकपूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्याकडे तपास आला. कसलाच दुवा नसताना त्यांना या गुन्ह्याची उकल करायची होती. त्याने सगळ्या घटनाक्रमाचे बारकाईने निरीक्षण केले. या ठकसेनाने अत्यंत सफाईदारपणे गुन्हा केला होता. यावरून तो सराईत गुन्हेगार असावा, हा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला. जाधव आणि त्यांच्या पथकाने पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील सराफांना गेल्या काही वर्षांत कुणी कुणी कशा पद्धतीने लुटले त्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मुंबईत असाच एक ठकसेन होता. त्याचे नाव कविश अग्रवाल. त्याने सराफांना हातचलाखी करून गंडा घातलेला होता. त्या वेळी त्याला अटकही झाली होती. त्याचे छायाचित्र पोलिसांनी वसईतील घटनेच्यी सीसीटीव्हीशी जुळवून पाहिले. पण फार साम्य नव्हते. मुंबईतला ठकसेने कविश अग्रवालच वसईतील तोतया डॉक्टर असावा याबाबत ठामपणे सांगता येत नव्हते. तरी या अग्रवालची चौकशी करम्णे गरजेचे होते. पण रेकॉर्डमध्ये त्याचा पत्ता नव्हता. त्यामुळे तपास पुन्हा ठप्प झाला.

पोलिसांनी हार न मानता या कविश अग्रवालची माहिती काढण्यास सुरवात केली. अग्रवालला बाईचा नाद होता आणि बारबालांमध्ये त्याची उठबस असायची अशी माहिती मिळाली. हा सुगावा पुरेसा होता. पोलिसांनी मुंबई आणि परिसरातील बारबालांचे अड्डे पालथे घातले. तेव्ही सायना नावाच्या एका बारबालेशी त्याचे खास संबंध असल्याची माहिती मिळाली. ही सायना कोण तिचा शोध सुरू केला. बऱ्याच बारबालांकडे, बारमालकांकडे चौकशी केल्यावर सायना ही मीरा रोडला राहत असल्याचे समजले. पोलिसांनी मीरा रोड गाठले. पण सायना तिथून कधीच गेल्याचे समजले. तिथून तिचा नवा पत्ता शोधण्यास सुरुवात केली आणि ती वसईच्या एव्हरशाइन सिटी येथे राहत असल्याचे समजले. पोलिसांनी एव्हरशाइन सिटीमधील तिचे घर गाठले. पण सायनाने कविशशी ओळख असल्याचा इन्कार केला. तिच्याकडून काहीच माहिती न मिळाल्याने पोलिसांना हात हलवत परतावे लागले. पण त्यांनी हार न मानता तिच्या घरावर पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला.साध्या वेशातील पोलीस दिवसा तिच्या घरावर नजर ठेवू लागले. पण एका रात्री तिने पोलिसांना गुंगारा दिला आणि रातोरात सामान घेऊन घर सोडले. इमारतीत चौकशी केली तेव्हा ती अचानक भाडय़ाचे असलेले घर सोडून गेल्याचे समजले. कुठे ते अर्थात कुणाला सांगितले नव्हते. तिला उगाच सोडले असे पोलिसांना वाटले. तरी संयम ठेवून पुढचा तपास केला. ज्या रात्री ती घर सोडून गेली त्या रात्रीचे सीसीटीव्ही चित्रण मिळवले. एका टेम्पोत सामान टाकून जात असल्याचे दिसले. रात्रीची वेळ होती. पोलिसांनी टेम्पोवरील क्रमांक पाहिला. सुदैवाने त्यावर टेम्पोचालकाचाही नंबर होता. पुढंचे काम सोप्प झाले. त्या टेम्पोवाल्याने माहिती दिली. त्याने सायनाला विरारच्या ग्लोबल सिटीत सोडले होते. त्या पत्त्यावर पोलीस धडकले. या वेळी त्यांनी अजिबात हलगर्जीपणा केला नाही. तिच्या घरावर कडक पाळत ठेवण्यात आली आणि चारच दिवसांत कविश पोलिसांच्या तावडीत सापडला.

पोलीस चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे सांगितले. मूळ राजस्थानचा असलेल्या कविश अनेक वर्षे सराफांमध्ये वावरला होता. सराफांच्या कामाची पद्धत त्याला ठावुक होती. त्यामुळे त्यांची कच्चे दुवे हेरून तो त्यांना फसविण्यात यशस्वी होत होता. हा गोल्डल डॉक्टर गजाआड झाल्याने वसईतील सराफांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

email- suhas.birhade@expressindia.com 

@Suhas_news

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2018 3:33 am

Web Title: fake golden doctor
Next Stories
1 शहरबात : ‘बेघर’ धोरणाची परंपरा कायम
2 मराठी वाङ्मयातील निवडक वेचक ‘पुनश्च’
3 उपनगरांना जलवाहतुकीचा पर्याय ; वसई-कल्याण-ठाणे जलमार्गास मंजुरी
Just Now!
X