बदलापुरात आपल्याकडील बनावट सोन्याचे दागिने हे खरे असल्याचे भासवून त्याची विक्री करण्याच्या हेतूने आलेल्या चार जणांपैकी तिघांना मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांनी बदलापूर पूर्व येथे झडप घालून अटक केली आहे.
बदलापूर पूर्वेला रेल्वे स्थानकाहून कात्रप भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास चार जणांची टोळी बनावट सोन्याचे दागिने हे खरे असल्याचे भासवून विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून या शाखेच्या पोलिसांच्या पथकाने बदलापूर पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला होता. दुपारच्या सुमारास येथे आलेल्या एका कारमध्ये तीन जण संशयितरीत्या बसले होते. या वेळी मोटार सायकलवरून आलेला एक इसम गाडीमध्ये बसलेल्या तिघांशी बोलत होता. या वेळी पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले असता मोटारसायकलीवरून आलेला इसम पळून जाण्यात यशस्वी झाला. गाडीतील तिघांची पोलिसांनी झडती घेतली असता पिवळ्या धातूच्या तीन साखळ्या, दोन ब्रेसलेट, रुद्राक्षांच्या मण्याची पिवळ्या धातूत मढवलेली माळ, पिवळ्या धातूत मढवलेला सोन्याचा गोफ, मोबाइल आदी वस्तू मिळून आल्या आहेत. या बनावट दागिन्यांची विक्री करण्यासाठी ही टोळी बदलापुरात आली असून विक्री करण्याआधीच पोलिसांनी त्यांना पकडले आहे. प्रकाश पाटील (२१), संदीप खारवर (२१), कृष्णा सूर्यवंशी (३७) आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौथा इसम फरार झाला आहे. या चौघांविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने सोमवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.