वसई : सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्य़ात वाढ झाली आहे. लष्कराचा अधिकारी असल्याची बतावणी करत वसईतील एका व्यापाऱ्याला दोन लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे.

तक्रारदार हे वसईतील सिमेंटचे व्यापारी आहेत. मागील आठवडय़ात त्यांना एका अनोळखी भ्रमणध्वनीवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने भारतीय लष्करातील अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला आणि प्रत्येकी ४० किलोच्या ७५ बॅगा वालपुट्टी हवी असल्याचे सांगितले. लष्कराचा अधिकारी आणि मोठी ऑर्डर असल्याने तक्रारदार व्यापारी तयार झाला. त्यानंतर या तोतया अधिकाऱ्याने गुगल पेवर ५ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या लष्करी प्रक्रियेचे शुल्क म्हणून गुगल पे आणि एनएफटीच्या माध्यमातून १ लाख ९६ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनतर या तोतया अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक करायची नवीन कार्यपद्धती

माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, लष्करी अधिकारी असल्याचे भासवून लोकांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांची फसवणूक करायची नवीन कार्यपद्धती सुरू झाली आहे. नागरिकांनी अनोळखी लोकांबरोबर आर्थिक व्यवहार करताना खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आरोपीच्या भ्रमणध्वनी आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.